मानोरी ग्रामसभेत आजी-माजी पदाधिकार्‍यांत खडाजंगी खासगी रस्त्यावरुन एकमेकांवर धावून येण्याचाही घडला प्रकार


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील मानोरीत आजी-माजी पदाधिकार्‍यांमध्ये अभूतपूर्व गोंधळ होऊन चांगलीच शाब्दिक चकमक झाली. तसेच एकमेकांच्या अंगावर धावून येण्याची घटना ग्रामसभेत घडली. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या प्रश्नावरून एका माजी ग्रामपंचायत सदस्याने आजी सदस्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप एका विद्यमान सदस्याने केल्यानंतर सभेत चांगलीच खडाजंगी उडाली. शिवीगाळ करणार्‍या माजी सदस्याला विद्यमान सदस्यांनी घेराव टाकत जाब विचारला. मात्र, शिवीगाळ झाल्याच्या घटनेचा माजी सदस्याने सपशेल इन्कार केला. काहींनी मध्यस्थी करत अखेर वादावर पडदा टाकला.


मानोरी येथील ग्रामसभा हनुमान मंदिराच्या सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अब्बास शेख हे होते. तर सभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड यांनी पाहिले. ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी होणार्‍या विविध विकासकामांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. जलजीवन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच पाईपलाईनसाठी शासकीय स्तरावर निधी उपलब्ध झाला आहे. सदर कामाच्या नियोजनासाठी साधकबाधक चर्चा करण्यात आली असून लवकरच हे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती सरपंच अब्बास शेख यांनी सभेत दिली.


दरम्यान, चर्चा सुरू असताना रस्त्याच्या प्रश्नावरून एका नागरिकाने खासगी रस्त्यावर शासकीय निधीतून रस्ता खडीकरण करावा, अशी मागणी केल्यानंतर हा रस्ता मालकीच्या असलेल्या व्यक्तीने त्यावर आक्षेप घेत त्या दोघांमध्येही चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकांवर धावून येण्याचा प्रकार देखील घडला. एकंदरीतच ही ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली.

धुमाळ यांची जमीन बक्षीसपत्र
मानोरी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी 1 कोटी 28 लाख रुपयांचा निधी शासन स्तरावर मंजूर झाला आहे. ही पाण्याची टाकी बांधण्यासाठी डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ यांच्या स्नुषा वनिता धुमाळ यांनी आपल्या मालकीची एक गुंठा जमीन बक्षीसपत्र करून दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.

Visits: 5 Today: 2 Total: 29575

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *