पालिकेच्या बांधकाम पथकावर नवघर गल्लीत एकाचा हल्ला! पाडलेल्या शौचालयाचे टाकाऊ साहित्य उचलण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यावर वीट भिरकावली

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नूतन शौचालयाच्या आखणीसाठी तेथील रॅबीट सामान उचलण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या बांधकाम विभागाच्या पथकावर एकाने दगडासह हल्ला केला. या हल्ल्यातून पालिकेचा जेसीबी चालक बालंबाल बचावला. विशेष म्हणजे पूर्वी होते त्याच ठिकाणी शौचालय बांधावे अशी त्या इसमाची मागणी होती, आणि पालिका कर्मचारी त्यासाठीच तेथे गेले होते. दोन्ही पक्षाकडून संवादाचा अभाव असल्यानेच पालिकेच्या स्थापत्य अभियंत्याची उपस्थिती असूनही ही घटना घडली. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेची अद्याप पोलीस दप्तरी नोंद झालेली नाही.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.17) सकाळी पालिकेचे बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंता पंकज मुंगसे यांच्या नेतृत्त्वाखाली एक जेसीबी, एक ट्रॅक्टर व एका लिपीकासह सहा मजुरांचा ताफा बागवानपुर्‍यातील पाडलेल्या शौचालयाचे रॅबीट सामान उचलण्यासाठी गेले होते. यावेळी कारवाई सुरु होण्यापूर्वीच तेथील एक युवक हातात मोठी वीट घेवून जेसीबीच्या दिशेने धावला. यावेळी तेथे उपस्थित सात ते आठ महिला पालिकेच्या कर्मचार्‍यांना दुशणं देत पालिकेच्या नावानं बोटं मोडीत होत्या व त्या तरुणाला तसं करण्यासाठी एकप्रकारे प्रोत्साहनच देत होत्या.

अतिशय आवेशात आलेल्या सदर तरुणाने अव्वाच्च शब्दांचा वापर करीत एका हातात वीट आणि दुसर्‍या हातात मोबाईल धरुन सिनेस्टाईल धावत गेला. यावेळी पालिकेचे लिपीक बाळासाहेब कुळधरण पुढे धावले व त्यांनी सदर तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो तरुण त्यांच्यावरच धावून गेला. त्याने त्याच्या हातातली मोठी वीटही त्यांना भिरकावून मारली. मात्र कुळधरण वेळीच खाली वाकल्याने ते बालंबाल बचावले, अन्यथा घातच झाला असता. या प्रकाराने भेदरलेल्या पालिकेच्या पथकाने त्यानंतर काम बंद करुन माघार घेतली.


बुधवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराची संपूर्ण माहिती मुख्याधिकारी सचिन बांगर यांना देण्यात आली. सायंकाळी उशीराने पालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांनी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची भेट घेतली. यावेळी पो.नि.देशमुख यांनी संबंधितांना रीतसर तक्रार दाखल करण्याची सूचना केली होती. मात्र या घटनेला 36 तासांहून अधिक वेळ होवूनही पालिकेकडून कोणतीही तक्रार झाली नसल्याने पालिका संबंधिताला पाठीशी घालीत असल्याचे दिसते. या वर्षाच्या अखेरीस पालिकेच्या निवडणुका होणार आहेत हे दखील तक्रार दाखल न होण्यामागील कारण असू शकते.


नवघर गल्लीतील इंदिरा गार्डनच्या मागील बाजूस पालिकेचे स्वच्छतागृह होते. काही महिन्यांपूर्वी नागरिकांचा मोठा विरोध झुगारुन पालिकेच्या एका विद्यमान पदाधिकार्‍याचा अट्टाहास पुरविण्यासाठी ते जमीनदोस्त करण्यात आले. नागरिकांच्या वाढत्या मागणीतून निर्माण झालेल्या दबावामुळे पालिकेला पुन्हा तेथेच शौचालय उभे करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तो पर्यंत त्याच जागी मोबाईल शौचालय उभे करण्यात आले आहे हे विशेष. आता केवळ संवादाच्या अभावातून थेट पालिका पथकावरच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार घडला, मात्र कारवाई झाली नाही.

Visits: 128 Today: 1 Total: 1779914

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *