महसूल कर्मचार्‍यांचे दुसर्‍या दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच निलंबनाचा निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाभर आंदोलनाचा इशारा


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील मातुलठाण येथे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवून मंडलाधिकारी व तलाठी यांना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निलंबित केले आहे. या निर्णयाविरोधात महसूल कर्मचार्‍यांचे गुरुवारी (ता.१८) दुसर्‍या दिवशीही कामबंद आंदोलन सुरुच होते. सदरचा निर्णय मागे न घेतल्यास सोमवारपासून जिल्हाभर काम बंद आंदोलन सुरु केले जाईल, असा इशारा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष राजेश घोरपडे यांनी दिला आहे.

सदरचा निलंबनाचा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी दिवसभर तलाठी व मंडलाधिकारी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी श्रीरामपूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून होते. १४ जानेवारी रोजी अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई झाली. त्या कारवाईच्या वेळेस व पंचनाम्याच्या वेळी ते उपस्थित होते. त्यामुळे मंडलाधिकारी व तलाठी या दोघांचे निलंबन हे अन्यायकारक असल्यामुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने सुरु केलेल्या कामबंद आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरुच होते.

या संदर्भात सायंकाळी संघटनेच्यावतीने शिर्डी येथे जावून अपर जिल्हाधिकारी कार्यालयासही निवेदन देण्यात आले आहे. निलंबनाचा निर्णय मागे न घेतल्यास सोमवारपासून जिल्हाभर कामबंद आंदोलन सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत हासे, राज्य उपाध्यक्ष संतोष तनपुरे, जिल्हा सचिव महेश सुद्रीक, राजेश घोरपडे, बाबासाहेब कदम, संजय डाके आदिंसह जिल्हाभरातील तलाठी व मंडलाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *