..तो पर्यंत संगमनेर मतदारसंघातला सत्कार घेणार नाही : डॉ.सुजय विखे पा. शिबलापूरच्या सबस्टेशनवरुन थोरातांवर टीका; सहकारातल्या राजकीय ‘सहकारावरही’ भाष्य..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजकारण केवळ आश्‍वासनांवर चालत नाही. तर, त्यासाठी कृतीतून जनतेचा विश्‍वास जिंकावा लागतो. संगमनेर तालुक्याच्या माजी आमदारांनी आजवर फक्त द्वेषाचे आणि खालच्या पातळीवरचे राजकारण केले. नुसती आश्‍वासने द्यायची आणि हसायचे सोडून त्यांनी काहीच कामं केले नसल्याचा हल्लाबोल करीत माजी खासदार डॉ.सुजय विखे पा. यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर कोरडे ओढले. आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि पूर्ण करतो. त्यानंतरच मतदाराकडे मतं मागायला जातो अशी पृष्टी जोडताना त्यांनी जो पर्यंत तळेगांव-निमोण भागासह साकूरला पिण्याचे पाणी देणार नाही, तो पर्यंत संगमनेर तालुक्यातील एकही सत्कार स्वीकारणार नसल्याची घोषणाही यावेळी केली. शिबलापूर येथील वीज उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.


जिल्ह्यातील विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष राज्याला नवा नाही. ज्या ज्या वेळी दोन्ही नेत्यांना एकमेकांवर राजकीय आसूड ओढण्याची संधी मिळाली, त्या त्या वेळी त्यांनी त्याचा खुबीने वापर केल्याचेही असंख्य दाखले आहेत. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या या राजकीय संघर्षात एकमेकांच्या राजकीय अस्तित्वाला नख लावण्याचा मात्र कधीही प्रयत्न झाला नव्हता. त्यामुळे अनेक प्रसंगात दोन्ही नेत्यांचे एकमेकांशी राजकीय ‘सख्य’ असल्याच्याही चर्चा व्हायच्या. मात्र दोन वर्षांपूर्वी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोपरगावच्या विवेक कोल्हे यांना सोबत घेत गणेशनगर ताब्यात घेतला, त्या पाठोपाठ लोकसभा निवडणुकीत थेट दक्षिणेत जावून डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात यंत्रणा राबवली आणि त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरले. तेथून या दोघांमधील राजकीय संघर्षाला अधिक धार चढली.


माजीमंत्री थोरात यांचा पराभव करणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या विषयाला हात घालताना डॉ.विखे पाटील यांनी संगमनेरच्या आमदारासाठी फक्त सहा ठिकाणी घेतलेल्या सभा आत्मविश्‍वास निर्माण करणार्‍या ठरल्याचे सांगितले. संगमनेरची जनता विकासाच्या पाठीशी असल्याचे या सभांमधून दिसून आले. प्रचारादरम्यान माजी आमदारांनी केलेल्या कामगिरीचा आलेख मांडायचे सोडून केवळ द्वेष आणि नकारात्मक राजकारण करुन पातळी सोडली. त्यांची ही खेळी त्यांच्याच अंगलट आली आणि संगमनेरकरांनी त्यांना नाकारले असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. नुकत्याच पार पडलेल्या संगमनेर आणि प्रवरानगर साखर कारखाना निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केले.

सहकारात राजकारण आले तर सहकार संपेल आणि सहकार संपला तर शेतकरी संपेल. त्यामुळे शेतकरी व शेती जिवंत राहण्यासाठी सहकारात राजकारण आणायचे नाही या पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील यांच्या सिद्धांताचा आदर करुनच ‘प्रवरानगर‘ आणि ‘संगमनेर’च्या निवडणुका बिनविरोध केल्याचे ते म्हणाले. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात कितीही राजकीय मतभेद असले तरीही दोघांनी मनाचा मोठेपणा दाखवल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जुन केला. सहकारातही राजकारणातला सहकार टिकला म्हणूनच माजी खासदार प्रवरानगरला आणि माजी आमदार संगमनेरला चेअरमन झाल्याची मिश्किल टिपण्णीही माजी खासदार डॉ.विखे-पाटील यांनी यावेळी केली.


राजकारण केवळ आश्‍वासनांवर चालत नाही तर, त्याला कृतीची जोड देवून लोकांचा विश्‍वास जिंकावा लागतो असे सांगताना त्यांनी पुन्हा एकदा माजीमंत्री थोरात यांचे थेट नाव टाळून त्यांच्यावर तोफ डागली. ‘त्यांनी’ फक्त द्वेष आणि नकारात्मक राजकारण करीत पातळी सोडली. लोकांना केवळ आश्‍वासने द्यायची आणि ती पूर्ण करण्याचे सोडून फक्त हसायचे इतकेच काम त्यांनी केल्याची जहरी टीकाही माजी खासदारांनी केली. आम्ही दिलेला शब्द पाळतो, तो पूर्ण करतो आणि त्यांनतरच मतदारांच्या दारात जातो. तळेगाव-निमोण भागात भोजापूर चारीची आणि साकूर भागात उपसा जलसिंचन योजनेची मागणी आहे. जो पर्यंत या दोन्ही ठिकाणच्या लोकांना पाणी देणार नाही तो पर्यंत संगमनेर तालुक्यातील कोणताही सत्कार स्वीकारणार नाही अशी घोषणाही डॉ.सुजय विखे-पाटील यांनी केली.


आपल्या भाषणादरम्यान चौफेर टोलेबाजी करणार्‍या डॉ.सुजय विखे-पाटील यांनी माजी खासदार व भावी आमदार या विषयावरही मिश्किल मात्र राजकीय इशारा देणारी टिपण्णी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आता आमची गाडी रुळावर आली आहे. त्यामुळे ‘ते’ माझे भावी खासदारकीचे स्वप्नं पूर्ण होवू देत नाहीत, तो पर्यंत त्यांचे भावी आमदार होण्याचे स्वप्नं पूर्ण होईल की नाही याची खात्री नाही. विशेष म्हणजे पुढच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना होण्याची व जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यातही आरक्षण मुक्त होणार्‍या शिर्डी मतदारसंघात कोपरगाव, राहाता, संगमनेर आणि अकोले या चारच विधानसभा मतदार संघांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहाता आणि संगमनेर या दोन मतदारसंघात वर्चस्व राहिल्यास निवडणूक सोपी असल्याने माजी खासदारांनी शिबलापूरच्या सबस्टेशनवरुन दिलेला इशारा अतिशय ‘सूचक’ मानला जात आहे.

Visits: 658 Today: 6 Total: 1111520

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *