अकोले तालुक्याच्या पश्‍चिम घाटमाथ्यावर पावसाचे तांडव! घाटघरमध्ये विक्रमी 13 इंच पाऊसाची नोंद; चोवीस तासांत भंडारदर्‍यात सव्वा टीएमसी पाणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळाचा परिणाम गेल्या 24 तासांत कोकण किनारपट्टी, मुंबई व ठाणे उपनगरांसह सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाने अक्षरशः तांडव घातले असून भंडारदर्‍याच्या पाणलोटातील घाटघरमध्ये तब्बल 13 इंच तर, रतनवाडीत 12 इंच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळपासून प्रवरा खोर्‍यातील पावसाचा जोर वाढत गेल्याने आज सकाळी सहा वाजता संपलेल्या 24 तासांत भंडारदर्‍याच्या जलाशयात विक्रमी 1 हजार 147 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल होवून धरणाचा साठा जवळपास निम्म्याच्या नजीक पोहोचला आहे. हरिश्‍चंद्रगडाच्या परिसरातही मुसळधार टिकून असल्याने मुळापात्राने काठांची मर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे मुळा धरणात वेगाने पाण्याची आवक होवू लागली आहे. कळसूबाईच्या शिखरांवरही पावसाचा जोर वाढल्याने कृष्णवंती दुथडी होवून वाकी जलाशय ओसंडल्याने निळवंड्यातील पाण्याची आवकही वाढली आहे. गेल्या 24 तासांतील पावसाने पश्‍चिमघाटासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने बळीराजासह संपूर्ण जिल्हा सुखावला आहे.


गेल्या रविवारपासून धरणांच्या पाणलोटात मुक्काम ठोकलेल्या मान्सूनला सोमवारी भलताच जोर चढला होता. सह्याद्रीच्या पल्याड अरबी समुद्रातील वातावरणीय घडामोडींचा परिणाम सोमवारी संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबई व ठाण्यातील सर्व उपनगर आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर दिसून आल्याने गेल्या 24 तासांत राज्यात अक्षरशः हाहाकार उत्तल्याचे चित्र निर्माण झाले होते. पुणे-नाशिक, पुणे-मुंबई अशा महत्वाच्या महामार्गांवर पाणी साचल्याने जागोजागी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचेही चित्र दिसून आले. गेल्या आठवड्यापर्यंत राज्यावर असलेले दुष्काळाचे सावट या दमदार पावसाने धुवून नेल्याचे समाधान असले तरीही अनेक ठिकाणी लोकांचे संसार उघड्यावर येण्यासह वाहने वाहून जाण्याच्या अपघाती घटनाही घडल्या आहेत.


मुळा व कृष्णवंतीच्या खोर्‍यात पडणार्‍या पावसाच्या तुलनेत प्रवरानदीच्या खोर्‍यातील पावसाचा जोर अधिक असल्याचे चित्र सोमवारी सकाळपर्यंत दिसत होते. मात्र दुपारनंतर मुळा खोर्‍यातील आंबित, शिरपूंजे, कोथळे, पाचनई, पेठेची वाडी, खडकी, कोतुळ अशा सर्वदूर प्रचंड पाऊस झाला. हरिश्‍चंद्रगडावरुन मुळेच्या पात्रात कोसळणार्‍या मंगलगंगा ओढ्याने रुद्रावतार धारण केल्याने मुळेच्या पात्राचा फूगवटा वाढून सोमवारी सायंकाळी चालू हंगामात पहिल्यांदा मुळापात्राने विक्रमी 18 हजार 724 क्यूसेकचा प्रवाह धारण केला होता. मात्र रात्रीच्या अंधारात पावसाचा जोरही कमी झाल्याने सकाळपर्यंत त्यात पाच हजार क्यूसेकची घट होवून तो 13 हजार 836 क्यूसेकवर खाली आला. मात्र 24 तासांतील पावसाच्या झंझावाताने मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात 825 दशलक्ष घनफूटाची भर घातल्याने या धरणाचा पाणीसाठा आता 28 टक्क्यांजवळ पोहोचला आहे.


एकीकडे भंडारदर्‍याच्या पाणलोटातील रतनगडाच्या शिखरांवर पावसाची धुमश्‍चक्री सुरु असताना दुसरीकडे कळसूबाईच्या शिखरांना मात्र मोठ्या पावसाची प्रतिक्षा होती, सोमवारी ती देखील पूर्ण झाली. कृष्णवंतीच्या खोर्‍यात दिवसभर पावसाने धुमाकूळ घातल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास 112.66 दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडला आणि निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात भर घालणारा मोठा दरवाजा उघडला गेला. त्यामुळे आज सकाळी संपलेल्या 24 तासांत निळवंडे धरणात 232 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले. सोमवारच्या पावसाने आढळा खोर्‍यातही जोर दाखवल्याने यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच आढळा धरणात पाच दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होवून साठा हलता झाला.


गेल्या 24 तासांत पाणलोटासह लाभक्षेत्रातही सर्वदूर मान्सूनचा प्रभाव दिसून आला. आज सकाळी नोंदवलेल्या पर्जन्यमानानुसार उत्तरेतील अकोल्यात सर्वाधीक 93 मि.मी. तर, नेवाशात सर्वात कमी 15 मि.मी. पावसाची नोंद झाली. संगमनेर 60 मि.मी., राहाता 51 मि.मी., कोपरगाव 38 मि.मी., श्रीरामपूर 23 मि.मी. व राहुरीत 18 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासांत धरणांसह लाभक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने दुष्काळाची चिंता दूर होवून समाधानाचे वातावरण पसरले आहे.


संपूर्ण जूनचा महिना कोरडाठाक गेल्याने यंदा दुष्काळाचे सावट घोंगावत असताना गेल्या 72 तासांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात चैतन्य निर्माण केले आहे. मात्र त्या उपरांतही यंदा आत्तापर्यंतच्या पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या आजच्या दिवसाच्या तुलनेत खूप कमी असल्याचे वास्तवही समोर आहे. यंदाच्या 1 जूनपासूनच्या पावसाचा आढावा घेतल्यास जिल्ह्यात पावसाचे आगार मानल्या जाणार्‍या घाटघरमध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी 321 मि.मी. तर महिन्याभरात 1142 मि.मी. पाऊस झाला आहे, गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत 2058 मि.मी. पाऊस झाला होता. रतनवाडीत आज सकाळी संपलेल्या 24 तासांत 302 मि.मी., आजच्या दिवसापर्यंत 891 मि.मी., तर गेल्यावर्षी आजच्या दिवशी 2096 मि.मी., भंडारदर्‍यात आज 240 मि.मी., आजवर 632 मि.मी., तर गेल्यावर्षी 1245 मि.मी., पांजरे येथे आज 270 मि.मी., आजवर 749 मि.मी., तर गेल्यावर्षी 1388 मि.मी., निळवंडे आज 145 मि.मी., आजवर 333 मि.मी., तर गेल्यावर्षी 536 मि.मी.,


मुळा आज 20 मि.मी., आजवर 117 मि.मी., गेल्यावर्षी 180 मि.मी., आढळा आज 70 मि.मी., आजवर 127 मि.मी., गेल्यावर्षी 131 मि.मी., कोतुळ आज 58 मि.मी., आजवर 155 मि.मी., गेल्यावर्षी 239 मि.मी., अकोले आज 93 मि.मी., आजवर 172 मि.मी., गेल्यावर्षी 390 मि.मी., संगमनेर आज 60 मि.मी., आजवर 130 मि.मी., गेल्यावर्षी 137 मि.मी., तर श्रीरामपूरमध्ये आज 23 मि.मी., आजवर 120 मि.मी. आणि गेल्यावर्षी आजच्याच दिवसापर्यंत 54 मि.मी. पाऊस झाला होता. त्यावरुन पाणलोटातील महिन्याभराच्या पर्जन्यमानात मोठी घट झाल्याचे, मात्र अकोले वगळता लाभक्षेत्रातील पर्जन्याने सरासरी गाठल्याचे चित्र दिसत आहे.


यंदा पाणलोट क्षेत्राला प्रदीर्घ ओढ देण्यासह पावसाचे प्रमाणही खालावल्याने त्याचा परिणाम जुलैतील सरासरी धरणसाठ्यांवर झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाचा पाणीसाठा 16 हजार 478 दशलक्ष घनफूट (63.38 टक्के) होता, आज तो 7 हजार 226 दशलक्ष घनफूट (27.79 टक्के) आहे. भंडारदर्‍याचा पाणीसाठा 7 हजार 969 दशलक्ष घनफूट (72.19 टक्के) होता, आज तो 5 हजार 46 दशलक्ष घनफूट (45.71 टक्के) इतकाच आहे. निळवंडे धरणात 6 हजार 706 दशलक्ष घनफूट (80.60 टक्के) पाणीसाठा होता, तो आज 1 हजार 839 दशलक्ष घनफूट (22.10 टक्के) आहे, तर आढळा धरण 1060 दशलक्ष घनफूट (100 टक्के) भरलेले होते, त्यात आज 366 दशलक्ष घनफूट (35.53 टक्के) इतकाच पाणीसाठा आहे.

पर्यटकांसाठी वन्यजीव विभागाचे निर्बंध..
राज्यातील पावसाची स्थिती आणि हवामानाचा अंदाज यांचा विचार करुन भंडारदर्‍याच्या वन्यजीव विभागाने कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड परिसरातील निसर्ग पर्यटनावर मर्यादा आणल्या असून पर्यटकांना प्रसिद्ध सांदनदरी, घाटघरचा कोकणकडा, रतनगड, अलंग, कुलंग व मदनगड, कळसूबाई आदी शिखरांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय सह्याद्रीच्या कूशीत विविध ठिकाणी आयोजित होणार्‍या साहसी खेळांनाही तात्पूरती बंदी घालण्यात आली आहे. तशा आशयाचे आदेशही काढण्यात आले असून संबंधित ग्रामपंचायतींना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दूरदूरवरुन येणार्‍या साहसी निसर्गप्रेमींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

Visits: 13 Today: 13 Total: 1891108

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *