‘गाठी ऋणानुबंधाच्या’ हे पुस्तक म्हणजे बहुजन समाजाचा भारतीय इतिहासात प्रवेश झाल्याची साक्ष ः डॉ.कसबे

नायक वृत्तसेवा, अकोले
इतिहास हा कोणा एका व्यक्तीचा नसतो, तो सर्वसामान्यांनी निर्माण केलेला असतो. यापूर्वी अनेक ‘चुकीच्या’ माणसांचे इतिहास लिहिले गेले. मात्र, मधुभाऊंनी लिहिलेले पुस्तक म्हणजे बहुजन समाजाचे इतिहासात पदार्पण झाल्याची साक्ष आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी मिनर्व्हा प्रतिष्ठानच्यावतीने ‘गाठी ऋणानुबंधाच्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केले.

सदर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.संघराज रुपवते होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, साध्वी प्रितीसुधाजी स्कूलचे संस्थापक इंद्रभान डांगे, शेतकरी नेते दशरथ सावंत, लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते, अशोक भांगरे, बी. जे. देशमुख, नगराध्यक्षा संगीता शेटे, मिनर्व्हा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, विक्रम नवले, मिनर्व्हा प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.जयश्री देशमुख तसेच शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ‘मिनर्व्हा प्रतिष्ठान’च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. डॉ.जयश्री देशमुख यांनी मिनर्व्हा प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांची माहिती दिली. ‘मिनर्व्हा’ ही ‘सरस्वती’ प्रमाणे विद्येची रोमन देवता आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मधुकर नवले यांनी पुस्तकाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांचे स्वागत केले. शेतीमध्ये रमत असताना शेतकर्यांचा कार्यकर्ता म्हणून पुढे आलो. आयुष्यात वाटचाल करत असताना अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी ऋणानुबंधाने जोडलो गेलो असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी लेखक मधुकर नवले यांचे कौतुक करत व मधुभाऊंनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सतत लिहित जावे असे आवाहन केले. इंद्रभान डांगे यांनी मधुभाऊ हे ‘सिद्धपुरुष’ असल्याचे नमूद केले. शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी मधुकर नवले यांनी पुस्तकामध्ये ओथंबलेल्या भावना लिखित स्वरूपात दिल्यामुळे त्याला पावित्र्य आल्याचे म्हंटले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संघराज रूपवते यांनी अभिनव महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. ‘भेटीत तुष्टता मोठी’ त्याप्रमाणे मधुभाऊंनी लेखणीतून त्यांच्याशी ऋणानुबंध असलेल्या व्यक्तींचे वर्णन केलेले आहे असे म्हंटले. यावेळी अशोक भांगरे, बी. जे. देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे मुद्रक सुजाता ऑफसेटचे सुजीत नवले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अमोल वैद्य व प्राजक्ता सोलापुरे यांनी केले तर आभार विक्रम नवले यांनी मानले.

