कोपरगाव पालिकेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचा राजीनामा
कोपरगाव पालिकेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचा राजीनामा
विवेक कोल्हेंच्या आदेशावरुन राजीनामा दिला असल्याची तालुक्यात चर्चा
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष तथा शिवसेना नगरसेवक योगेश बागुल यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे सुपुत्र व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या आदेशावरुन उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नुकताच उपमुख्याधिकरी सुनील गोर्डे यांच्याकडे दिल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. यामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव पालिकेवर सध्या भाजप-शिवेसना युतीची सत्ता आहे. तर नगराध्यक्ष विजय वहाडणे जनतेतून निवडून आले आहेत. मात्र, शिवसेनेच्या कुठल्याही वरीष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता योगेश बागुल यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना गोटात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या गटनेत्यानेच पक्षश्रेष्ठींना डावलल्याने बागुल यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. आता या प्रकरणात शिवसेनेचे वरीष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात व केंद्रात भाजप-शिवसेनेची युती तुटून दोन्ही पक्ष आमने-सामने आले असले तरी शिवसेनेचे काही नगरसेवक स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी भाजप सोबत कायम असल्याची चर्चा आहे.

एरव्ही, विविध कारणांनी कोपरगाव पालिका चर्चेत असते. त्यातच भाजप-शिवसेनेची युती तुटलेली असताना शिवसेनेचे गटनेते भाजपच्या माजी आमदारांच्या सुपुत्राचे आदेश कसे काय पाळतात? हे न उलगडणारे कोडे शिवसैनिकांना पडले आहे. यामुळे गटनेतेपदाचा देखील योगेश बागुल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कोपरगावचे शिवसैनिक करत आहेत. त्यामुळे बागुल यांच्या भूमिकेसह शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

