भारताच्या एकात्मतेसाठीच इंदिराजींचे बलिदान ः सबनीस अमृत उद्योग समूहाच्यावतीने इंदिराजी व सरदार पटेल यांना अभिवादन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बँकांचे राष्ट्रीयीकरण, ऑपरेशन ब्लू स्टार सह बांगलादेशची निर्मिती करणार्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर नेत्या होत्या. देशाच्या विकासात ‘इंदिरा पर्व’ अत्यंत महत्वाचे असून भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिराजींनी बलिदान दिले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांनी केले.
संगमनेरातील अमृत उद्योग समूहाच्यावतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील शक्तीस्थळ बागेत आयोजित अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, ललिता सबनीस, इंद्रजीत थोरात, लक्ष्मण कुटे, संपत डोंगरे, रामहरी कातोरे, आर. बी. रहाणे, नवनाथ अरगडे, सीताराम राऊत, रामदास वाघ, संपत गोडगे, विलास वरपे, अभिजीत ढोले, मिलिंद कानवडे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सचिव किरण कानवडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले, इंदिराजींनी धर्मनिरपेक्ष समाजवादी भारताची पायाभरणी केली असून देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचा विसर होणे हा कृतघ्नपणा आहे. देशाच्या विकासात इंदिरा पर्व अत्यंत महत्त्वाचे असून हरितक्रांती, विज्ञान क्रांती, घडवणार्या इंदिराजींनी बँकांच्या राष्ट्रीयकरणासह बांगलादेशची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कणखर नेत्या म्हणून त्या गौरविल्या गेल्या. व्यक्तिगत जीवनातही अनेक संकटांना झेलत त्या पुढे आल्या. इंदिराजींचे स्मरण हे फक्त काँग्रेसने नव्हे तर संपूर्ण देशाने केले पाहिजे. तसेच 600 संस्थाने देशात विलगीकरणाचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले इंदिराजी व सरदार पटेल हे भारतीय निष्ठेचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले. मात्र सध्या दुर्दैवाने देशात धार्मिकतेचे राजकारण सुरू आहे. लोकशाही ही धार्मिकतेवर आधारित नसून सर्वधर्मसमभावावर आधारित आहे. धार्मिकतेचे राजकारण हे देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवणारे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर रामदास वाघ यांनी आभार मानले.