थकीत निधी मिळवण्यासाठी ‘दिव्यांगां’चे उपोषण! सहा वर्षांपासून राखीव निधीतून पैसे मिळत नसल्याची तक्रार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिव्यांग कायद्यातील तरतूदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी पाच टक्के राखीव निधी ठेवण्याबाबत शासकीय परिपत्रक असतानाही संगमनेरातील दिव्यांग त्यापासून वंचित आहेत. वारंवार निवेदने व मागण्या करुनही पालिकेने सन 2015 पासून आजतागायत हा निधी दिला नसल्याने अखेर भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग सेनेने उपोषणाचे हत्यार उपसले असून शहराध्यक्ष पुरुषोत्तम जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली आजपासून पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला आहे. या आंदोलनात शहरातील दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जोपर्यंत राखीव निधी दिला जात नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धारही जाहीर करण्यात आला आहे.
सन 2010 साली राज्य शासनाने परिपत्रकाद्वारा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी पाच टक्के राखीन निधी ठेवण्याबाबत आदेशित केले होते. त्यासाठी दिव्यांग कायद्यातील कलम 42 व 43 च्या तरतुदींचाही हवाला देण्यात आला होता. असे असतानाही संगमनेर नगरपालिकेने सन 2015 पासून दिव्यांगांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही. याबाबत शहरातील दिव्यांगांनी वेळोवेळी पालिकेच्या पदाधिकार्यांसह प्रशासनाकडेही मागणी केली, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर आजपासून भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग सेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून आजपासून पालिकेच्या प्रवेशद्वारावरच साखळी उपोषणाद्वारा ठिय्या दिला आहे. दिव्यांग सेनेचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली उपाध्यक्ष सुनील खरे, विनायक दाभोळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अॅड. श्रीराम गणपुले, शिरीष मुळे, दीपेश ताटकर, शैलेश फटांगरे, जावेद जहागीरदार, किशोर गुप्ता, वैभव लांडगे, दीपक भगत, सीताराम मोहरीकर, मुकुंद उपरे, श्याम कोळपकर, राहुल भोईर, संदीप मोहोळ, शशांक वामन, प्रकाश दिघे, स्वप्नील लोंढे, अरविंद वाकचौरे, शुभम कोकणे, सचिन वाडेकर, संतोष पठाडे, आनंद बनभेरु, मीना जोशी, बाबासाहेब आहेर, ओंकार गजेवार, श्यामसुंदर जोशी, श्रीराम काळे, शोभा आहेर आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.