संगमनेर बसस्थानकाच्या ‘पार्किंग’वर खासगी लॉज चालकांचा मक्ता! गचाळ व्यवस्थापनाचा सर्वोत्तम नमूना; कंत्राटदार आणि महामंडळात समन्वयाचाही अभाव..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील देखण्या वास्तूत गणना होवूनही विविध बेकायदा उद्योगांचे आगार ठरलेल्या संगमनेर बसस्थानकातील वाहनतळाचा (पार्किंग) मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर उभ्या राहिलेल्या या बसस्थानकाच्या कंत्राटदाराने व्यावसायिक गाळ्यांच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांची अनामत जमा केली. मात्र करारानुसार या अवाढव्य इमारतीच्या सुरक्षेसह व्यावसायिक गाळेधारकांकडून वसुल केलेल्या रकमेच्या बदल्यात त्यांना प्राप्त नैसर्गिक हक्कांच्या संरक्षणासह परिसराची नियमित स्वच्छता, शिस्तबद्ध आणि बसस्थानकाशी संबंधीत बाह्य वाहनतळाचा वापर, स्थानकाच्या रचनेतच असलेल्या मात्र समन्वयातून अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत असलेल्या भूमीगत वाहनतळाचा व्यावसायिक वापर, उत्तरेकडील प्रवेशद्वाराचा विषय नियमित असण्याची अपेक्षा असताना असूनही नसल्यागत आहे. त्याचा फटका हजारों प्रवाशांसह संगमनेरकरांनाही सोसावा लागत असतानाच आता या गचाळ व्यवस्थेचा लाभ घेत काही लॉज मालकांनी चक्क बसस्थानकातील व्यावसायिक गाळेधारकांच्या हक्काच्या पार्किंगवर मक्तेदारी निर्माण केली असून राजरोसपणे लॉजमध्ये मुक्कामी येणार्‍या ग्राहकांची वाहने परिसरात दाटीने उभी केली जात आहेत. हा प्रकार गाळेधारकांसह संगमनेरकरांनाही चीड आणणारा असून महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने या प्रकारांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.


राज्यातील रस्ते वाहतुकीत अतिशय वर्दळीच्या यादीत असलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर शहराला शिवकाळापासून मोठे महत्व आहे. पुणे व नाशिक या दोन महानगरांसह उत्तरेला दक्षिणेशी जोडणारे प्रवेशद्वार म्हणूनही या महामार्गाकडे पाहिले जाते. त्यामुळे अमृतवाहिनीच्या काठावर वसलेल्या संगमनेर शहराची बाजारपेठ पूर्वीपासूनच समृद्ध राहिली आहे. अगदी सातवाहनांच्या राजवटीतही संगमनेरचा ‘संगमिका’ या नावाने उल्लेख असल्याचे आढळून येते. त्यामुळे साहजिकच संगमनेर शहरातून पूर्वीपासूनच व्यापार आणि त्यातून दळणवळण होत आले आहे. जालना लुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनीही संगमनेरमार्गे रायगडावर जाण्याचा मार्ग निवडला होता. मात्र त्यात बदल करुन नंतर तो संगमनेर, पट्टेकिल्ला व नंतर रायगड असा केला गेल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो.


साहजिकच भौगोलिक रचनेनुसारचे स्थान आणि दोन महानगरांमधील मुख्य शहर म्हणून लौकीक असलेल्या संगमनेरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही तितकीच वर्दळीची आहे. त्याची प्रचिती संगमनेर बसस्थानकात दररोज चारशेहून अधिक राज्य व आंतरराज्य बसेसची वर्दळ आणि त्यातून दहा हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक होते. त्यामुळे संपूर्ण विभागात महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या या बसस्थानकाचे गेल्या दशकांत नूतनीकरण झाले. प्रशस्त फलाट व बसेसच्या येण्या-जाण्यासाठी मुबलक परिसराची अंतर्गत रचना, बाह्य बाजूला दुमजली व्यावसायिक गाळ्यांची उभारणी करुन त्या पुढील भागात गाळ्यांमध्ये येणार्‍या ग्राहकांसह स्थानकात येणार्‍यांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्थाही केली गेली. दीर्घकाळ वाहन लावून खरेदीसाठी शहरात अथवा कामानिमित्त बाहेरगावी जाणार्‍यांसाठी स्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ भूमीगत वाहनतळाची सुविधाही उभारण्यात आली.


प्रत्यक्षात मात्र गेल्या पाच-सात वर्षात ‘बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ या तत्वावर उभारलेल्या या बसस्थानकाच्या कंत्राटदार व विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यांमधील समन्वयाच्या अभावाने नूतन बसस्थानक आकाराला आल्यापासूनच त्याच्या बाह्यबाजूच्या सुरक्षा व स्वच्छतेसह व्यावसायिक गाळेधारकांकडून वसुल केलेल्या लाखों रुपयांच्या अनामत रकमेच्या बदल्यात त्यांना नैसर्गिक हक्काने मिळालेल्या वाहनतळाची सुविधाही त्यांना कधीच मिळाली नाही. हास्यास्पद म्हणजे, अंतर्गत बाजूच्या सुरक्षा व स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणारे आगारप्रमुख बाह्यबाजूची जबाबदारी घेण्यास मात्र टाळाटाळ करतात. याचा अर्थ संबंधित कंत्राटदारासोबतच्या करारानुसार खासगी व्यावसायिक कारणांसाठी वापरात असलेल्या परिसराची जबाबदारी ठरलेल्या कालावधीपर्यंत त्याच्याकडे असण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्याकडून त्याची अंमलबजावणी करवून घेण्याचे अधिकार अहिल्यानगरच्या उपविभागीय कार्यालयाच्या बांधकाम विभागाकडे असल्याने आणि हा विभाग नेहमीच चर्चेतला असल्याने त्याचा फटका हजारो प्रवाशांसह व्यावसायिकांनाही सोसावा लागत असताना आता हा नवाच प्रकार समोर आला आहे.


अतिरीक्त मलाई लाटण्याच्या नादात ठेकेदाराने सोयीस्करपणे सोडून दिलेल्या असंख्य त्रूटींचा गैरफायदा घेत बसस्थानकाच्या आवारात वाढलेली अस्वच्छता, अवैध निवारा, अमलीपदार्थांचे सेवन, मद्यपान, वेश्यागमन अशा उद्योगांमध्ये आता यापैकी काही उद्योगांमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या काही लॉजसह बसस्थानकासमोरील अन्य काही लॉजच्या मालकांनी त्यांच्या लॉजमध्ये मुक्कामी येणार्‍या ग्राहकांच्या वाहनांसाठी चक्क संगमनेर बसस्थानकाच्या प्रशस्त जागेचा फूकटात वापर सुरु केला आहे. रात्री-अपरात्री लॉजमध्ये आलेल्या ग्राहकांची वाहने रात्रीच्यावेळी मोकळ्या असलेल्या बसस्थानकातील व्यावसायिक गाळ्यांसमोर बिनधास्तपणे उभी केली जात असून त्याचा मोठा फटका लाखों रुपयांच्या अनामत रकमेसह कोट्यवधींची गुंतवणूक करुन व्यवसाय उभारणार्‍यांना सहन करावा लागत आहे.


राज्य परिवहन महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांनी आपल्या कर्तव्याला जागून कंत्राटदारासोबत झालेल्या कराराप्रमाणे त्याची अंमलबजावणी करवून घेण्याची गरज आहे. बसस्थानकाच्या व्यावसायिक गाळ्यांसाठी 20 लाखांपासून 75 लाखांपर्यंतची अनामत घेतली गेल्याची चर्चा आहे. याचा अर्थ संबंधित ठेकेदाराने या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांची अनामत रक्कम जमा केली आहे. मात्र असे असूनही त्याच्याकडून गाळेधारकांना मुलभूत सुविधाही दिल्या जात नसल्याने या प्रकरणात विभागीय कार्यालय आणि संबंधित कंत्राटदार यांची मिलीभगत तर नाही अशीही शंका निर्माण होवू लागली आहे.


जिल्ह्यातील देखण्या आणि प्रशस्त इमारतींमध्ये गणल्या जाणार्‍या संगमनेर बसस्थानकाच्या सुरक्षा आणि व्यवस्थेबाबत नेहमीच प्रश्‍न निर्माण झाले आहेत. प्रचंड वर्दळीच्या या बसस्थानकातून महिलांच्या गळ्यातील आभूषणांसह अलिकडच्या काळात पर्स अथवा बॅगांमध्ये ठेवलेल्या चीजवस्तूही लंपास होवू लागल्याने चोरट्यांची नेहमीच भीती असते. प्रशस्त परिसर आणि प्रवाशांच्या वर्दळीतून पोटाचा प्रश्‍न सुटत असल्याने निराधारांच्या हक्काचे निवारा केंद्र म्हणूनही संगमनेर बसस्थानक आता ओळखले जाते. प्रवेशद्वारातच ठाण मांडून अस्ताव्यस्त पहुडलेले भीक्षेकरी जणू आपला हक्कच सांगत असतात, दुसरीकडे सुरक्षेच्या अभावाने आसपासच्या अंधारात, दुसर्‍या मजल्यावरील गाळ्यांकडे जाणार्‍या जीन्यात वेश्यागमनासह अमलीपदार्थांचे सेवनही सुरु असते. काही दिवसांपूर्वी तर काही तरुण चक्क प्रवेशद्वारात बसून मद्याचे सेवन करीत असल्याची छायाचित्रेही व्हायरल झाली होती. त्यातून केवळ वैभवशाली इमारत असलेल्या मात्र त्याखाली असंख्य अवैध व्यवसायांची केंद्र असलेल्या या अनधिकृत मक्तेदारीत आता बसस्थानकासमोरील लॉज मालकांचीही ‘एन्ट्री’ झाली असून त्यांनी राजरोसपणे त्यांच्या ग्राहकांची वाहने बसस्थानकात लाखों रुपयांचा चुराडा करुन सुरु केलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांसमोर लावण्यास सुरुवात केल्याने येथील व्यावसायिकांच्या संयमाचा आता अंत होवू लागला असून आगारप्रमुखांनी वेळीच त्याची दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा एखादा मोठा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Visits: 87 Today: 2 Total: 1423872

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *