वीज कंपनीच्या कामकाजात सुधारणाच होईना! ऐन उत्सवातही नागरिकांना मनस्ताप; थातूरमातूर कारणांनी सामान्यांमध्ये संताप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांपासून संगमनेर शहरातील वीज पुरवठ्यावरुन नागरी संताप वाढत असून तीनबत्ती चौकात तब्बल दोनतास महामार्ग रोखल्यानंतरही कंपनीच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याचे अवघ्या दोन दिवसांत पुन्हा एकदा दिसून आले. रविवारी सायंकाळी शहरातील मोठ्या भागाचा वीज पुरवठा खंडीत होवून नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी या उत्सवाच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. काही नागरिकांनी कंपनीच्या नेहमीच ‘व्यस्त’ असलेल्या क्रमाकांसह काही अधिकारी आणि कर्मचार्यांशी संपर्क साधून परिसरातील मंदिरांचे महत्व आणि सध्या मंदिरांमधील गर्दीबाबत माहिती देत तक्रारीही केल्या, मात्र अमुकतमूक फीडरवरुन गेली आहे, ग्रीडवरुन प्रोब्लेम आहे अशाप्रकारची विस्कळीत थातूरमातूर उत्तरं मिळाल्याने नागरीकांचा संताप झाला. जवळपास तासाभराने काही भागातील पुरवठा सुरळीत झाला खरा, मात्र साळीवाड्यासह रंगारगल्लीच्या मोठ्या भागात दीर्घकाळ कमीदाब निर्माण झाल्याने जागृत रेणुकादेवीच्या दरबारात सुरु असलेल्या संकीर्तनाच्या कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होवून भाविकांना अंधारातच देवीचा जागर करावा लागला. सणासुदीच्या कालावधीतही वीज कंपनीच्या कामकाजात बदल होत नसल्याने शहरात रोष निर्माण होवू लागला असून उत्सवाच्या कालावधीतील खंडीत पुरवठ्यातून त्याचे उग्र प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे.

गेल्याकाही दिवसांपासून संगमनेरच्या वीज पुरवठ्यात अनियमितता निर्माण झाली असून कंपनीकडून मनमानी पद्धतीने वाट्टेल तेव्हा कोणत्याही भागाचा पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे शहरीभागासह ग्रामीणभागातही संताप निर्माण झाला
आहे. गेल्या महिन्यात वितरण कंपनीच्या कामकाजात सुधारणा व्हावी व शेतकर्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन शेतीसाठीच्या वीज पुरवठ्याचे नियोजन व्हावे यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही काढला गेला. मात्र त्या उपरांतही कंपनीच्या कामकाज पद्धतीत काहीच फरक पडला नाही. त्याचा परिणाम गेल्या आठवड्यात तीनबत्तीसह गावठाणातील मोठ्या भागाचा वीज पुरवठा ऐन संध्याकाळच्या वेळी खंडीत होवून रात्री दहा वाजेपर्यंतही सुरळीत न झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी थेट तीनबत्ती चौकात जावून चारही बाजूने होणारी वाहतूक पूर्णतः रोखली.

त्यामुळे नगर, पुणे, नाशिक व शहराकडे जाणार्या सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजावण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांनी केलेल्या प्रतिवादावर पोलीसही निरुत्तर झाल्याने अखेर वीज कंपनीच्या अधिकार्यांना घटनास्थळी पाचारण करुन खंडीत पुरवठ्याबाबतची नेमकी माहिती देण्यास सांगण्यात आले. काही वेळातच पुरवठा सुरळीत होईल असे पोकळ आश्वासन देत ‘त्या’ अधिकार्यांनी वेळही
मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांसमोर तो टीकला नाही. अधिकार्यांच्या माहितीनंतरही जवळपास तासभर वीज पुरवठा कायम न झाल्याने नागरिक महामार्गावरच ठिय्या देवून बसले होते, अखेर मध्यरात्रीच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तब्बल दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यावरुन वीज वितरण कंपनीने बोध घेवून किमान सण-उत्सवांच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर असताना पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी फूलप्रूफ नियोजन करण्याची गरज होती. संगमनेरच्या नवरात्रोत्सवाला मोठी परंपरा आहे. कसबापेठेत (देवीगल्ली) वसलेल्या सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर शिवकालीन असल्याचे व देवीपुराणातही या शक्तिस्थळाचा उल्लेख आढळतो. याशिवाय शहरातील विविध भागातही देवीचे विविध रुपातील अनेक मंदिरं असून रंगारगल्ली परिसरातील साळीवाड्यात असलेल्या रेणुकामाता मंदिराचा इतिहास मोठा रंजक आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात या मंदिरात धार्मिक कार्यक्रम, होमहवन, संकीर्तन, जागरण अशा कार्यक्रमांचे आयोजन होते.

यंदाही रविवारी रात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी रंगारगल्लीसह साळीवाड्याचा संपूर्ण परिसर अचानक अंधारात बुडाला. त्यामुळे देवळारावळांमध्ये सुरु असलेल्या संकीर्तन, जागर-गोंधळ कार्यक्रमांमध्ये व्यत्यय; निर्माण झाला. या
कालावधीत संध्याकाळी कामावरुन परतलेले चाकरमाने आपल्या मुलाबाळांसह विविध मंदिरात दर्शनासाठी बाहेर पडलेले होते. अशावेळी झालेल्या अंधाराने सर्वसामान्यांपासून, दुकानदार, भाविक, पादचारी अशा सर्वांचाच संताप झाला. साळीवाड्यातील मंदिरात सुरु असलेल्या संकीर्तनात व्यत्यय आल्याने अखेर तासभर वीजेची वाट पाहून स्पिकरशिवाय राहिलेला कार्यक्रम उरकावा लागला. या दरम्यान मंडळाच्या पदाधिकार्यांसह परिसरातील नागरिकांनी वीज कंपनीच्या कार्यलयात तक्रार देण्याचाही प्रयत्न केला. मात्र नेहमीप्रमाणे तेथील दूरध्वनी कायमस्वरुपी ‘व्यस्त’ असल्याचेच रडगाणे कानी पडल्याने लोकांची निराशा झाली.

काहींनी वीज कंपनीच्या अधिकार्यांशी व कर्मचार्यांशी संपर्क केला असता त्यांना ‘मार्केटयार्ड फीडरवर फॉल्ट आहे, ग्रीडवर ताण आलाय, फलाना डीपीवर ताण वाढलाय..’ अशी वास्तव नसलेली थातूरमातून उत्तरं देवून वेळ मारुन नेण्यात आली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकाराने उत्सवांचे आयोजक, मंदिरांचे व्यवस्थापक, मंडळे आणि सामान्य नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून वीज कंपनीच्या कामकाजात अजूनही सुधारणा न झाल्यास कंपनीला नागरीरोषाचाही सामना करावा लागू शकतो.

मागील काही दिवसांपासून संगमनेरच्या वीज वितरण कंपनीच्या कारभारावरुन सामान्यांमध्ये रोष निर्माण होवू लागला असून शहरीभागात वीज देयकांचा भरणा करण्यासाठी चोहोबाजूने दबावतंत्रासह पुरवठा खंडीत करण्याचे भय दाखवले जात आहे. मात्र त्याचवेळी सेवा देण्यात मात्र वितरण कंपनी सपशेल अपयशीच असून मनाला वाटेल त्या भागाचा पुरवठा कधीही खंडीत होत आहे. त्यावरुन संतप्त झालेल्या नागरिकांना त्यामागील सत्यता सांगण्याऐवजी थातूरमातूर उत्तरं दिली जात असल्याने त्यात आणखी भर पडतं आहे. त्याचा परिणाम सध्या भारतीय संस्कृतीतला सर्वात मोठा नवरात्रोत्सव सुरु असल्याने कंपनीच्या कामकाजात सुधारण न झाल्याचे नागरीरोषाचा प्रवाह वीज कंपनीच्या दारापर्यंत पोहोच्णयाची शक्यता आहे.

