प्रिया धांडे आणि श्रेया वाकचौरे ठरल्या ‘गरबा क्वीन’ च्या मानकरी 

नायक वृत्तसेवा,अकोले 
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या गरबा महोत्सवात मोठ्या गटात प्रिया धांडे आणि लहान गटात श्रेया वाकचौरे या दोघी ‘गरबा क्वीन’ च्या मानकरी ठरल्या.
बुधवारी संस्थेतील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, महिला पालक व विद्यार्थिनींसाठी ‘अभिनव गरबा महोत्सव २०२५’ चे आयोजन  अभिनव शिक्षण संकुलात करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमास उपस्थित अभिनव शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष तथा कॅम्पस डायरेक्टर प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, सहसचिव प्राचार्या अल्फोन्सा  डी., वसुंधरा अकॅडेमीच्या उपप्राचार्या राधिका नवले, गरबा महोत्सवाचे परीक्षक  रुचिरा देसाई व  निकिता पालवे यांच्या हस्ते आदिशक्ती व विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या गरबा महोत्सवात ११२ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट या प्रकारात घेण्यात आली. उत्तम गरबा सादरीकरण, वेशभूषा, चेहऱ्यावरील हावभाव, नृत्य कौशल्य इत्यादी निकषांवर आधारित परीक्षण करण्यात आले व स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या गरबा महोत्सवात लहान गटात  श्रेया वाकचौरे गरबा क्वीनची मानकरी ठरली तर मोठ्या गटात प्रिया धांडे यांनी गरबा क्वीनचा बहुमान मिळवला. या दोन्ही विजेत्यांना  मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व क्राऊन प्रदान करून गौरविण्यात आले.  त्याचबरोबर लहान गटात बेस्ट डान्सरचा मान सिद्धी देशमुख व सिद्धी वाकचौरे यांनी मिळवला तर मोठ्या गटात बेस्ट डान्सरचा मान प्राजक्ता वाकचौरे व  संगीता वाळुंज यांनी मिळवला. या सर्व बेस्ट डान्सर्सला ट्रॉफी देऊन सन्मानित केले. संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. जयश्री देशमुख यांनी या गरबा महोत्सवात हिरीरीने व उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे  विशेष कौतुक करत अभिनंदन केले. या गरबा महोत्सवाचे संयोजक म्हणून इंद्रभान कोल्हाळ, प्रशांत दिवेकर, काव्या कदम व अश्विनी काळे यांनी काम पाहिले.  सूत्रसंचालन अश्विनी काळे यांनी केले.
Visits: 69 Today: 1 Total: 1110800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *