संगमनेरातील दोन ‘किशोर’चा पालिकेतील करिष्मा कायम! प्रभागात नगराध्यक्षांपेक्षा अधिक मतं; महायुतीला एकाही प्रभागातून आघाडी नाही..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या मोठ्या काळापासून पालिका सभागृहात वावरणार्‍या मात्र लोकमानसात ‘जनसेवक’ अशी प्रतिमा ठासून भरलेल्या संगमनेरातील दोन ‘किशोर’चा करिष्मा आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकांच्या मतांमधून मिळालेल्या पदाचा सुयोग्य वापर करुन लोकसंपर्क आणि जनसेवा कशी करावी याचे मूर्तीमंत उदाहरण निर्माण करणार्‍या या दोघांनी सलग निवडणुकीचा सामना करताना मतदारांवरील आपला प्रभाव सिद्ध करीत संपूर्ण शहरात ‘सत्यजीत’ नावाच्या ‘त्सुनामी’तून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या त्यांच्या पत्नीच्या पारड्यात मतांची लाट उसळलेली असताना आपल्या दोघांचेही प्रभाग मात्र त्याला अपवाद ठरवले. कोविड संक्रमणासह पदाचा अधिकारही संपुष्टात आलेला असताना या दोघांनी त्याचा कोणताही अभिनिवेश न बाळगता प्रभागातील लोकांच्या आरोळीला प्रतिसाद देत आपला नियमित जनसंपर्क कायम ठेवला. गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय काळातही लोकांची कामे करुन देण्यात या दोघांनी कोणतीही कसर सोडली नाही, परिणामस्वरुप एकावर प्रभाग बदलण्याचा, तर, दुसर्‍यावर ज्येष्ठतेचा दबाव असतानाही त्यांनी आपल्या प्रभागातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापेक्षा अधिक मतं मिळवली. अर्थात या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांना एकाही प्रभागातून मताधिक्क्य मिळाले नाही.


राजकीय जाणकारांच्या डोक्याला झींग आणणार्‍या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी अनेक नवनवीन विक्रमही नोंदवले आहेत. सुरुवातीला महायुतीच्या बाजूने झुकलेल्या या निवडणुकीत विधासभेच्या लाटेवर आणि नकारात्मक वातावरणाच्या भरवशावर गाफील राहिलेल्या महायुतीला मात्र मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. मित्रपक्षांशी विसंवाद, उमेदवार निवडीतील गोंधळ, जागा वाटपातील असमाधान, मराठा उमेदवार देण्याची चूक आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा सामना करताना समन्वयाचा आणि स्थानिक विकासाच्या प्रभावी मुद्द्यांचा अभाव या कारणांनी महायुतीचा दारुण पराभव झाला. माजी शहरप्रमुख आप्पा केसेकर यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या साक्षी सूर्यवंशी या एकमेव महिला नगरसेविकेशिवाय या निवडणुकीत महायुतीचे सभागृहातील अस्तित्वही संपुष्टात आले.


दुसरीकडे सलग सत्तेच्या कारणाने मतदारांमध्ये निर्माण झालेल्या नकारात्मक लाटेशिवाय विरोधी गटाला मिळणारी राजकीय रसद, प्रशासकीय बळ, विधानसभा निवडणुकीतील यशाचे प्रतिबिंब या प्रमुख गोष्टींसह प्रत्येक निवडणुकीत दिसणारे चेहरे डावलून चारित्र्यवानांचा शोध घेण्यापासून निवडणूक चिन्हापर्यंतचा संघर्ष असलेल्या सत्ताधारी गटाने मात्र सुयोग्य नियोजन, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपल्या नव्या निवडणूक चिन्हासह त्यांना पुढील पाच वर्षांच्या विकासाचे आपले व्हिजन पटवून देण्यात यश मिळवले. विरोधकांच्या चाळीस वर्षांच्या आरोपांना फार महत्व न देता, आमदार तांबे यांनी सकारात्मक राजकारणावर अधिक भर दिल्याने त्याचे परिणामही निवडणूक निकालातून दिसून आले.
उमेदवारांची निवड करताना जुन्यांना डावलण्याची कसरतही त्यांनी लिलया पेलली. मात्र त्याचवेळी सभागृहातील समतोल राखण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीमुळे मतदारांमध्ये काहीशी नकारात्मकता असलेल्या दिलीप पुंड, नितिन अभंग, शैलेश कलंत्री, विश्‍वास मुर्तडक, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे व किशोर पवार यांना मात्र पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. प्रचारासाठी मिळालेल्या कमी कालावधीतही त्यांनी वातावरणातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी ‘संगमनेर 2.0’ ही संकल्पना समोर आणून त्यात लोकसहभाग मागवला. लोकांना शहर विकासाबाबत मतं मांडण्याची संधी मिळाल्याने नऊ हजारांहून अधिक संगमनेरकरांनी त्यात सहभाग घेवून बारा हजारांहून अधिक सूचना मांडल्या.


या दरम्यान प्रभागनिहाय गाठीभेटी आणि सभांमधून त्यांनी विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्याला कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्‍वासन देत लोकांचा विश्‍वासही संपादन केला. विरोधकांकडून होणार्‍या बहुतेक आरोपांकडे दुर्लक्ष करीत त्यांनी प्रभागातील विषयांनाही स्पर्श केल्याने लोकांना पालिकेची निवडणूक आपली वाटू लागली. आपल्या मनातील ‘व्हिजन’ पुढील पाच वर्षात पूर्ण करण्याचे स्वप्नं घेवून मतदारांसमोर गेलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी त्याच्या पूर्ततेसाठी डॉ.मैथिली तांबे आणि त्यांच्या सोबत नव्या-जुन्यांचा, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिंचा मेळ घालून सक्षम टीम तयार केल्याची आणि विकासाठी ही टीम ठेकेदारी विरहीत काम करणार असल्याची त्यांची ग्वाही मतदारांना भावली.
दुसरीकडे पोषक वातावरण असतानाही केंद्र व राज्य सरकारांचा संदर्भ देवून संगमनेरच्या विकासाचा रोडमॅप समोर ठेवून मतदारांसमोर विकासाचा मुद्दा घेवून जाण्याऐवजी महायुतीने थोरात-तांबेंच्या 40 वर्षांच्या सत्तास्थानाची उणीदुणी काढण्यातच प्रचाराचा कालावधी दवडला. प्रभागांमधील सभांमध्ये स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे सोडून राज्यस्तरीय विषयांसह विधानसभेप्रमाणेच ही निवडणूक हिंदूत्वाकडे झुकवण्याकडे अधिक भर दिला गेला. महायुतीच्या या नकारात्मक प्रचाराला संगमनेरकरांनी मात्र साफ धुडकावले. त्यातच घराणेशाहीचा आरोप करुन विधानसभा गाजवल्यानंतर वर्षभरातच त्याचा विसर पडल्याचा मुद्दाही मतदारांच्या पचनी पडला नाही. त्याचा परिणाम प्रतिकूल वातावरण असतानाही संगमनेरात ‘सत्यजीत’ नावाची ‘त्सुनामी’ निर्माण झाली, त्याच्या मतरुपी लाटा उसळून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, त्यांच्या पत्नी मैथिली तांबे विक्रमी मतांनी निवडून आल्या.


शहराच्या सर्वच्या सर्व 15 प्रभागांनी संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ.मैथिली तांबे यांना भरभरुन मतदान केले. अगदी विरोधात कौल देणार्‍या प्रभाग क्रमांक 13 मधूनही त्यांना शंभराहून अधिक मतं मिळाली आहेत. तर, प्रभाग क्रमांक 15 मधून सेवा समितीच्या नसीमबानो इसहाकखान पठाण यांचा तब्बल 909 मतांनी पराभव होवूनही या प्रभागाने डॉ.मैथिली तांबे यांच्या पारड्यात संगमनेरातील सर्वाधीक 3 हजार 179 मतांचे दान टाकले, या प्रभागात महायुतीच्या सुवर्णा खताळ यांना अवघी 82 मतं मिळाली. यावरुन आमदार सत्यजीत तांबे यांच्या सकारात्मक राजकारणाला संगमनेरकरांनी कौल दिल्याचे दिसून येत असतानाच शहरातील काही प्रभागांमध्ये पुन्हा संधी मिळालेल्या अनुभवी उमेदवारांची लोकप्रियताही टिकून असल्याचे समोर आले. त्यात वरील नावांचा समावेश असला तरीही त्यात यावेळी राजकीय अडचणीच्या कारणास्तव पारंपरिक प्रभाग बदलण्याची वेळ येवूनही किशोर पवार यांनी सलग तिसर्‍यांदा भरघोस मतदान घेताना आपल्या प्रभागातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापेक्षा 147 मतं अधिक मिळवली.


त्याचवेळी प्रभाग क्रमांक बारामधून सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या किशोर टोकसे यांचाही त्यांच्या पारंपरिक प्रभागात मोठा वरचष्मा असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेश ढोले यांचा दुसर्‍या क्रमांकाच्या विक्रमी एक हजार 470 मतांनी पराभव करीत दोन हजार 226 मतांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ.मैथिली तांबे यांच्यापेक्षा 293 मतं अधिक मिळवली. या दोघांना मिळालेली भरघोस मतं त्यांच्या प्रभागातील मतदारांनी अधिकाराशिवाय त्यांनी केलेल्या जनसेवेची पावतीच असून सलग तीन-चार वेळा निवडणुकांचा सामना करुनही संगमनेरातील या दोघा ‘किशोर’चा त्यांच्या प्रभागातील करिष्मा सिद्ध करणारा आहे.


संगमनेर सेवा समितीच्यावतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण अकरा माजी नगरसेवक उमेदवारांमध्ये किशोर टोकसे आणि किशोर पवार या दोघांची सुरुवातीपासूनच चर्चा होती. प्रदीर्घकाळानंतर होणार्‍या निवडणुका, पालिकेतील सत्ताधार्‍यांविषयी निर्माण झालेली सत्तेची नकारात्मकता आणि विधानसभेच्या परिवर्तनातील वातावरणाची शक्यता यामुळे यावेळी दोनपेक्षा अधिकवेळा नगरसेवकपद उपभोगलेल्यांना नारळ दिला जाईल असेच चित्र होते. मात्र या दोघांनीही आपल्या नेतृत्वाला शेवटपर्यंत आपले महत्त्व पटवून देत अखेर उमेदवारी पदरात पाडली. प्रचारादरम्यान आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही या दोघांबाबत काही वावड्या उठवण्यात आल्या होत्या. मात्र त्या फोल ठरवताना संगमनेरच्या या दोघाही ‘किशोर’नी देदीप्यमान यश मिळवताना पालिकेच्या सभागृहात दिमाखाने प्रवेश मिळवला आहे.

Visits: 110 Today: 2 Total: 1415747

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *