चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

नायक वृत्तसेवा, अकोले
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना तालुक्यातील आतिदुर्गम भाग असणाऱ्या रतनवाडीतून समोर आली आहे. याप्रकरणी राजुर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी पती फरार झाला आहे. चांगुनाबाई लहू झाडे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून लहू महादू झडे असे आरोपी पतीचे नाव आहे.

याबाबत राजूर पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, रतनवाडी येथील लहू महादू झडे याने पत्नी चांगुणाबाई (वय २९) हिच्यावर संशय घेतला. त्यातून झालेल्या मारहाणीत लहू याने पत्नी चांगुणा हिस काठीने हात आणि पायावर गंभीर मारहाण करून जखमी केले. ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांचे राहते घरी घडली होती. घटनेनंतर चांगुनाबाई हिच्यावर घोटीच्या समर्थ सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान तिचा दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मयत चांगुणा हिची बहीण हरणी महादू वळे (वय ३३ रा. पेंडशेत ता.अकोले, मूळ रा. सुभाष रेसिडेन्सी टिटवाळा ईस्ट ता. कल्याण जिल्हा ठाणे) हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लहू महादू झडे याच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्याकडून त्याचा कसून शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Visits: 77 Today: 1 Total: 1114833
