शिक्षणसम्राट डॉ.भानुदास डेरे यांना पोलिसांकडून अटक! मुलीनेच केली जीवे मारण्याच्या प्रयत्नाची तक्रार; विभक्त असलेल्या आईसोबत असल्याचा राग..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रुग्णालय आणि रिसर्च सेंटर सुरु असलेली जागा खाली करण्यासह विभक्त राहत असलेल्या पत्नीला साथ देत असल्याच्या रागातून थेट रुग्णालयात चारचाकी वाहन घुसवून कर्मचार्यांना जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह रुग्णालयाचे नुकसान केल्या प्रकरणी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख, शिक्षणसम्राट डॉ.भानुदास डेरे यांना पहाटे अटक करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्या कन्या डॉ.एकता वाबळे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेत पहाटे तीनच्या सुमारास कारागृहात टाकले. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या वृत्ताने संगमनेरच्या वैद्यकिय क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातही खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.18) गुंजाळवाडी शिवारातील संजीवन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. सामान्यपणे रुग्णालयातील कामकाज सुरु असताना डॉ.भानुदास डेरे आपल्या फॉर्च्युनर कारने (क्र.एम.एच.17/डी.जे.1419) स्वतः वाहन चालवत आले व त्यांनी थेट रुग्णालयाच्या प्रतिक्षा कक्षात वाहन घुसवून स्वागतकक्षाचे काम करणारा कर्मचारी मयूर राजेंद्र अभंग (रा.दाढ बु.) याच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून त्याने अतिदक्षता विभागात पळ काढल्याने त्याचा जीव वाचला.

या दरम्यान वाहनाच्या जोरदार धडकेने प्रतिक्षा कक्षासह स्वागत कक्षातील सर्व काचा फुटून मोठे नुकसानही झाले. मात्र त्या उपरांतही डॉ.डेरे यांच्यासोबत असलेला त्याचा स्वीय्य सहाय्यक सोमनाथ पवार याने कर्मचार्यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली. हा सगळा प्रकार सुरु असताना त्यांच्या कन्या व संजीवनी रुग्णालयाच्या संचालक डॉ.एकता वाबळे तेथे आल्या व त्यांनी आपल्या वडिलांना ताबडतोब निघून जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी शिवीगाळ करीत जागा खाली करण्याची धमकी देत आरडाओरड सुरुच ठेवला. त्यावेळी त्यांचा सहाय्यक पवार ‘डॉक्टर साहेब, तुम्ही बिनधास्त गाडी पुढे घ्या, आज एकेकाला संपूवनच टाका..’ असे म्हणत आगीत तेल टाकीत होता.

सुरु असलेला प्रकार पाहता काहीतरी अनर्थ घडेल अशी शंका आल्याने डॉ.वाबळे यांनी पोलिसांना बोलावण्याचा इशारा दिल्यानंतर डॉ.भानुदास डेरे आपल्या सहाय्यकासह तेथून निघून गेले. या प्रकरणी मध्यरात्री डॉ.एकता वाबळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यात त्यांनी वरील घटनाक्रम सांगताना त्यामागे विभक्त राहणार्या त्यांच्या मातोश्रींना साथ देत असल्याच्या रागातून यापूर्वीही अशाप्रकारच्या वादाची आणि त्यातून संजीवन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरची जागा खाली करण्यासाठी दबाव आणल्याची पार्श्वभूमीही त्यांनी नमूद केली आहे.

त्यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेतील जीवे ठार मारण्याच्या कलम 109 सह 351 (3), 352, 3 (5) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी आज पहाटे तीन वाजता त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार असून पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे. या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्याच्या वैद्यकिय क्षेत्रासह शिक्षणक्षेत्रातही एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या आहेत.

