राहुरी शहरातील व्यापारी चोरांच्या उपद्रवामुळे हैराण… बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन; व्यापारी असोसिएशनचा इशारा
नायक वृत्तसेवा, राहुरी
सध्या शहरात मोठ्या प्रमाणात चोर्या वाढल्या आहेत. यामुळे चोरांच्या उपद्रवाला कंटाळून राहुरी शहर व्यापारी असोसिएशनने नुकतीच राहुरी पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
सदर निवेदन देतेवेळी शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, अनिल कासार, विलास तरवडे, कांता तनपुरे, प्रवीण दरक आदी व्यापारी सदस्य उपस्थित होते. या निवेदनात म्हंटले आहे की, राहुरी शहरातील बालाजी मंदिर, जुने बस स्थानक समोरील नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेले अशोक सुधाकर लालबागे यांचे शेतकी औजारे व दुचाकी दुरुस्तीचे दुकान आहे. याच परिसरात बॅटरी, वेल्डिंग वर्क्स, चारचाकी वाहन दुरुस्तीचे असे अनेक व्यावसायिक आपली उपजिविका भागविण्यासाठी छोटे-मोठे व्यवसाय करतात. मागील काही दिवसांत कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तीन ते चार महिने व्यवसाय ठप्प राहिल्यामुळे कष्टकरी कारागीर आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यात चोरांच्या त्रासामुळे अजूनच अडचणीत सापडले आहे.
लालबागे बंधू यांचे शेतकी औजारे व दुचाकी दुरुस्तीचे दुकान शुक्रवारी (ता.20) रात्री अज्ञात व्यक्तींनी मागील दरवाजा तोडून दुकानातील वस्तू लंपास करत पोबारा केला आहे. तसेच याच परिसरात दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांच्या वस्तूंची व दुकानातील साहित्याची वारंवार छोट्या-मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. राहुरी स्टेशन रस्त्यावरील नव्याने सुरू झालेले वश्याट बाजार हे दुकान देखील रविवारी रात्री फोडण्यात आले. होतकरू तरुणांनी एकत्रित येत हा व्यवसाय नव्याने सुरू केलेला आहे. हा व्यवसाय सुरू होऊन अजून महिना पण झालेला नाही. तोच चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे युवा उद्योजक हवालदिल झाले आहे. कष्टकरी कारागीर व व्यावसायिक या चोर्यांमुळे मोठ्या प्रमाणावर त्रासलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. वेळीच चोरांचा बंदोबस्त केला नाही तर व्यापारी व नागरिक पोलीस प्रशासनास कुठलीही पूर्वकल्पना न देता उग्र आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला आहे. याप्रसंगी सचिन बोरूडे, अशोक लालबागे, गजानन वराळे, प्रशांत लालबागे, कपिल कल्हापुरे, किरण कुंभकर्ण, मयूर कल्हापुरे, विजय येवले, विशाल बोर्डे, गणेश गोडसे आदी व्यापारी उपस्थित होते.