विखेंच्या कारखान्यात १९१ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप प्रवरा शेतकरी मंडळाची नगर जिल्हा सहकारी बँकेसह साखर संचालकांकडे तक्रार


नायक वृत्तसेवा, राहाता
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ताब्यात असलेल्या प्रवरानगर येथील साखर कारखान्यात तब्बल १९१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप प्रवरा शेतकरी मंडळाने केला आहे. त्यामुळे विखे-पाटील यांच्या अधिपत्याखालील हा सहकारी साखर कारखाना वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्यामध्ये कर्ज व्यवहार करताना बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून कारखान्यामधील नफा आणि तोट्यात फेरबदल करण्यात आले असल्याचे प्रवरा शेतकरी मंडळाने म्हटले आहे. त्यामुळे ही कारखान्याला ऊस पुरवणार्‍या शेतकर्‍यांची मोठी फसवणूक असून याबाबत अनेकदा तक्रारी देखील करण्यात आल्या. मात्र, या संदर्भाने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत साखर संचालकांना देखील खुलासा मागवण्यात आला होता, पण कारखान्याने खुलासा दिला नाही. त्यामुळे या कारखान्याला कर्ज देणं बंद करावे, अशी मागणी प्रवरा शेतकरी मंडळाने नगर जिल्हा बँकेकडे केली आहे.

दरम्यान, प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांनी या घोटाळ्याबाबत नगर जिल्हा बँक आणि साखर संचालकांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे-पाटलांचा कारखाना अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 27409

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *