संगमनेरात तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करा! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पालिकेकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराची लोकसंख्या दिवसागणीक वाढत असून, तेवढ्याच पायाभूत सुविधा पालिकेमार्फत उपलब्ध झालेल्या नाहीत. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकारी रुग्णालयाच्या मर्यादा खूप आहेत. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा रुग्णालयाची गरज आहेच. परंतु याबरोबरच शहराला होत असलेल्या दुर्गंधी व प्रदूषणयुक्त पाण्यावरही निर्बंध आणणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारुन सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सदर निवेदनात मनसेने म्हटले आहे की, शहरात असलेल्या सर्व रुग्णालयांचे, हॉटेल, औद्योगिक व्यवसायांचे रसायनयुक्त पाणी प्रवरा नदीपात्रात मागील अनेक वर्षांपासून सोडण्यात येत आहे. तसेच शहरात चालू असलेल्या अवैध कत्तलखान्याचे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी नदीपात्रात सोडले जाते. याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त प्रदूषित पाणी पुरवठा होत आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी पालिकेने या सर्व प्रकारांवर बंधने आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. यासाठी शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. परंतु पालिकेने याकडे सपशेल दुर्लक्ष करुन, हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवल्याने नागरिकांवर प्रदूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. याचा विपरित परिणाम नागरीकांच्या आरोग्यावर होत असून, रुग्णांची संख्याही वाढत आहे.

या सर्व गंभीर बाबींचा विचार करुन पालिका प्रशासनाने तातडीने शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत व नदीपात्रात सोडण्यत येणारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत निर्बंध घालावेत अशी मागणी केली आहे. याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष तुषार ठाकूर, तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना रामा शिंदे, अभिजीत घाडगे, अविनाश भोर, अक्षय जगताप, अफताफ पठाण, आकाश भोसले आदिंनी दिला आहे.

Visits: 7 Today: 1 Total: 82762

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *