ध्रुव ग्लोबलच्या सारंग भालकेचे सारेगमप स्पर्धेत नेत्रदीपक यश! दोन सुवर्ण तिकिटांसह पटकाविला अंतिम फेरीत तिसरा क्रमांक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तब्बल एका तपानंतर झी वाहिनीद्वारा आयोजित करण्यात आलेल्या सारेगमप लिटील चॅम्प स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सारंग सोपान भालके याने तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. रविवारी या स्पर्धेचा ग्रँड फिनाले झाला, यावेळी त्याने एकामागून एक सरस गाणी सादर करताना परीक्षकांना आपल्याकडे आकर्षित केले. या स्पर्धेचे पहिले पारितोषिक मुंबईच्या गौरी गोसावीने तर दुसरे पारितोषिक ठाण्याच्या ओंकार कानिटकर याने पटकाविले. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल जिल्हाभरातून त्याचे कौतुक होत आहे.

संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षण घेणार्‍या सारंग सोपान भालके याची महाराष्ट्रातील हजारो बालगायकांमधून पहिल्या वीस जणांमध्ये निवड झाली होती. पात्रता फेरीत उत्तम कामगिरीच्या जोरावर मनोबल वाढलेल्या सारंगने त्यानंतर मुंबईत झालेल्या अंतिम निवड फेरीतही शैलीदार गाणी सादर करीत प्रत्यक्ष स्पर्धेसाठी निवडल्या जाणार्‍या चौदा जणांमध्ये स्थान मिळविले. गेल्या वर्षभर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या प्रत्येक भागात त्याने मराठी चित्रसृष्टीतील विविध गीतांसह भावगीते व भक्ती संगीत सादर करताना परिक्षकांकडून भरभरुन कौतुक प्राप्त केले.


या संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, कौशल इनामदार, डॉ. सलील कुलकर्णी, सुदेश भासेले, भाग्यलक्ष्मी अय्यर, वैशाली सामंत, सुबोध भावे, अमित राज, पल्लवी जोशी, नागराज मंजुळे, रवी जाधव, अलका कुबल, अ‍ॅड. उज्ज्वल निकम, सिद्धार्थ जाधव, संजय जाधव, कृष्णा मुसळे अशा विविध नावाजलेल्या मान्यवरांनी सारंगच्या गायकीचे विशेष कौतुक केले. सारेगमप लिटील चॅम्प स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी सारंगने देवा श्रीगणेशा, माऊली.. माऊली, दिल की तपीश आणि आवाज वाढव.. डीजे ही गाणी सादर करीत मुख्य स्पर्धेचे परीक्षक अन्नू कपूर, सुदेश भोसले व पंचरत्न परीक्षकांकडून वाहवा मिळविली.

अंतिम स्पर्धेत प्रवेश करणार्‍या बालगायकांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्यांनी या स्पर्धेत मोठी चुरस निर्माण केली होती. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून राज्यपातळीवरील स्पर्धेत धडक देणार्‍या सारंग भालके याने स्पर्धेदरम्यान पंचरत्न परीक्षकांकडून एक आणि गेस्ट सेलिब्रिटीकडून एक अशी दोन गोल्डन तिकिटेही मिळविली होती. अशी कामगिरी करणारा सारंग हा सारेगमप लिटील चॅम्प स्पर्धेच्या दुसर्‍या पर्वाचा एकमेव स्पर्धक ठरला. अंतिम विजेत्यांची नावे जेव्हा जाहीर झाली तेव्हा बहुतेकांना यंदाच्या लिटील चॅम्पचा किताब सारंग भालकेच पटकावणार असे वाटले होते इतके सुंदर सादरीकरण त्याने केले. या स्पर्धेच्या विजेतेपदाचा किताब मुंबईच्या गौरी गोसावीने पटकाविला, तर दुसरे पारितोषिक ठाण्याच्या ओंकार कानिटकरला व तिसरे पारितोषिक संगमनेरच्या सारंग भालकेला देण्यात आले. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *