सातत्याच्या खंडीत वीज पुरवठ्याने संगमनेरात संताप! संतप्त नागरिकांचा चौकातच ठिय्या; चारही बाजूची वाहतूक रोखली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांपासून संगमनेर शहरासह तालुक्याच्या विविध भागात वीजेचा खेळ सुरु असून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तासन् तास पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होवू लागला आहे. गुरुवारीही वितरण कंपनीचा असाच खेळ सुरु होवून पहाटे तीनच्या सुमारास शहरातील मोठ्या भागाचा पुरवठा विस्कळीत झाला, त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या भागात तासन् तास असाच प्रकार घडत राहिल्याने नागरिकांमध्ये रोष खद्खदू लागला. त्यातही काही सहनशील नागरिकांनी खंडीत पुरवठ्याचे कारण जाणून घेण्यासाठी तक्रार कक्षाला फोन केले असता नेहमीप्रमाणे सदरचा क्रमांक कायमस्वरुपी व्यस्त असल्याचे आढळले. बाजारपेठ, मेनरोड, गवंडीपूरा, तीनबत्ती चौक, सय्यदबाबा चौक यासारख्या मोठ्या भागातील वीज तर ऐन संध्याकाळी गायब होवून दीर्घकाळ परतण्याची चिन्हे नसल्याने संतप्त नागरिक थेट रस्त्यावर उतरले व त्यांनी तीनबत्ती चौकातच ठिय्या दिला. रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने अहिल्यानगर, नाशिक, शिर्डी व पुण्याकडे होणारी वाहतूक खोळंबली आणि काही वेळातच चोहोबाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आल्याने अखेर वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पुरवठ्यातील व्यत्ययाचे कारण सांगत तासाभरात पुरवठा सुरळीत होण्याचे आश्‍वासनही दिले, मात्र सलग पाचतास अंधाराचा सामना करणार्‍या अबालवृद्धांचे समाधान झाले नाही. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तीनबत्तीवरील गर्दी हटली आणि वाहतूक सुरळीत झाली.


सध्या संपूर्ण राज्य भयानक दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याने ठिकठिकाणच्या जलाशयांतील पाणीसाठ्यांवर नियंत्रण आले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या नियमित वीज उत्पादन क्षमतेवरही होत आहे. अशातच जागतिक तापमान वाढ आणि अल-नीनोचा वाढता परिणाम यातून वातावरणातील उष्णता वाढून वातानुकुलीन यंत्रणांचा वापर वाढत असल्याने वीजेची मागणीही वाढत आहे. मात्र देशभरात सारखीच स्थिती असल्याने संपूर्ण राज्याला एकाचेवळी सर्वत्र वीज पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. अशावेळी दुष्काळाचा सामना करणार्‍या ग्रामीणभागात शेतकरी हातातोंडाशी असलेली पिकं वाचवण्यासाठी वीजेची मागणी करीत असताना दुसरीकडे उष्णतेने काहीली झालेले नागरिक, उद्योजक, व्यापारी अशा सगळ्यांकडूनही मागणीचा दबाव वाढता असल्याने वितरण कंपनीची अवस्था बिकट होत आहे.


मागील काही दिवसांपासून तर वितरण कंपनीकडून ग्रामीणभागाशिवाय शहरातही वारंवार पूर्वसूचनेशिवाय तासन् तास वीजे गायब होत आहे. त्याबाबतचे कारण जाणून घेण्यासाठी नागरिक कंपनीच्या तक्रार कक्षाकडे विचारणा करण्यासाठी फोनही करीत आहेत. मात्र नेहमीप्रमाणे ग्राहकांना समर्पक उत्तरे देवून त्यांचे समाधान करण्याचे सोडून फोनचा रिसिव्हर उचलून बाजूला ठेवण्याची प्रवृत्तीच जोपासली जात असल्याने तासन् तास अंधार, डास, मुलांच्या अभ्यासाची, व्यापाराची चिंता नागरिकांमधील सहनशीलतेचा अंत करणारी ठरु लागली आहे. त्याचा पहिला अध्याय गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अनुभवायला मिळाला.


गुरुवारी (ता.8) सायंकाळी बसस्थानकापासून ते शहराच्या पूर्वेकडील बहुतेक भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला. दिवसभरातही अनेकवेळा असे प्रकार घडतच होते, त्यामुळे काहीवेळात होईल सुरळीत अशा विचाराने नागरिकांनी वितरण कंपनीच्या नावाने बोटं मोडीत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संध्याकाळी गायब झालेली वीज रात्रीचे दहा वाजूनही परतण्याची चिन्हे नसल्याने नागरिकांच्या संयमाने संतापाची जागा घ्यायला सुरुवात केली आणि अनेकांची पाऊलं अनाहूतपणे तीनबत्ती चौकाच्या दिशेने पडू लागली. काही वेळातच चौकात शेकड्याच्या संख्येने नागरिक जमा होवून घोषणाबाजी करु लागले आणि बघताबघता चौकातला ठिय्या वाढून चारही बाजूने येणारी आणि जाणारी वाहतूक रोखली गेली.


या आंदोलनात केवळ तरुण अथवा व्यावसायिकच नव्हेतर म्हातारी माणसं, महिला आणि चक्क विद्यार्थीही सहभागी झाले आणि त्यांनी सक्रिय सहभागी होत रस्त्यावरच बसकन मांडले. अचानक घडलेल्या या नागरी उद्रेकाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. तो पर्यंत नगरररोड, पुणेरोड, अकोले रोड, नाशिक रोडसह शहरात जाणार्‍या सर्वच रस्त्यांची अवस्था कोंडीत अडकल्यागत होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी संतप्त आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आल्याने अखेर वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना बोलावण्यात आले. त्यांनी औद्योगिक वसाहतीच्या फिडवर बिघाड झाल्याने दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे व काही वेळात पुरवठा सुरळीत होण्याचे आश्‍वासन दिले. मात्र आंदोलक ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने त्यानंतरही तासभर आंदोलन सुरुच राहीले, अखेर मध्यरात्रीच्या सुमारास पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तब्बल दोनतास खोळंबलेली तीनबत्ती चौफुली मोकळी झाली.


या आंदोलनातून वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत नागरी रोष रस्त्यावर आल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी वारंवार आणि पूर्वसूचनेशिवाय वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार अमान्य असल्याचे सांगत सणासुदीच्या काळात सततच्या खंडीत पुरवठ्यामुळे व्यापारावर परिणाम होत असल्याची तक्रारही समोर आली. दिवसा दीर्घकाळ गायब राहणारी वीज रात्री-अपरात्रीही खंडीत होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा विषयही यावेळी समोर आला. मात्र आडातच नसल्यावर पोहर्‍यात कोठून येणार? या म्हणीप्रमाणे पोकळ आश्‍वासनं देतं अधिकार्‍यांनी वेळ मारली आणि आंदोलनाचे फलीत पुरवठा सुरुळीत झाल्याच्या आनंदात चौकात जमलेली पाऊलं पुन्हा घराकडे माघारी फिरली.

Visits: 22 Today: 22 Total: 2189238

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *