संगमनेर तालुक्यातील ‘म्युकरमायकोसिस’चा रुग्ण दगावला? तालुक्यातील संक्रमण आजही भरात; जिल्ह्यात सर्वाधिक साडेचारशे रुग्ण आढळले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कोविड संक्रमणाला ओहोटी लागलेली असताना संगमनेर तालुक्यात मात्र दररोज उच्चांकी रुग्ण समोर येण्याची श्रृंखला आजही कायम आहे. आज शहरातील 46 जणांसह तालुक्यातील एकूण 449 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या दिवसातील धक्कादायक वृत्त म्हणजे तालुक्यातील एका 45 वर्षीय कोविड बाधिताला उपचारादरम्यान ‘म्युकरमायकोसिस’ची लक्षणे दिसू लागल्याने त्याला नाशिकला हलविण्यात आले होते, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या वृत्ताने संगमनेरात एकच खळबळ उडाली असून संबंधित रुग्णावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यासोबतच आजही तालुक्यात उच्चांकी रुग्णवाढ झाल्याने एकूण रुग्णसंख्या आता 19 हजार 207 झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोविड संक्रमणाच्या गतीला काहीशी ओहोटी लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र त्याचवेळी अगदी सुरुवातीपासून अहमदनगरच्या पाठोपाठ रुग्णसंख्या समोर येणार्‍या संगमनेर तालुक्यातील बाधितांमध्ये मात्र दररोज मोठी भर पडत आहे. या श्रृंखलेत आजही तालुक्यातून साडेचारशे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा दोन हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून काहीसा दिलासा मिळत असल्याच्या दृष्यांनी आता पुन्हा रुग्णांच्या नातेवाईकांची रुग्णालयात खाट मिळविण्यासाठीची धावपड दाखवण्यास सुरुवात केल्याचे दिसू लागले आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेचा अवघा एक, खासगी प्रयोगशाळेचे 433 आणि रॅपिड अँटीजेनद्वारा प्राप्त 15 अहवालांतून संगमनेर तालुक्यातील 449 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यात कोतूळ येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम व श्रीरामपूर येथील नऊ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. त्यासोबतच शहरातील चैतन्य नगरमधील 50 वर्षीय इसमासह 20 वर्षीय तरुणी, सुकेवाडी रोडवरील 53 वर्षीय इसम, कुंभार गल्लीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 63 वर्षीय महिला व 42 वर्षीय तरुण, ताजणे मळा परिसरातील 33 वर्षीय तरुण, आदर्श नगरमधील 35 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 45 वर्षीय महिलेसह 31 व 24 वर्षीय तरुण, कुरण रोडवरील 44 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुण, इंदिरानगर मधील 49 वर्षीय महिलेसह 25 वर्षीय तरुण, गणेशनगरमधील 52 व 51 वर्षीय इसमासह 49 वर्षीय महिला, घोडेकर मळ्यातील 35 वर्षीय तरुण,

पंचायत समिती परिसरातील 47 वर्षीय महिला, अकोले बायपास रस्त्यावरील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नवीन नगर रस्त्यावरील 34 वर्षीय तरुण, शिवाजी नगरमधील 41 वर्षीय महिला, विद्यानगरमधील 43 वर्षीय तरुण, रहेमतनगर मधील 48 वर्षीय इसम, चावडी चौकातील 45 वर्षीय महिला, जेधे कॉलनीतील 40 वर्षीय महिला व केवळ ‘संगमनेर’ असा पत्ता नोंदविलेल्या 70 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 52 वर्षीय इसम, 43, 37, 32, 30 व 29 वर्षीय तरुण, 65, 46, 44, 39, 33 व 25 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय दोघांसह 8, 4 व एक वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. उर्वरीत 401 रुग्ण संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या खालावत असल्याचे चित्र दिसत होते. आज त्यातही काही प्रमाणात वाढ झाल्याचे प्राप्त अहवालातून समोर आले आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 331, खासगी प्रयोगशाळेचे 2 हजार 3 आणि रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 1 हजार 160 अहवालातून जिल्ह्यातील 3 हजार 494 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यात सर्वाधिक 449 रुग्ण संगमनेरातून, 388 अकोले, 304 राहुरी, 285 नगर ग्रामीण, 264 श्रीरामपूर, 241 अहमदनगर महापालिका क्षेत्र, 233 पारनेर, 231 राहाता, 211 श्रीगोंदा, 198 नेवासा, 158 पाथर्डी, 157 शेवगाव, 152 कोपरगाव, 104 कर्जत, 72 जामखेड, 26 इतर जिल्ह्यातील 16 भिंगार लष्करी परिसरातील, तीन इतर राज्यातील तर दोघे लष्करी रुग्णालयातील आहेत. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 25 हजार 609 झाली आहे.

Visits: 20 Today: 2 Total: 114900

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *