राहुरी फॅक्टरी येथील किराणा विक्रेता ‘अक्षय ट्रेडर्स’चा परवाना निलंबित!
राहुरी फॅक्टरी येथील किराणा विक्रेता ‘अक्षय ट्रेडर्स’चा परवाना निलंबित!
भगर पीठ विषबाधा प्रकरण; अन्न व औषध प्रशासन विभागाीच कारवाई
नायक वृत्तसेवा, राहुरी
भगर पिठातून विषबाधा प्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील ठोक किराणा विक्रेता ‘अक्षय ट्रेडर्स’चा परवाना निलंबित केला आहे. त्यांनी विक्री केलेले 1400 किलो भगरपीठ परत बोलविण्यास सांगितले आहे. यामुळे तालुक्यातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
किरकोळ दुकानांमधून भगर पिठाचे नमुने ताब्यात घेऊन पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. तपासणीत आरोग्यास घातक पदार्थ आढळल्यास ठोक विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला जाईल. काही आढळले नाही तरी दंडात्मक कारवाईची शिफारस केली जाईल. किरकोळ विक्रेत्यांवरही खटले दाखल केले जातील, असे अहमदनगरचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, राहुरी फॅक्टरी, म्हैसगाव, शेटेवाडी (देवळाली प्रवरा), गुहा, चिंचोली, तांभेरे, मुसळवाडी, गंगापूर अशा विविध गावांमध्ये किराणा दुकानांमधून भगर पीठ खरेदी केलेल्या नागरिकांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता.17) रात्री विषबाधेचा प्रकार घडला. रविवारी (ता.18) शेकडो नागरिक मळमळ, उलट्या, जुलाबाने त्रस्त झाले. म्हैसगाव येथे सर्वाधिक 58 जणांना विषबाधा झाली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी तातडीने धाव घेतली.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने म्हैसगाव येथे बाळासाहेब गागरे यांच्या मातोश्री सुपर मार्केटमध्ये 29 किलो व बापूसाहेब जाधव यांच्या सचिन किराणा स्टोअर्समध्ये 6 किलो भगरपीठ जप्त केले. पांढरी येथे रवींद्र मुसमाडे यांच्या श्रीराम किराणा व जनरल स्टोअरमध्ये भगरपीठ साठा आढळला नाही. तिन्ही दुकानदारांना त्यांनी ग्राहकांना विकलेले भगरपीठ परत घेण्याचे आदेश दिले. राहुरी फॅक्टरी येथील ‘अक्षय ट्रेडर्स’ या ठोक विक्रेत्याकडे भगरपीठ साठा आढळला नाही. त्यांनी अरिहंत फुड्स इंडस्ट्रीज (दिंडोरी, नाशिक) यांच्याकडून भगर खरेदी करून, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान सन्मती फुड्स इंडस्ट्रीज श्रीरामपूर यांच्याकडून दळून घेतली. एक किलो पॉलिथीन बॅगमध्ये 1400 किलो भगरपीठ विक्रीसाठी प्राप्त केले.
11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान किरकोळ व्यापार्यांना व ग्राहकांना विक्री केली. त्यांनी उत्पादित व विक्री केलेल्या भगर पिठामुळे अनेक लोकांना उलटी, मळमळ, जुलाब असे त्रास झाले. त्यामुळे 18 ऑक्टोबर रात्री साडेआठ पासून पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांचा परवाना निलंबित करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.