देवळाली प्रवरा येथे तीन शेतकर्यांच्या उसाच्या फडांना आग लाखो रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची चर्चा
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सोमवारी (ता.8) तीन शेतकर्यांच्या उसाच्या फडांना आग लागली. त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. स्थानिक रहिवासी व देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाने अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, दहा एकरांपेक्षा अधिक क्षेत्र या आगीत होरपळून निघाले.
देवळाली प्रवरा येथे सोमवारी दुपारी एक वाजता इनाम वस्ती भागातील राजेंद्र विठ्ठल ढूस यांच्या मालकीच्या साडेतीन एकर उसाच्या फडाला अचानक आग लागली. आगीचे व धुराचे लोळ उठल्यावर आसपासच्या नागरिकांना घटना समजली. नागरिकांनी तत्काळ देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. तोपर्यंत आग वेगाने भडकली. ढूस यांच्या उसाच्या फडाशेजारी असलेल्या अनिल कदम यांच्या साडेतीन एकर उसाच्या फडातही आग पसरली.
त्यानंतर या घटनेची माहिती समजताच नगराध्यक्ष सत्यजीत कदम, नगरसेवक सचिन ढूस, अमोल कदम, सचिन सरोदे, अनंत कदम, संदीप कदम, अनिल कदम, बजरंग कदम, अशोक निर्मळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रस्त्यावरील बाबासाहेब मुसमाडे यांच्या बारा एकर उसाच्या फडाला आग लागली. या आगीत पिकाचे मोठे नुकसान झाले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजले नाही. मात्र, महावितरणच्या विद्युतप्रवाहातील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची चर्चा उपस्थितांमध्ये केली जात होती.
मोठ्या कष्टाने उसाचे पीक वाढविले होते. आगीचे नेमके कारण समजले नाही. मात्र, अचानक आग लागल्याने सर्वांची पळापळ झाली. सर्वत्र धुराचे लोळ उठल्यामुळे ही आग नेमकी कोठून विझवावी हे कळत नव्हते. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
– अनिल कदम (शेतकरी-देवळाली प्रवरा)
अनिल कदम व राजेंद्र ढूस यांचा साडेतीन एकर उस जळाला. बाबासाहेब मुसमाडे यांचा एक एकर उस जळाला. देवळाली पालिकेचे दोन अग्निशामक बंब व राहुरी पालिकेच्या एका बंबाने आग आटोक्यात आणली. कदम व ढूस यांच्या उसात सॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. यात लाखोंचे नुकसान झाले.
– सत्यजीत कदम (नगराध्यक्ष-देवळाली प्रवरा)