पोलिसांच्या हद्दीच्या वादात महिला तक्रारदाराची तीन दिवस फरफट! शहर पोलीस ठाण्यातील प्रकार; आता घारगाव पोलीस करणार बसस्थानकावरील चोरीचा तपास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
केवळ वैभवशाली इमारत म्हणून लौकिकास आलेले संगमनेर बसस्थानक चोर्‍या, गंठण लांबविण्याचे सततचे प्रकार, अनैतिक व्यापाराचे केंद्र म्हणून अलिकडे उदयास येत आहे. आजवर शहरातील या मध्यवर्ती ठिकाणाहून शेकडो महिलांच्या गळ्यातील दागिने आणि प्रवाशांची रोकड लंपास झाली आहे. मात्र त्यातील एकाही घटनेचा छडा लावण्यात पोलीस सपशेल अपयशीच ठरले आहेत. अशा एकामागून एक घटनांमधून पोलिसांची निष्क्रियता ठळक होत असताना आता त्यात कामचुकारपणाचीही भर पडली आहे. याचा अनुभव शहरातील एका शिक्षक पत्नीलाच आला असून बसस्थानकावरील चोरट्यांनी त्यांचे चार तोळ्यांचे दागिने लांबवूनही शहर पोलिसांनी हद्दीचा मुद्दा उपस्थित करुन त्यांना घारगाव पोलीस ठाण्यातच फिर्याद देण्यास भाग पाडले आहे. तीन दिवस चाललेल्या त्या महिलेच्या फरफटीनंतर अखेर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संगमनेर बसस्थानकावर झालेल्या चोरीचा तपास आता चक्क चाळीस किलोमीटर अंतरावरील घारगाव पोलीस करणार आहेत.

याबाबतची वास्तव माहिती अशी की, संगमनेरातील मालदाड रोडवर राहणार्‍या कविता सुरेश साळुंके या गेल्या मंगळवारी (28 मार्च) संगमनेर बसस्थानकातून ‘संगमनेर-साकूर‘ या बसने पिंपळगाव देपा येथे जाण्यास निघाल्या होत्या. संगमनेरच्या बसस्थानकावर चोरट्यांचे साम्राज्य असल्याची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी आपल्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण घरातून निघण्यापूर्वीच आपल्या पर्समध्ये ठेवले व त्यानंतर त्या बसस्थानकावर आल्या. काहीवेळ वाट पाहिल्यानंतर दुपारी तीन वाजता संगमनेर आगाराची ‘संगमनेर-साकूर’ ही बस फलाटावर आली. या बसमध्ये बाजारहाट व अन्य कामांसाठी संगमनेरमध्ये आलेल्या पठारभागातील नागरिकांची नेहमीच गर्दी असते, तशी ती मंगळवारीही होती.

नाशिकडे जाणार्‍या गाड्यांच्या बाजूला लागलेल्या या बसमध्ये चढण्यासाठी उसळलेल्या गर्दीत सदरील महिलाही सामील झाली आणि रेटारेटीत बसमध्ये चढली. काही क्षणातच संगमनेरपासून प्रवास सुरू होवून साकूरपर्यंत धावणार्‍या या बसने संगमनरचे बसस्थानक सोडले. शटलसेवा असल्याने रस्त्यात येणार्‍या विविध गावांचे थांबे घेत-घेत ही बस साधारणतः तासाभरानंतर सायंकाळी चारच्या सुमारास पिंपळगाव देपा येथे पोहोचली आणि त्यातून प्रवास करणार्‍या कविता साळुंके त्यातून खाली उतरल्या. त्याही पुढे त्यांना मोधळवाडीला जायचे असल्याने त्यांनी रस्त्यावरुन जाणार्‍या दुचाकीस्वारांना हात दाखवून एकाच्या मदतीने त्या आपल्या आई-वडिलांच्या गावी मोधळवाडीत पोहोचल्या.

आपल्या लेकीला पाहून आनंदलेल्या त्यांच्या आईची नजर लेकीच्या गळ्यावर पडताच त्यांनी; ‘तुझे गंठण कुठे आहे?’ असा प्रश्न केला. त्यावर कविता साळुंके यांनी बसस्थानकातील वाढत्या चोरीच्या प्रकारांमुळे पर्समध्ये ठेवल्याचे सांगत पर्स उघडली असता त्यात गंठण नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे काही क्षणांपूर्वी आई आणि लेकीच्या भेटीने आनंदीत झालेले वातावरण क्षणात दुखःत बदलले आणि रडारड सुरू झाली. याबाबत त्या गृहिणीने शिक्षक असलेल्या आपल्या पतीलाही घडला प्रकार कथन केला. मोधळवाडीतून पुन्हा संगमनेरात आल्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास दोघेही पती-पत्नी गंठण खरेदी केल्याच्या बिलासह शहर पोलीस ठाण्यात आले व त्यांनी घडला प्रकार ठाणे अंमलदारांना सांगितला. त्यावरुन अंमलदारांच्या मनातील ‘हद्द’ जागली आणि त्यांनी ‘साहेब नाहीत, उद्या सकाळी या..’ असे म्हणत त्यांची बोळवण करीत त्यांना रात्री अकरा वाजता माघारी पाठवले.

त्यानुसार साळुंके दाम्पत्य घरी गेले व दुसर्‍या दिवशी (ता.29) पुन्हा शहर पोलीस ठाण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांचीच उलट तपासणी घेत त्यांना कायदा, कलमे आणि तरतुदी सांगण्याचा वर्ग घेतला व अखेर एका कर्मचार्‍याला बसस्थानकावर पाठवून सीसीटीव्ही तपासण्यास सांगण्यात आले. त्यानुसार घडलेही, सदरची महिला बसस्थानकात आल्याचे, तेथे वावरत असल्याचे व नंतर पलिकडील बाजूच्या फलाटावर गाडी आल्यानंतर इतर लोकांच्या बरोबरीने गाडीकडे धावतानाही दिसून आले, मात्र त्यात पोलिसांना थेट चोरी करताना कोणी दिसून न आल्याने हा प्रकार संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाच नसल्याचा साक्षात्कारही पोलिसांना झाला.

त्यामुळे या सगळ्या गोष्टी करुनही त्यांना जेथे लक्षात आले, तेथील पोलीस ठाण्यात म्हणजेच घारगावला जावून तक्रार देण्याचा ‘मौलिक’ सल्ला देण्यात आला. यावेळी ती महिला सदरचा प्रकार संगमनेर बसस्थानकातच घडल्याचे वारंवार सांगत होती, मात्र पोलिसांना जणू माहिती असल्याप्रमाणे ते त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा आपलेच रेटण्याचा प्रयत्न करीत राहिले आणि अखेर नाईलाजाने त्या दाम्पत्याला घटना घडल्याचा संशय असल्याच्या ठिकाणापासून 40 किलामीटर अंतरावर जावून घारगाव पोलीस ठाण्यात आपली तक्रार द्यावी लागली. त्यावरुन चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आता संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकात गंठण गेल्याचा संशय असलेल्या प्रकरणाचा तपास ‘घारगाव‘चे पोलीस करणार आहेत. ही घटना आणि त्यानंतर तीन दिवस एका महिला तक्रारदाराची झालेली फरफट पोलिसांच्या कामचुकारपणाचेच दर्शनही घडवून गेली.

संगमनेरात गंठणचोरीचे पेव फुटल्यानंतर गेल्या काही वर्षात चालू बसमध्ये अशाप्रकारची घटना घडल्याचे एकही उदाहरण ऐकीवात नाही. संगमनेर तालुक्यात घडलेल्या अशाप्रकारच्या एकूण घटनांमधील जवळपास 98 टक्के घटना या एकट्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडलेल्या आहेत. इतका मोठा इतिहास समोर असतानाही शहर पोलिसांनी जेथे लक्षात आले, तेथेच तक्रार करण्याचा आग्रह करणे आणि सदरची घटना चालत्या बसमध्येच घडल्याचे तक्रारदाराच्या मनावर बळजोरीने बिंबवण्याचा प्रकार केला आणि त्यात तक्रारदाराच्या नाईलाजाने का होईना शहर पोलिसांना त्यात यशही आले आहे.


एकीकडे राज्यसरकार महिला सबलीकरणाचा घोष करीत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सवलतीचा उपहार देत असतांना दुसरीकडे त्याच सरकारचे घटक असलेले पोलीस मात्र महिलांची फरफट करण्यातच धन्यता मानत आहेत. खरेतर संगमनेर बसस्थानकात एकामागून एक घडत असलेल्या अशाप्रकारच्या घटनांवरुन सदरची घटनाही घडली असेल असे समजून पोलिसांनी सदरचा गुन्हा स्थानिक पातळीवरच नोंदवण्याची गरज होती, प्रत्यक्षात मात्र हद्दीचा आणि नियमांचा विषय समोर करुन शहर पोलिसांनी आपल्या खांद्यावरील ओझे घारगाव पोलिसांच्या खांद्यावर लोटले आहे. हा प्रकार राज्य सरकारच्या महिला सशक्तीकरण धोरणालाच हरताळ फासणारा आहे.

Visits: 307 Today: 1 Total: 1419587

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *