पालिकेच्या पहिल्याच सभेत छत्रपतींच्या स्मारकाचा निर्णय! उत्पन्नवाढीपर्यंत ‘मानधनावर’ही पाणी; पुढील महिन्यात ‘अतिक्रमण’ हटवणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रतिकूल राजकीय वातावरणातही आधुनिक शहराचे स्वप्नं दाखवून ऐतिहासिक विजय मिळवणार्या संगमनेर सेवा समितीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत निवडणुकीच्या पूर्वीपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमेसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती प्रतिमा व पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्र आणि शंभर फूटी तिरंगा ध्वज उभारण्याच्या निर्णयाला एकमुखाने मंजूरी देण्यात आली. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्षा डॉ.तांबे यांनी पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी साथ देण्याचे आवाहन करताना 50 कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवले व त्याची पूर्तता होईस्तोवर कोणताही सदस्य मानधन घेणार नसल्याचा ऐतिहासिक निर्णयही घेण्यात आला. या पहिल्याच सभेत विकासाच्या एकूण 36 विषयांवर चर्चा होवून त्याला मंजूरी देण्यात आली.

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास प्रबळ असला की अशक्य वाटणार्या गोष्टीही सहज शक्य होतात. याचे मूर्तीमंत उदाहरण यावेळच्या पालिका निवडणुकीतून उभे राहीले. गेल्या साडेतीन दशकांपासून असलेल्या सलग सत्तेच्या नकारात्मक मतांमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाचाही समावेश झाल्याने यावेळी सत्ताधार्यांसाठी पालिकेत सत्ता राखण्याचे मोठे आव्हान उभे राहीले होते. मात्र आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्यातील राजकीय कौशल्य पणाला लावून प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही ‘संगमनेर 2.0’च्या माध्यमातून आधुनिक शहराचे स्वप्नं दाखवताना मतदारांच्या मनात विश्वास जागृत केला आणि पालिकेच्या इतिहासात विक्रमी विजय संपादन करताना सत्ताही कायम ठेवली.

विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय स्थितीत पालिकेची सत्ता राखण्यात यश मिळाल्याने आमदार सत्यजीत तांबे यांना शहरातील विकासकामांच्या माध्यमातून सतत चर्चेत राहण्यासह प्रशासकांच्या कार्यकाळात सुसाट झालेल्या विरोधकांना नियंत्रित करण्याची संधीही मिळाली आहे. त्याचा पुढील पाच वर्षात ते परिपूर्ण वापर करतीलच अशी अपेक्षा असताना नूतन नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.23) पार पडलेल्या पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत त्याचे प्रतिबिंब दिसून आले. जवळपास 36 विषयांवर निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या सभेच्या विषय पत्रिकेत अग्रस्थानी गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमेसह भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती प्रतिमा उभारण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आली.

याशिवाय संगमनेर व परिसरात पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दीर्घ वावर राहीला आहे. त्याच्या पाऊलखुणा आजही इतिहासाच्या पानांत त्याची साक्ष देतात. त्यांचे स्मरण म्हणून अहिल्यादेवींच्या तैलचित्रासह शहरात शंभर फूटी राष्ट्रीय ध्वजासाठी स्तंभ आणि शहरात संविधान भिंतीची उभारणी या कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतूद करुन त्याला मंजूरी देण्यात आली. या सभेत शहरातील बॅनर, होर्डिंग्स, झेंंडे आणि महामार्गावरील विद्युतखांबांना कापडी पताका लावण्यासंदर्भातील नव्या धोरणांनाही मंजूरी मिळाली. त्यामुळे यापुढे ठरलेल्या ठिकाणीच ठरलेल्या ठराविक मुदतीपर्यंत फ्लेक्सद्वारा जाहिरातबाजी करता येणार आहे. शिवाय शहरातील रहदारीच्या रस्त्यावर यापुढे कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमांना मनाई करण्यात आल्याने नवीन नगररोड, नाशिक महामार्ग, बसस्थानक चौक अशा प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी होणार्या सभा व कार्यक्रमांना पायबंद बसणार आहे.

पालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातून पालिकेच्या आर्थिकस्थितीवर कटाक्ष टाकताना दीर्घकालीन उपायांवर अधिक भर दिला. त्यासाठी पालिकेच्या आजच्या अवघ्या 15 ते 18 कोटी रुपयांच्या तुटपूंजा उत्पन्नात जो पर्यंत 50 कोटी रुपयांपर्यंत वाढ होत नाही, तो पर्यंत पालिकेचा कोणताही सदस्य मासिक मानधन घेणार नसल्याचा एकमुखी ऐतिहासिक निर्णयही घेण्यात आला. नागरिकांना अधिक जलद सेवा देण्याच्या दृष्टीने प्रशासन सक्षम करण्यासह नगरसेवक व कर्मचार्यांच्या कामाचे मूल्यांकन करुन त्याचे प्रगतीपुस्तक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी मुंबईच्या ‘प्रजा’ फौंडेशन या विनामूल्य सेवा देणार्या स्वयंसेवी संस्थेशी करार करण्यास मंजूरी देण्यात आली.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानातंर्गत ‘अमृत 2.0’ योजनेच्या माध्यमातून सुधारित पाणीपुरवठा योजनेवर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ति, भूयारी गटार योजनेच्या कामांना मुदतवाढ व पूर्ण झालेल्या गटारी हस्तांतरीत करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (एसटीपी) पर्यायी खासगी जागेची मोजणी व त्याच्या खरेदीबाबतची कार्यवाही, ट्रक टर्मिनल व कवी अनंत फंदी नाट्यगृह बंदीस्तीकरणाच्या कामाला मंजूरी देण्यात आली. यासोबतच शहरातील बकालपणा कमी करण्यासाठी पुढील महिन्यात 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान शहरात वेगवेगळ्या पातळ्यांवर अतिक्रमण हटाओ मोहीमही राबवली जाणार असून तत्पूर्वी आजपासून आठवडाभर त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, महिलांना निर्भयपणाने वावरता यावे यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णयही घेण्यात आला असून अतिक्रमणादरम्यान माल जप्त करण्याच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली आहे. अरगडे गल्लीतील बंदस्थितीत असलेल्या तपासणी नाक्याची जागा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याचा प्रस्तावही या सभेत मंजूर करण्यात आला. या सोबतच शहरातील विविध रस्त्यांची कामे, घनकचरा संकलन व त्याचे निर्मूलन, शहरातील रस्त्यांवर एलईडी पथदिवे बसवण्याचा निर्णय, उद्यानांचे व्यवस्थापन, अग्निशमन विभागाची क्षमता अधिक वाढवण्यावर भर, क्षेत्रीय कार्यालय अशा वेगवेगळ्या 36 विषयांवर चर्चा होवून त्यावर निर्णय घेण्यात आला. या पहिल्याच सभेत नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांनी आपल्या कामाची दिशा निश्चित केल्याने पुढील पाच वर्ष संगमनेरच्या विकासाला कलाटणी देणारी ठरतील असे चित्र दिसू लागले आहे.

विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झाल्यापासून संगमनेरच्या राजकीय संघर्षाला मोठी धार चढली असून गेल्या वर्षभरातील अनेक प्रसंगात त्याचा प्रत्यक्ष अनुभवही संगमनेरकरांनी घेतला आहे. या कालावधीत संगमनेरच्या विकासावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष झाल्याचेही समोर आले. त्याचे प्रतिबिंब शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या फ्लेक्सद्वारा उमटू लागल्याने संगमनेरात एकप्रकारचे ‘फ्लेक्स वॉर’ सुरु होवून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत होता. निवडणुकीमध्ये विरोधकांना सभा घेण्यात अडथळे आणण्यासाठी मोक्याच्या रस्त्यांवर आधीच विनाकारण दावे करुन ठेवले गेले होते. त्यातूनही आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता पालिकेने छत्रपतींच्या स्मारकापासून ते थेट रहदारीच्या रस्त्यांवर कोणतेही कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यापर्यंतचे निर्णय घेवून विरोधकांची सर्व आयुधे निष्प्रभ केली असून पालिकेच्या पहिल्याच सभेत नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे विरोधकांना वरचढ ठरल्या आहेत.

