आजी-माजी पदाधिकार्‍यांच्या वादात आजी-माजी मंत्र्यांची फरपट! संगमनेरच्या राजकीय तणावात भर; गहाळ झालेले तीनतोळे शोधण्यासाठी नागरीकांची गर्दी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी एकमेकांशी घनिष्ट राजकीय सख्य असलेल्या दोन पक्षांमधील पदाधिकार्‍यांमध्ये परस्परांच्या राजकीय महत्त्वकांक्षेतून सुरु झालेल्या सूप्त संघर्षाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. या वादाने आजवर केवळ सोशल माध्यमातून सुरु असलेल्या दोघांमधील लुटुपुटुच्या लढाईला थेट रस्त्यावर आणल्याने ऐन निवडणुकीच्या काळात संगमनेरातील राजकीय तणावात मोठी भर पडली आहे. वाद झालेले दोन्ही पदाधिकारी भाजप आणि उद्धवसेनेशी संबंधित असल्याने या घटनेनंतर आजी-माजी महसूलमंत्र्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आपापल्या समर्थक पदाधिकार्‍यांचे पाठबळ वाढवल्याने येणार्‍या कालावधीत त्याचे पडसाद अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय भवनाजवळ भरदुपारी घडलेल्या या प्रकारात दोन्ही पदाधिकार्‍यांनी आपापल्या गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटल्याने ‘त्या’ शोधण्यासाठी मंगळवारी दुपारपासून नवीन नगर रस्त्यावरील गर्दी वाढल्याची मिश्किल चर्चाही या निर्मित्ताने सुरु आहे.


गेल्या महिनाभरापासून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांची ‘युवा संवाद’ तर, त्यांचे कट्टर राजकीय विरोधक, माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या ‘युवा संकल्प’ यात्रांनी तालुक्यात चौफेर धुरळा उडवला होता. एकमेकांच्या मंचावरुन एकमेकांच्या राजकारणावर आसूड ओढणार्‍या या दोन्ही यात्रांनी निवडणुकीच्या घोषणेपासूनच तालुक्यातील वातावरण तापवले. एकीकडे थोरातांचा सहकार आणि विकास या मुद्द्यांवर भर देत मतदारसंघातील 145 गावांमधून जाणारी यात्रा तर, दुसरीकडे जिल्हा परिषद गटांना लक्ष्य करुन डॉ.सुजय विखे-पाटलांनी लावलेला धडाका यातून यावेळी संगमनेरची लढत थोरात विरुद्ध विखे-पाटील अशीच रंगणार असल्याचे वातावरणही तयार झाले. मात्र गेल्या आठवड्यात शक्यतांच्या फुगलेल्या या फुग्याला वसंत देशमुख नामक व्यक्तिच्या वाचाळ वाणीने नख लावले आणि तो फुटला. त्यानंतर ‘त्या’ वक्तव्याच्या प्रतिक्रियेने संगमनेरच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळाली, त्याचाच प्रत्यय अकोले रस्त्यापाठोपाठ मंगळवारी प्रचंड वर्दळीच्या नवीन रस्त्यानेही अनुभवला.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी साध्या पद्धतीने आपल्या मोजक्या समर्थकांसह माध्यान्नाच्या सुमारास उमेदवारी दाखल केल्यानंतर मुदत संपण्याच्या काही मिनिटे अगोदर महायुतीच्या अमोल खताळ यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत आपली उमेदवारी दाखल केली. त्यांच्या अर्जात सूचक असलेले भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले दुपारी दीडच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनात आले होते. तेथून ते पावणे दोनच्या सुमारास नेहमीप्रमाणे जवळच्याच एका चहाच्या दुकानावर गेले व त्यानंतर पाच मिनिटांतच सदरचा प्रकार घडला. ही घटना घडली त्यावेळी हा परिसर गर्दीने गजबजलेला होता. विशेष म्हणजे मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आसपास मुबलक बंदोबस्तही तैनात होता.


या घटनेनंतर भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले यांनी पहिली फिर्याद दाखल केली. त्यानुसार ते चहाच्या टपरीवर अन्य पाच जणांसह चहा घेत गप्पा मारत असताना अचानक पाठीमागून आलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी त्यांच्या मानेवर जोराने फटका मारला. याबाबत त्यांनी कतारी यांना जाब विचारला असता त्यांनी शिव्या का दिल्या? असा प्रतिसवाल केला. त्यावर कोणी शिव्या दिल्या असे उत्तर दिल्यानंतर कतारी त्यांच्या जोडीदारासोबत तेथून निघून गेले. पाठीमागून मानेवर बसलेल्या फटक्याने काही इजा झालीये का हे पाहण्यासाठी गणपुले यांनी मानेला हात लावला त्यावेळी त्यांच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाची सोनसाखळी गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.


त्यानंतर त्यांनी आजुबाजूला शोध घेतला असता ती कोठेही आढळून आली नाही. यावेळी कतारी यांनी असे का केले असावे याचा विचार करताना 2018 मध्ये विजयादशमीच्या दिवशी सोशल समूहात प्रसिद्ध केलेल्या अवमानकारक मजकूराविरोधात आणि त्यानंतर 2021 मध्ये खोटे व बदनामीकारक आरोप केल्यावरुन न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यांच्या रागातूनच त्यांनी हे असावे असे गणपुले यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन पोलिसांनी अमर कन्हैय्यालाल कतारी (वय 43, रा.संजय गांधीनगर) यांच्या विरोधात भारतीय न्यासंहितेच्या कलम 115 (दुखापत करणे), 118 (1) (घातक साधनांचा वापर), 324 (4) (नुकसान करणे) व 309 (4) (जबरी चोरी) या प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.


या घटनेनंतर फिर्याद दाखल करण्यासाठी श्रीराम गणपुले पोलीस ठाण्यात येताच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलही तेथे पोहोचले. यावेळी त्यांनी पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची भेट घेत त्यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करीत एकप्रकारे भविष्यातील संगमनेरच्या राजकीय संघर्षाची झलकही दाखवली. माजीमंत्री बाळासाहेब थोरात सायंकाळी सातच्या सुमारास अशोक चौकातील महादेव मंदिरात भेट देण्यासाठी जात असताना त्यांना कतारी-गणपुले वादाची माहिती मिळाली. तेथून त्यांनी लागलीच पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची भेट घेतली. थोरात यांच्या चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत एखाद्या फौजदारी स्वरुपाच्या प्रकरणात थोरातांनी थेट पोलीस ठाण्यात यावं हा प्रकार न भुतोच होता. त्यामुळे बहुतेक सगळेच अवाक्ही झाले होते.


यावेळी त्यांनी पो.नि.देशमुख यांना संगमनेरच्या राजकीय सौहार्दपूर्ण परंपरेविषयी माहिती देत सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांच्या विचारधारे विरोधात असतात, त्यांच्यात कोणत्याही कारणाने मनभेद झाल्याचे उदाहरण नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. सत्यनारायण आणि उद्घाटन वगळता पहिल्यांदाच ठाण्याची पायरी चढल्याची जाणीवही त्यांनी करुन दिली. प्रत्येक प्रकरणात सत्तेचा आणि प्रशासनाचा वापर झाल्यास त्याचे परिणाम शांततेसाठी पूरक ठरणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कायद्याला सर्वोच्च मानून निःपक्षपणे या प्रकरणाचा तपास करावा अशी सूचना त्यांनी केली. पोलीस कायद्यानेच काम करतील असे आश्‍वासनही पोलीस निरीक्षकांनी दिले. यावेळी थोरात यांच्यासोबत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व आमदार सत्यजित तांबेही उपस्थित होते.


त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास अमर कतारी यांनी दुसरी फिर्याद दाखल केली. त्यानुसार मंगळवारी (ता.29) दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते जाणताराजा मैदानाकडे जात असताना नवीन नगर रस्त्यावरील एका चहाच्या टपरीजवळ भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी त्यांना आवाज देत बोलावले. त्यामुळे दुचाकी थांबवून कतारी त्यांच्याजवळ गेले असता, ते म्हणाले; ‘तु शिवसेनेचे जास्त काम करतो. तु महाविकास आघाडीची जास्त बाजू घेतोस. तुझ्यावर मी यापूर्वी दोन गुन्हे दाखल केलेले आहेत. तरीही तुझा माज जिरलेला नाही..’ असे म्हणत गणपुले यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.


त्यामुळे कतारी यांनी शिव्या का देताय अशी विचारणा केली असता गणपुले यांना राग येवून त्यांनी धक्काबुक्की करीत त्यांच्या गळ्यातील 22 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ओढून घेतली. हा प्रकार सुरु असताना प्रशासकीय भवनाजवळ उभ्या असलेल्या दोघांनी धाव घेत त्यांच्यातील वाद सोडवले व त्यातील एकाने कतारी यांना त्याच्या दुचाकीवरुन जाणताराजा मैदानाकडे नेले. यावेळी जाताजाताही गणपुले यांनी ‘तुला संपवूनच टाकतो’ अशी धमकी दिल्याचेही अमर कतारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन पोलिसांनी श्रीराम गणपुले यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 115, 352 (शांतता भंग करण्यासाठी अपमान करणे), 351 (2) (दमदाटी व धमकावणे), 309 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


गेल्या आठवड्यात धांदरफळ येथील डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या संकल्प मेळाव्याच्या मंचावरुन कथीत पुढारी वसंत देशमुख यांनी थोरात कन्या डॉ.जयश्री यांच्यावर अत्यंत हीन पातळीवरील वक्तव्य केले होते. त्यातून थोरात समर्थकांचा रोष अनावर होवून त्या मेळाव्यासाठी आलेल्यांच्या वाहनांवर हल्ले होण्याचे काही प्रकार घडले. हा हल्ला डॉ.सुजय विखे-पाटील यांच्यावरच करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करीत या वादाच्या माध्यमातून विखे-पाटलांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला. बाळासाहेब थोरात यांनीही लेकीचा अपमान समस्त महिलांचा अपमान असल्याचे सांगत संस्कृतीशी तुलना करीत प्रति आव्हान दिले.


त्यातून एकमेकांच्या शंभरावर प्रमुख कार्यकर्त्यांवर राजकीय गुन्ह्यांसह थोरातांचे सख्खे चुलतबंधू इंद्रजीत, स्वीय्य सहाय्यक भास्कर खेमनर, माजी सभापती अजय फटांगरे, गौरव डोंगरे, निखिल पापडेजा, वैष्णव मुर्तडक, निखिल कातोरे अशा 25 ज्ञात व पन्नासावर अज्ञातांवर अत्यंत गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले. त्यात आता मंगळवारच्या घटनेचीही भर पडली. त्यानंतर दोन्ही बाजूने आपल्या समर्थकांना पाठबळ देण्यासाठी आजी-माजी महसूलमंत्र्यांनी थेट पोलीस ठाण्याची पायरी चढल्याने संगमनेरच्या राजकारणाने आता कलाटणी घेतल्याचे स्पष्ट दिसू लागले असून यंदाची निवडणूक विविध अंगांनी चर्चेत राहण्याची दाट शक्यता आहे.


वर्दळीच्या रस्त्यावर ‘सोनं’ शोधायला गर्दी..
सध्या दिवाळीचा सण सुरु असल्याने नवीन नगर रस्त्यावर ग्राहकांनी प्रचंड वर्दळ आहे. त्यातच उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यात अधिक भर पडलेली असताना मंगळवारी भरदुपारी भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले आणि शिवसेना उद्धव गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्यात हमरीतुमरी झाली. एकमेकांना कायदेशीर अडचणीत आणण्यासाठी दोन्हीकडून या गदारोळात गळ्यातील सोन्याची चेन ओढल्याचे आरोप केले गेल्याने पोलिसांनी 14 वर्ष शिक्षेची तरतूद असलेल्या जबरी चोरीच्या कलमाचा दोन्हीकडे वापर केला. ही घटना गंभीर असली तरीही या प्रकारानंतर दोघांच्या हाणामार्‍यात नगररस्त्यावर हरवलेले ‘ते’ 31 ग्रॅम वजनाचे सोने शोधण्यासाठी मोठी गर्दी उसळल्याच्या मिश्किल चर्चा खमंगपणे सुरु झाल्या होत्या.

Visits: 53 Today: 1 Total: 113690

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *