नेवाशामध्ये विद्यार्थ्यांचा पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, नेवासा
शासनाच्या आदेशाने टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळांना मिळाल्या असल्या तरी शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांकडून संमतीपत्र घेण्याची भूमिका शाळा व्यवस्थापनाने घेतलेली दिसत आहे. नेवासा शहरात शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता 9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद दिसून आला.
![]()
याबाबत आमच्या प्रतिनिधीने माध्यमिक शाळांमधून फेरफटका मारला असता पहिल्या दिवशी ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे-पुरनाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करावयाची उपाययोजना यावर बैठक घेण्यात आली या बैठकीला ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व सुंदरबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. या बैठकीत विस्तार अधिकारी शिवाजी कराड यांनी शिक्षकांना नियमावलीबाबत मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीमध्ये शाळेत येणार्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली, पालकांचे संमतीपत्र भरवून घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी पटारे यांनी नेवासा तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना व सुरक्षित शिक्षण याबाबत तयारी करण्यात आली असल्याचे सांगितले. पहिल्या दिवशी येथील सुंदरबाई कन्या विद्यालय असून या विद्यालयात एकही विद्यार्थिनी दिसून आली नाही तर ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये एकूण 9 वी व 10 वीचे एकूण 338 विद्यार्थी असून 23 विद्यार्थी हजर होते. या सर्व विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

