श्रीरामपूर तालुक्यात विविध गावांतून 98 हरकती मतदाराचे नाव, प्रभागातील बदल, प्रभाग रचनांमधील फरक अशा विविध हरकती

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा मतदार यादी कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. 1 डिसेंबर रोजी मतदार याद्या जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर हरकती घेण्यासाठी सोमवारी (ता.7) अंतिम मुदत होती. यामध्ये तालुक्यातील विविध गावांतून 98 हरकती प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

प्रभागनिहाय 27 ग्रामपंचायतींच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. अंतिम प्रभाग रचना 25 सप्टेंबर रोजी प्रसिध्द केलेल्या विधानसभा मतदार याद्यांनुसार तलाठी कार्यालय, मंडलाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयासह पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालयातील सूचना फलकांवर प्रसिध्द केल्या होत्या. त्यावर हरकत नोंदवण्यासाठी सोमवारपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यावर 98 हरकती प्राप्त झाल्या आहेत.

त्यामध्ये मतदाराचे नाव आणि प्रभागातील बदल, प्रभाग रचनांमधील फरक अशा स्वरूपाच्या हरकती घेतल्या आहेत. गळनिंब, खोकर, पढेगाव, नायगाव, सराला, गोवर्धनपूर, वडाळा महादेव, गोंडेगाव, मुठेवाडगाव, ब्राह्मणगाव वेताळ, मातापूर, निपाणी वडगावसाठी प्रत्येकी एक तर महांकाळवडगाव, मातुलठाण ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी दोन आणि एकलहरे सहा, घुमनदेव सात, टाकळीभान 15, भेर्डापूर 15, बेलापूर 27 हरकती अशा 98 हरकती असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

Visits: 105 Today: 1 Total: 1106004

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *