संगमनेर बसस्थानकाला अव्यवस्थेचे ग्रहण! प्रवेशद्वारावर भिक्षेकर्यांचे साम्राज्य; बेशिस्तीने देखण्या इमारतीची गेली रया..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात प्रशस्त आणि देखण्या ठरलेल्या संगमनेर बसस्थानकाला अव्यवस्थेच्या ग्रहणाने ग्रासले असून जागोजागी भिक्षेकर्यांच्या पथार्या, बांधकामाच्या रचनेतच भुयारी वाहनतळ असूनही त्याचा आजवर न झालेला वापर, त्यामुळे मोकळ्या जागेचा वाहनचालकांकडून होणारा मनमानी वापर, भिक्षेकर्यांमध्ये मिसळून रात्रीच्यावेळी चालणारा अनैतिक व्यवसाय यासह अंधार आणि घाणीमुळे सुरुवातीला वैभवशाली भासणार्या या इमारतीची सद्यस्थितीत अक्षरशः रया गेली आहे. भिक्षेकर्यांनी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ताबा मिळवल्याने आंत जाताना प्रवाशांना मार्ग काढीत आणि नाक मुरडतच जावे लागते. त्यातच आता महामंडळाच्या उत्पन्नावर डल्ला मारणार्या खासगी प्रवाशी वाहतुकदारांनी पोलिसांच्या आशीर्वादाने थेट बसस्थानकाच्या आवारापर्यंत मजल मारल्याने संगमनेरच्या या देखण्या इमारतीत बेशिस्तीसह घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
सुरुवातीला महामार्गाच्या कडेला छोटेखानी स्वरुपात असलेल्या संगमनेर बसस्थानकाचे पाच दशकांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र कालानुरुप पुणे-नाशिक व मुंबई या महानगरांच्या त्रिकोणीय श्रृंखलेत महत्त्वाच्या ठरलेल्या या बसस्थानकात बसगाड्यांसह प्रवाशांचीही गर्दी वाढत गेल्याने दहा वर्षांपूर्वी स्थानकाच्या चोहोबाजूने वेढलेली अतिक्रमणं काढून बांधा-वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्त्वाने खासगी ठेकेदाराकडून संपूर्ण इमारत नव्याने बांधण्यात आली. त्यातून इमारतीचा खर्च भागवण्यासाठी दर्शनीभागात दोन मजल्यांच्या रचनेत व्यावसायिक गाळे आणि कार्यालये बांधण्यात आली. याशिवाय स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूला भूमिगत पद्धतीने प्रशस्त वाहनतळही उभारण्यात आले.
ठेकेदाराशी तीस वर्षांच्या करारावर विकसित झालेल्या या बसस्थानकातील व्यापारी गाळेही 30 ते 50 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेवून विकण्यात आले. त्या बदल्यात प्रवाशांसह व्यापारी संकुलातील दुकानांमध्ये येणार्या ग्राहकांसाठी दर्शनीभागात मोकळी जागा सोडून त्यांची वाहने उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र गेल्या काही वर्षात येथील व्यावसायिकांकडे येणार्या ग्राहकांशिवाय भलतीच माणसं या जागेचा मनमुराद वापर करीत असून शहरात येणारेही आता फुकटात आपली दुचाकी व चारचाकी वाहने बसस्थानकाच्या आवारात मनाला वाटेल तेथे उभी करुन दिवसभर गायब होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात भर म्हणून बसस्थानकाच्या बाह्य बाजूला फळे आणि अन्य खाद्यपदार्थ विकणार्यांनीही बस्तान बांधले असून त्यातून महामार्गावर वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
कोविड संक्रमणाच्यावेळी 2020 मध्ये केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केली होती. या कालावधीतच राज्यातील अनेक ठिकाणचे भिक्षेकरी पदयात्रेने संगमनेरात दाखल झाले असून तेव्हापासूनच त्यांनी बसस्थानकाच्या इमारतीत वेगवेगळ्या जागेवर पथार्या मारल्या आहेत. धक्कादायक म्हणजे प्रवाशांसाठी असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातच असंख्य भिक्षेकर्यांचा तळ असून त्यांच्यात दिवसभर शाब्दीक आणि शारीरिक हाणामार्या सुरु असल्याचे प्रकारही वारंवार घडत असतात. त्यामुळे महामंडळाच्या बसने प्रवास करण्यासाठी येणार्यांना त्यांच्या घाणेरड्या शिव्या आणि प्रचंड दुर्गंधीतून मार्ग काढीतच फलाटापर्यंत जावे लागते. फलटांवर बसची प्रतिक्षा करणार्या प्रवाशांसाठी बाकड्यांचीही सोय आहे. मात्र त्यातील अनेक बाकड्यांवर या भिक्षेकर्यांचे वर्चस्व असून दिवसभर त्यावर ठाण मांडून बसलेले अथवा झोपलेले भिक्षेकरी येथील अव्यवस्थेचा नियमित भाग बनले आहेत.
बसस्थानकापासून दोनशे मीटर क्षेत्रात कोणत्याही खासगी प्रवाशी वाहनांना प्रवेश मनाई असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. मात्र संगमनेरात पोलिसांच्या आशीर्वादाने त्याची दररोज पायमल्ली केली जात असून काळी-पिवळी प्रवाशी वाहने थेट बसस्थानकाच्या परिसरात शिरुन प्रवाशांची पळवापळवी करीत असल्याचे विरोधाभासी चित्रही संगमनेर बसस्थानकावर दररोज बघायला मिळते. याशिवाय बसस्थानकावर मालकी हक्क सांगणार्या भिक्षेकर्यांमध्ये काही महिलांनीही शिरकाव केला असून संध्याकाळी अंधार पडताच या परिसरात अनैतिक व्यवसायालाही ऊत येत असल्याचे दिसून आले आहे. मात्र आगारप्रमुखांसह कोट्यवधीचे घबाड कमावणार्या ठेकेदाराला या गोष्टींचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने दिवसोंदिवस जिल्ह्यात देखण्या ठरलेल्या या इमारतीची रया घालवण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे.
संगमनेर बसस्थानकातून दररोज सुमारे साडेतिनशेहून अधिक ठिकाणी जाणार्या बसेस सुटतात. रोज या बसस्थानकात सुमारे दहा हजारांहून अधिक प्रवाशांचा राबता असतो. त्याशिवाय बाह्य बाजुला असलेल्या विविध दुकानांमध्येही दिवसभरात हजारों ग्राहकांची आणि त्यांच्या वाहनांची रेलचेल असते. मात्र असे असतानाही बाह्यबाजुच्या स्वच्छतेशिवाय, भर प्रवेशद्वारातच बसलेले भिक्षेकरी, रात्रीच्यावेळी वीजबचत करण्याच्या नादात केला जाणारा अंधार आणि त्याचा फायदा घेत रात्री सुरु होणारे अनैतिक व्यवसाय यामुळे शहराच्या नावाला बट्टा लागत आहे. संबंधितांनी आपल्या कर्तव्याला जागून या अव्यवस्थेवर नियंत्रण मिळवावे व वैभवशाली ठरलेल्या या इमारतीचे सौंदर्य कायम ठेवावे अशी सामान्य संगमनेरकराची अपेक्षा आहे.