निवडणूक प्रक्रिया लांबल्याने श्रीरामपूर नगरपालिकेवर प्रशासकराज प्रांताधिकारी अनिल पवार यांची प्रशासकपदी शासनाकडून नियुक्ती
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कोरोनामुळे सार्वत्रिक निवडणूक घेणे शक्य नसल्याने तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होणार असल्याने येथील नगरपालिकेत आता प्रशासकराज लागू झाला आहे. पालिकेच्या सत्ताधार्यांचा कार्यकाळ बुधवारी (ता.29) संपल्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी गुरुवारी (ता.30) सकाळी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी अनिल पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रातांधिकारी पवार यांनी पालिकेच्या कारभाराची सुरू हाती घेत, विविध विभागाच्या संबंधित अधिकार्यांकडून आढावा घेतला. निवडणुका लांबणीवर गेल्याने नगरपालिकेवर प्रशासक नेमण्यासाठी राज्य सरकारचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी नुकताच आदेश काढला होता. मुदत संपणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने कळविले होते. त्यानुसार येथील पालिकेवर प्रांताधिकारी पवार यांना प्रशासकपदी नियुक्त करण्याचे आदेश निघाले होते. त्यानुसार प्रांताधिकारी पवार यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला आहे.
पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून अनुराधा आदिक यांनी 27 डिसेंबर, 2016 मध्ये पदभार स्वीकारला होता. नगराध्यक्षा आदिक यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाला होता. राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असा प्रस्ताव नुकताच विधानसभेत मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील नगरपालिकेत पुढील निवडणूक होईपर्यंत प्रशासकराज राहणार आहे.