संगमनेरचे पाच तरुण ठरले कोल्हापूरचे ‘लोहपुरुष’! अतिशय खडतर स्पर्धा; आदित्य राठीची चमकदार कामगिरी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगभरातील एकदिवसीय खेळांमध्ये सर्वाधीक साहसी समजल्या जाणार्या बर्गमॅन 113 ट्रायथलॉन स्पर्धेत संगमनेरच्या पाच तरुण व्यावसायिकांनी बाजी मारली आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत साडेआठ तासांत दोन किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकल चालवणे आणि 21 किलोमीटर धावून ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. त्यात संगमनेरच्या आदित्य संजय राठी यांनी अवघ्या 6 तास 45 मिनिटांमध्ये हे तीनही प्रकार पूर्ण केले. तर, वेणुगोपाल लाहोटी, सौरभ आसावा, कपील चांडक व महेश मयूर यांनी निर्धारीत वेळेपूर्वीच तीनही प्रकार पूर्ण करुन कोल्हापूरचे ‘लोहपुरुष’ हा किताब पटकाविला. या पाचही तरुण व्यावसायिकांनी एकाचवेळी केलेल्या या कामगिरीबद्दल संगमनेरातून त्यांचे कौतुक होत आहे.
कोल्हापूरच्या डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्यावतीने गेल्याकाही वर्षांपासून या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात वरील तिनही प्रकार ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करणार्या स्पर्धकाला ‘आयर्न मॅन’ म्हणून सन्मानित केले जाते. यावेळी पार पडलेल्या या स्पर्धेत संगमनेरातील पाच तरुण व्यावसायिक सहभागी झाले होते. त्यात सनदी लेखापाल संजय राठी यांचे सुपूत्र आदित्य यांनी 43 मिनिटांमध्ये 1.9 किलोमीटर अंतर पोहणे, 3 तास 16 मिनिटांत 90 किलोमीटर सायकल चालवणे आणि 2 तास 32 मिनिटांत 21.1 किलोमीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करीत आयर्नमॅन (लोहपुरुष) हा किताब जिंकला. यावेळी त्यांनी या स्पर्धेत दुसर्यांदा सहभाग घेतला होता.
संगमनेरच्या वेणुगोपाल लाहोटी यांनी सव्वासात तासांचा वेळ घेताना 51 मिनिटांमध्ये पोहण्याची, तीन तास 17 मिनिटांत सायकल चालवण्याची तर, दोन तास 53 मिनिटांत धावण्याची शर्यत पूर्ण केली. सौरभ आसावा यांनी तिसर्यांदा या स्पर्धेत सहभागी होत आठ तास दोन मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी 59 मिनिटे पोहण्यासाठी, तीन तास 47 मिनिटे सायकल चालवण्यासाठी तर, दोन तास 56 मिनिटे धावण्यासाठी खर्च केले. या स्पर्धेतील संगमनेरचे चौथे स्पर्धक कपील चांडकही तिसर्यांदा या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी 57 मिनिटांमध्ये राजाराम पाटील तलावात 1.9 किलोमीटर अंतर पोहून पूर्ण केले.
चार तास दोन मिनिटांत 90 किलोमीटर सायकल चालवली तर, दोन तास 55 मिनिटांमध्ये 21.1 किलोमीटर अंतर धावून 8 तास 9 मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या सायकलचा टायर पंक्चर झाल्याने त्यांचा जवळपास अर्धातास त्यात खर्च झाला. या स्पर्धेतील संगमनेरचे पाचवे स्पर्धक म्हणून महेश मयूर यांनीही पहिल्यांदाच या स्पर्धेचा अनुभव घेतला. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत 1 तास 14 मिनिटांत 1.9 किलोमीटर अंतर त्यांनी पोहून कापले. त्यानंतर 3 ता 46 मिनिटांत 90 किलोमीटर अंतर सायकलने पूर्ण करीत 3 तास पाच मिनिटांत 21.1 किलोमीटर कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावून आयर्न मॅनचा किताब पटकावला.
क्रीडा विश्वात अतिशय खडतर समजल्या जाणार्या या खेळांचे परदेशात दरवर्षी आयोजन होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा दुप्पट अंतराची म्हणजे स्पर्धकांना मिळणार्या 17 तासांमध्ये चार किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे व 42 किलोमीटर धावणे अशा स्वरुपाची असते. कोल्हापूरमध्ये गेल्याकाही वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धेतील अंतर मात्र निम्मे करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातील अनेकजण दरवर्षी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. त्यात संगमनेरच्या पाच तरुण व्यावसायिकांनी सहभागी होत आयर्नमॅनचा किताब पटकावल्याने संगमनेरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
ट्रायथलॉन प्रकारच्या या स्पर्धेला क्रीडा विश्वात अत्यंत साहसी खेळाचा दर्जा प्राप्त आहे. खेळांची शतकोत्तर परंपरा जोपासणार्या कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींनी एकत्र येवून गेल्याकाही वर्षांपासून ‘हाफ आयर्न ट्रायथलॉन’ ही स्पर्धा सुरु केली. त्याला राज्यासह देशभरातूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाजी विद्यापीठानजीकच्या राजाराम तलावात पोहण्यापासून सुरु होणार्या स्पर्धेत कोल्हापूर ते निपाणी या महामार्गावर 90 किलोमीटर सायकल चालवावी लागते आणि कोल्हापूरच्या अंतर्गत रस्त्यांवर 21.1 किलोमीटर धावून ठरवून दिलेल्या वेळेतच ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. यावेळी या स्पर्धेत संगमनेरचे आदित्य राठी, वेणुगोपाल लाहोटी, कपील चांडक, सौरभ आसावा व महेश मयूर या पाच व्यावसायिक सहभागी झाले आणि त्यांनी ‘लोहपुरुष’ हा किताबही पटकावला.