दहाव्याच्या कार्यक्रमात टोळक्याकडून सशस्त्र हल्ल्याचा प्रयत्न! गुंजाळवाडी शिवारातील धक्कादायक घटना; पोलिसांच्या विलंबाने आरोपी पसार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
म्हाळुंगी नदीकाठावर सुरु असलेल्या दहाव्याच्या कार्यक्रमात पांढर्या रंगाच्या बोलेरो वाहनातून आलेल्या आठ ते दहाजणांच्या टोळक्याने तलवारी, कोयते या सारख्या घातक शस्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी गुंजाळवाडीतून समोर आला. जीवाच्या आकांताने सैरभैर झालेले उपस्थित नागरिक आरडाओरड करीत गावातील वस्तीकडे धावल्याने मोठा अनर्थ टळला. या गदारोळात महिलांसह काहीजण किरकोळ जखमी झाले असून एका महिलेने रणरागीनीचा अवतार धारण करीत एका हल्लेखोराकडून तलवारही हिसकावून घेतली. हा प्रकार सुरु असताना गुंजाळवाडीच्या काही प्रतिष्ठीतांनी शहर पोलिसांना फोनद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकार्यांकडून प्रतिसादच मिळाला नाही. आपत्कालीन क्रमांकावर (112) माहिती दिल्यानंतर अर्धातासाने शहर पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचले. तोवर हल्लेखोरांसह जखमी नागरिकही आपापल्या गंतव्यापर्यंत पोहोचले होते. या प्रकरणी उद्याप कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाही, त्यामुळे गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र त्या कारणाने तलवारी, कोयत्यांचा उघड नंगानाच करुन संपूर्ण लोकवस्तीत दहशत निर्माण करणार्या या घटनेकडे दुर्लक्ष करता येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेत हल्लेखोरांनी वापरलेल्या हत्यारांमधील एक तलवार पोलिसांच्या हाती लागली आहे, खरेतर त्या आधारावरच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र शहर पोलीस सध्या ‘फिर्यादी’च्या प्रतिक्षेत असून त्याची पूर्तता न झाल्यास पुढील संभाव्य गंभीर घटनेनंतर या प्रकरणाचाही तपास त्यासोबतच करण्याच्या मूडमध्ये आहेत.

याबाबत दैनिक नायकला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार आज (ता.8) सकाळी साडेआठच्या सुमारास गुंजाळवाडी शिवारातील वेल्हाळे-कारखाना रस्त्यावर म्हाळुंगी नदीकाठावर घडला. गुंजाळवाडी गावापासून बाहेर असलेल्या या ठिकाणी अठरापगड जातीतल्या कोणा इसमाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी समाजातील अबालवृद्ध, महिला-पोरं नदीकाठी जमले होते. दहाव्याचा विधी सुरु असतानाच एका पांढर्या रंगाच्या बोलेरेमधून सात-आठजणांचे टोळके खाली उतरले. त्यांच्या हातात तलवारी, कोयते आणि लाकडी-लोखंडी दांडे असे प्राणघातक हत्यारेही होती. अचानक अवतरलेल्या या टोळधाडीने शिवीगाळ करीत, धरा-मारा करीत दहाव्याच्या ठिकाणाकडे धाव घेतल्याने जमलेल्यांमध्ये एकच पळापळ उडाली.

हत्यारांसह धावून येणारे टोळके कोणाला मारण्यासाठी आले आहे किंवा त्यांचा हेतू काय आहे याबाबत जमलेल्यांमधील बहुतांशी लोकांना माहिती नसल्याने ही टोळधाड आपल्यावरच असल्याचे समजून तेथे जमलेल्या कीर्तनकारासह सगळीच बाया-बापडी जीवाच्या आकांताने टाहो करीत गावाच्या दिशेने धावू लागली. टोळक्यातील गुडांनी त्यातील काहींचा पाठलाग करुन त्यांना मारहाण केल्याचेही सांगितले जाते. त्याच दरम्यान एकाने हातात तलवार घेवून एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने रणरागीनीचा अवतार घेत त्याच्या हातातली तलवार हिसकावून घेत त्याला दरडावल्याने तो पसार झाला. तिच तलवार पोलिसांनी नंतर जप्त केली आहे.

अचानक आरडाओरड करीत अनेकजण गावाकडे धावत असल्याचे पाहून आसपासच्या नागरिकांनी त्या दिशेने धाव घ्यायला सुरुवात करताच घाबरलेल्या हल्लेखोरांनी आल्या वाहनातून पलायन केले. मात्र तोवर घाबरलेल्या काही महिलांनी आसपासच्या घरांमध्ये शिरुन आपले व आपल्या मुलांचे संरक्षण करीत आपबीती सांगितल्यानंतर काही प्रतिष्ठीतांनी शहर पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना दूरध्वनी करुन माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपत्कालीन 112 क्रमांकावर फोन केल्यानंतर अर्धातासाने शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत हल्लेखोरांसह दहाव्याच्या कार्यक्रमासाठी जमलेले, हल्ल्यात जखमी झालेले आणि पोलिसांना कळवणारे सगळेच आपापल्या प्रपंचात व्यस्त झाले होते.

प्रथमदर्शनी या घटनेमागे मयताच्या कौटुंबिक वादाची किनार दिसत असली तरीही त्याच्या दहाव्याच्या कार्यक्रमात संपूर्ण अठरापगड समाज, त्यांचे नातेवाईक जमलेले असताना टोळक्याने सशस्त्र येवून कार्यक्रमस्थळीच हल्ला चढवण्याचा हा प्रकार खूप गंभीर आहे. अचानक शस्त्र हातात घेवून अंगावर धावून येणारे हल्लेखोर पाहून जीवाच्या आकांताने सैरभैर झालेल्यांचा पाठलाग करुन त्यांना मारहाण झाल्याचेही बोलले जात आहे. त्यातून या संपूर्ण परिसरात, गुंजाळवाडीसारख्या अतिशय सधन गावाच्या वेशीवर काहीकाळ प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या घटनेकडे तितक्याच गांभीर्याने पाहून हल्लेखोरांना गजाआड घालण्याची गरज होती, मात्र प्रत्यक्षात या घटनेतील धारदार तलवार हाती लागूनही शहर पोलीस अद्यापही फिर्यादीच्याच शोधात आहेत.

जिल्ह्यात अतिशय वेगाने विकसित होणार्या शहरांमध्ये अग्रणी असलेल्या संगमनेर शहराच्या आसपासच्या भागात गेल्या दशकभरात प्रचंड मानवी वस्ती उभी राहीली आहे. त्यात एकट्या गुंजाळवाडी शिवारात मोठ्या संख्येने निवासी इमारतींचे जाळे निर्माण झाले असून आजमितीस या ग्रामपंचायतीच्या हद्दितील लोकसंख्या 35 ते 40 हजारांवर पोहोचली आहे. अशावेळी मिनी शहर समजल्या जाणार्या गुंजाळवाडीत घडलेला हा प्रकार शहराच्या कायदा व सुव्यवस्थेलाही इशाराच आहे. पोलिसांनी त्याकडे अधिक गांभीर्याने पाहताना तत्काळ तपासाला सुरुवात करुन आरोपी जेरबंद करायला हवे होते. मात्र अगदी सिनेस्टाईल चारचाकी वाहनातून येवून तासभर सशस्त्र दहशत माजवण्याच्या या धक्कादायक प्रकारानंतरही शहर पोलीस फिर्यादीच्या प्रतिक्षेत असल्याने मोठे आश्चर्य निर्माण झाले आहे.

