संगमनेर महाविद्यालयाची उन्नत भारत अभियानाच्या पुढील फेरीसाठी निवड
संगमनेर महाविद्यालयाची उन्नत भारत अभियानाच्या पुढील फेरीसाठी निवड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामीण विकासामध्ये महाविद्यालयीन तरुणांना सामावून घेणे व ग्रामीण समस्यांची महाविद्यालयीन तरुणांना जाणीव व्हावी या उद्देशाने मानव संसाधन विकास मंत्रालय व आयआयटी, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नत भारत अभियान हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. देशभरातून एकूण 2600 महाविद्यालयांनी व विद्यापीठांनी सदर उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यातील फक्त 78 महाविद्यालयांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद रिजनल सेंटरच्या अंतर्गत 12 जिल्ह्यातील 168 महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यातील फक्त दोन महाविद्यालयांची पुढील फेरीसाठी नुकतीच निवड करण्यात आली असून यामध्ये संगमनेर महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत पाच गावांची निवड करून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाविद्यालयाने निवड केलेल्या गावातील जवळ जवळ 2000 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले होते व त्यांची माहिती मानव संसाधन विकास मंत्रालयाला जमा करण्यात आली. या कुटुंब सर्वेक्षणासाठी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, प्राणीशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना या विभागांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सदर निवडीबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव डॉ.अनिल राठी व व्यवस्थापनातील विविध पदाधिकार्यांनी अभिनंदन केले. या उपक्रमासाठी माजी प्राचार्य डॉ.के.के.देशमुख, प्रभारी प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.आर.एस.लढ्ढा, डॉ.आर.बी.ताशिलदार तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, विभागीय समन्वयक डॉ.टी.आर.पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाच्या यशश्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ.अशोक तांबे, प्रा.संदीप देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रताप फलफले, डॉ.सचिन कदम आणि वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र व भूगोल विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.