‘पी.आय. साहेब’, थोडं वाहतूक व्यवस्थेकडेही लक्ष द्या! शहराच्या सर्वच रस्त्यांवर बेशिस्तीचा कहर; भररस्त्यात ‘पार्किंग’ वाहनांची दाटी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही वर्षात संगमनेरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड भर पडूनही वाहतूक व्यवस्थेबाबत मात्र यंत्रणा गंभीर नसल्याने त्याचे दुष्परिणाम आता समोर येवू लागले आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने तासातासाला वाहतूक कोंडी होत असून सर्वसामान्य माणसांना त्यात अडकून पडण्याची वेळ येत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवूनही पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने शहराच्या बेशिस्त वाहतूक व्यवस्थेत दररोज वाढ होत असून त्यात आता भररस्त्यात कोठेही चारचाकी वाहने उभी करुन बिनधास्त खरेदीसाठी जाणार्‍या ‘अक्कलशून्य’ वाहनधारकांची आणि भंगारातील धोकादायक रिक्षा घेवून प्रवाशी वाहतूक करणार्‍यांचीही मोठी भर पडल्याने संगमनेरची वाहतूक व्यवस्था व्हेंटीलेटरवर गेली आहे. त्यातून मेटाकूटीला आलेल्या सामान्य नागरिकांना ‘पी.आय.साहेब, थोडं वाहतुकीकडेही बघा’ अशी विनवणी करण्याची वेळ आली आहे.


संगमनेर शहराच्या बाजारपेठेला ऐतिहासिक महत्व असल्याने शहरात खाद्यपदार्थांपासून सोन्या-चांदीच्या दालनांपर्यंतची असंख्य दुकाने थाटलेली आहेत. आसपासच्या तालुक्यातील ग्राहकांचाही येथील बाजारपेठेत वाढता राबता असल्याने पूर्वीपासूनच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. त्यातच पुणे-नाशिक हा राष्ट्रीय आणि कोल्हार-घोटी हा राज्यमार्गही शहराच्या हृदयातून जात असल्याने पुणे-नाशिक या महानगरांच्या दिशेने प्रवास करणार्‍यांची संख्याही खूप मोठी असते. अलिकडच्या काळात संगमनेर शहरातील वाहनमालकांची संख्याही शतपटीने वाढली आहे, त्याचवेळी शहरातंर्गत वाहतुकीचे रस्ते मात्र आहेत तितकेच असल्याने एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने वाहने सामावून घेण्याची या रस्त्यांची क्षमताच नसल्याने वारंवार वाहनांची कोंडी होत आहे.


नेत्यांच्या भाषणांमधून वैभवशाली शहराचा धिंडोरा पिटाळला जात असला तरीही प्रत्यक्षात मात्र संपूर्ण शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे आणि रोजच नव्याने भर पडणार्‍या अतिक्रमणांमुळेही शहराच्या बेशिस्तीत वाढ होत असून गावठाणात विस्तारलेल्या बाजारपेठेकडे जाणारे सर्वच रस्ते अशा अतिक्रमणधारकांनी व्यापल्याचे भयानक चित्रही सर्वच रस्त्यांवर बघायला मिळते. त्यातही अलिकडे हातात येणारा पैसा वाढल्याने घराघरातील चारचाकी वाहनांची संख्याही वेगाने वाढली आहे. प्रत्यक्षात मात्र यातील अनेक चारचाकी धारकांना वाहतूक नियमांबाबत व शहरात आल्यानंतर वाहने कोठे व कशी उभी करावी याबाबत कोणतीही सामाजिक अक्कलच नसल्याने नवीननगररोड, लिंकरोड, हॉटेल काश्मिर ते बी.एड्.कॉलेज रस्ता, बसस्थानकाचा परिसर, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ते जूना कटारिया कॉर्नर,


अशोक चौक ते स्वातंत्र्यचौक, मेनरोड अशा सगळ्याच रस्त्यांवर अतिक्रमणांसह बिनधास्त चारचाकी वाहने उभी करुन खरेदीसाठी दुकानांमध्ये जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम आधीच अरुंद असलेल्या या सर्वच रस्त्यांवर वारंवार वाहनांचा खोळंबा होत असून काही रस्त्यांवर एकएक तास नागरिकांना खोळंबून बसावे लागत आहे. यासर्व गोष्टी कमी आहेत म्हणून की काय म्हणून त्यात अलिकडे भंगारातील प्रवाशी रिक्षांचीही मोठी भर पडल्याने आणि अशा रिक्षाधारकांनी कायदा व नियमांना डांगेवर ठेवून मनाला येईल तेथे परस्पर रिक्षाथांबे निर्माण केल्याने वाहतुकीच्या बाबतीत संगमनेर जिल्ह्यात सर्वात गचाळ ठरु लागले आहे.


गेल्या मे महिन्यात जिल्ह्याचा पदभार स्वीकारणार्‍या पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी संगमनेरची वाहतूक व्यवस्था पाहुन नाक मुरडताना बंद स्थितीत असलेले सिग्नल सुरु करुन त्याद्वारे वाहतुकीचे संचालन करण्याचा प्राथमिक उपायही सूचवला होता. जवळपास सहा महिन्यांपूर्वी त्यांनी सूचवलेल्या उपायानुसार हॉटेल काश्मिर, अकोलेनाका व दिल्लीनाका या तीन ठिकाणची सिग्नल व्यवस्था सुरुही करण्यात आली, मात्र स्थानिक पोलिसांनी मनुष्यबळाचे कारण देत आपल्याच अधिक्षकांच्या आदेशाला फाट्यावर फाडल्याने स्वच्छेने नियमांचे पालन करणार्‍यांना सोडून त्याचाही प्रभावी वापर होत नसल्याचे आता समोर येत आहे.


शहरातील या गचाळ व्यवस्थेबाबत नूतन पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्याशीही माध्यमांनी वारंवार संवाद साधला, मात्र प्रत्येकवेळी त्यांनीही सिग्नलचे नियमन, वाहतूक शाखेचे पुनरुज्जीवन आणि बेकायदा रिक्षांवर कारवाई ही त्रिसूत्री राबवणार असल्याचे ‘राजकीय’ आश्‍वासन देत दरवेळी माध्यमांचीही बोळवण करण्याची कला हस्तगत केल्याने सद्यस्थितीत संगमनेरच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेला कोणीही वाली नसल्याचे दुर्दैवी चित्र बघायला मिळत आहे. संगमनेरकरांना रोजच्या या त्रासातून मुक्तिचा कोणताही मार्ग दिसत नसल्याने पोलिसांबाबत नाराजी निर्माण होवू लागली आहे, त्यातूनच ‘पी.आय.साहेब, थोडं इकडेही बघा’ अशा विडंबनात्मक शब्दांचाही जन्म होवू लागला असून पोलिसांनी वेळीच त्यामागील कारणांचा शोध घेवून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारताना त्यांना शिस्तीचा धडा देण्याची गरज आहे.


दोन लोकप्रतिनिधींच्या कारणाने गेल्या वर्षभरापासून संगमनेरचे राजकीय वातावरण सतत तप्त असून प्रत्येक कामाच्या दुहेरी लाभासाठी या नेत्यांसह त्यांच्या समर्थकांमधून श्रेयवादही सुरु असतो. मात्र ज्या गोष्टीमुळे सामान्य संगमनेरकर रोजच त्रस्त होतोय त्या वाहतूक समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात अथवा त्यावरुन श्रेय लाटण्यात मात्र संबंधित पुढारी मागे सरकत असल्याने शहरात पालिका, पोलीस व पुढार्‍यांबाबतही नाराजी निर्माण होवू लागली असून शहराची गचाळ वाहतूक व्यवस्था ही ओळख पुसण्यासाठी ठोस कृतीचा आग्रह सुरु होवू लागला आहे.

Visits: 192 Today: 5 Total: 1417158

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *