जिल्हा बँकेवर थोरात गटाचेच वर्चस्व; विखेंच्या पदरी पुन्हा निराशा 21 जागांपैकी 17 बिनविरोध तर 4 जागांसाठी होणार निवडणूक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 17 जागांवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत तर चार जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया अद्याप बाकी असली तरी बिनविरोध झालेल्या जागा व त्यावर काँग्रेसचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीने मिळवलेले वर्चस्व पाहता बँक थोरात गटाच्या ताब्यात आल्याचे मानले जाते. भाजपचे नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे गटाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते, त्यासाठी बैठका घेतल्या होत्या. निवडणूक जरी जिल्हा बँकेचे असली तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याच्या शल्याचे आणि पराभवाचे वचपे बँकेच्या निवडणुकीत काढले गेल्याने निवडणूक रंगतदार झाली. बँकेची यंदाची निवडणूक आणखी एका वेगळ्या कारणासाठी ओळखली जाणार आहे, ती म्हणजे बँकेत अनेक तरुण चेहरे, विशेषत: जिल्ह्याच्या सहकारात दिग्गज असलेल्या नेत्यांची मुले बँकेत संचालक म्हणून दाखल झाली आहेत.

बँकेच्या निवडणुकीत किंवा सहकारातील निवडणुकीत यापूर्वी पक्षीय चित्र पाहण्यास मिळत नव्हते यंदा मात्र ते निर्माण झाले. माजी मंत्री विखे यांच्या पुढाकारातून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी एकत्रितपणे पॅनेल म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सहाजिकच काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची राज्यातील महाविकास आघाडी बँकेच्या निवडणुकीतही उतरली. मात्र शिवसेनेच्या हाती फारसे काही लागले नाही. केवळ या पक्षाचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची एकमेव जागा, शिवसेनेसाठी बिनविरोध निघाली.

विखे यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांची मोट बांधून ती थोरात-राष्ट्रवादी यांच्या विरोधात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी फडणवीस यांच्यामार्फत या सर्वांना एकत्र करण्याचे प्रयत्न केले. मात्र पराभवाचा झटका बसलेले भाजपचे नेते आता सावध झाले होती. कर्डिले, कोल्हे, राजळे, पिचड हे थोरात यांच्या संपर्कात राहिले. यातून थोरात व राष्ट्रवादीला विखे यांची कोंडी करण्यासाठी बळच मिळाले. त्याचा परिणाम बिनविरोध झालेल्या बहुसंख्य जागांवर थोरात-राष्ट्रवादी यांचे वर्चस्व निर्माण होण्यात झाले. बिनविरोध जागांमध्ये राष्ट्रवादी समर्थक आठ, काँग्रेस किंवा थोरात समर्थक पाच तर विखे समर्थक दोन आहेत. माजी आमदार भानुदास मुरकुटे अखेरच्या वेळी विखे यांची संगत सोडून थोरातांना मिळाले. सेवा संस्थेच्या नगर, पारनेर, कर्जत यासह बिगर शेती मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान अद्याप बाकी आहे.

शेतकरी व साखर कारखानदारांच्या दृष्टीने जिल्हा सहकारी बँक महत्त्वाची आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील नेतेमंडळींचा आपण मेळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपल्याला यशही आले आहे. जिल्हा बँकेत विशेषत: सहकारामध्ये पक्षांच्या पलीकडे जाऊन निवडणुका केल्या जातात. त्यामुळेच आपण यंदाही पक्षीय विचाराला बाजूला ठेवून सर्वांचा मेळ घातला. त्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनीही आपल्याला सहकार्य केले. बँकेत आता आगामी अध्यक्ष आमच्या पॅनेलचा असेल.
– बाळासाहेब थोरात (महसूल मंत्री)

Visits: 156 Today: 1 Total: 1603381

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *