बनावट कागदपत्रान्वये ‘पोक्सो’ भोवला! चार महिन्यांपूर्वीचे प्रकार; आता तक्रारदारच आरोपी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकमेकांशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून चार महिन्यांपूर्वी उडालेल्या धुमश्‍चक्रीत एका गटाने दुसर्‍या गटातील लोकांविरोधात घातक शस्त्रांसह हल्ला करण्यासोबतच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘पोक्सो’तंर्गत तक्रार दाखल केली होती. त्यावरुन घारगाव पोलिसांनी शेंडेवाडीतील 26 जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हाही दाखल केला होता. कालांतराने या सर्वांनी न्यायाकडून अटकपूर्व जामीन मिळवला. या दरम्यान वरील प्रकरणातील आरोपी मयूर अशोक वामन याला फिर्यादीने बनावट जन्मदाखल्याचा वापर करुन ‘पोक्सो’ दाखल केल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर फिर्यादीने पोलिसांना खोटे जन्म प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याने घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून वरील 26 जणांवरील ‘पोक्सो’चे कलम वगळण्यासह मूळ तक्रारीच्या फिर्यादीवरही बनावट व खोटे दस्तऐवज तयार करुन त्याचा वापर केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार 19 एप्रिलरोजी तालुक्याच्या पठारावरील हिवरगाव पठार परिसरात घडला होता. या घटनेत परिसरातील एकाने बनावट कागदपत्रातील फिर्यादी व मूळ प्रकरणातील आरोपी मयूर अशोक वामन (वय 22) याच्यासह आदेश अशोक वामन, आदिनाथ अशोक वामन, योगेश सखाराम उगले, तुकाराम लक्ष्मण कारंडे, भाऊ अनाजी वामन, सुमनबाई सखाराम उगले, अशोक लहानु वामन, पप्पू अशोक वामन, गणेश जयवंत वामन, सार्थक बाळू वामन, प्रणव शिवाजी वामन, दीपक शंकर घुगे, पप्पू छबू काळे, रामचंद्र साहेबराव काळे, वसंत अनाजी वामन, शिवाजी अनाजी वामन, जयवंत अनाजी वामन, संदेश वसंत वामन, लहानु नानाभाऊ वामन, अनाजी नानाभाऊ वामन, बापू शंकर डूबे, अमित अशोक वामन, राहुल करंडे, बबलु बाळासाहेब शेंडगे व सचिन गजानन चितळकर,


यांनी पूर्ववैमनस्यातून आपल्या कुटुंबियांवर सशस्त्र हल्ला करुन आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावरुन घारगाव पोलिसांनी वरील 26 जणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 326, 324, 327, 354, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. नंतरच्या कालावधीत या सर्वांनी संगमनेरच्या न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला. मात्र फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीबाबत आरोपींना संशय असल्याने अटकपूर्व मिळाल्यानंतर त्यांनी यामागील सत्यता शोधण्यास सुरुवात केली. मूळ प्रकरणातील फिर्यादीने पुरावा म्हणून आपल्या मुलीच्या जन्मतारखेसाठी शाळा सोडल्याचा दाखला जोडला होता, त्यावर मुलीची जन्मतारीख 6/6/2006 अशी खाडाखोड करुन लिहिली गेली होती.


त्यावरुन पहिल्या प्रकरणातील आरोपी मयूर वामन याने सदरील शाळेत माहिती अधिकारात अर्ज देवून माहिती मिळवली असता मूळ प्रकरणातील तक्रारदाराची बनावटगिरी उघड झाली. शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील मुलीचा जन्म 11/03/2006 रोजी झाल्याचे स्पष्ट झाले. याचाच अर्थ ज्या दिवशी सदरील गुन्हा घडला त्या दिवशी प्रकरणात अल्पवयीन म्हणून दाखवण्यात आलेल्या मुलीचे वय 18 वर्ष एक महिना व सात दिवसांचे होते. त्यामुळे मयूर वामन यांनी न्यायालयात दाद मागून वरील प्रकरणातील ‘पोक्सो’चे कलम कमी करवून घेतले व त्यानंतर घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.


त्यावरुन पोलिसांनी मूळप्रकरणातील फिर्यादी विरोधात बनावट कागदपत्रे तयार करणे, त्यांचा वापर करुन दिशाभूल करण्यासह भारतीय न्यायसंहितेतील अन्य तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने पठारभागात खळबळ उडाली असून फिर्यादीच आरोपी होण्याच्या निराळ्या प्रकरणाची खमंग चर्चा सुरु झाली आहे.

Visits: 10 Today: 2 Total: 29219

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *