पालिकेतील भ्रष्ट ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करा : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपालिकेत अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन, गटारी स्वच्छता आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून दोषी आणि भ्रष्ट ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले.

शहरातील दिल्ली नाका येथे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत भूमिगत गटार काँक्रिटीकरण सुधारणा तसेच सर्व्हिस रोड तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन आ. खताळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जावेद जहागीरदार, माजी नगरसेवक ॲड. श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, तालुका प्रमुख रामभाऊ राहणे,आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, रोहित चौधरी, वरद बागुल, ऋषिकेश मुळे, सौरभ देशमुख, राहुल भोईर, गोकुळ दिघे,नासिर शेख,बबलू काझी,मजहर शेख,मुझफ्फर जहागीरदार, कांचन ढोरे, मेघा भगत, रेश्मा खांडरे, उषा कपिले, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. खताळ म्हणाले की,गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा गटारीचे आणि रस्त्याच्या कामाचे ठेके मर्जीतल्या ठेकेदाराला दिले. पालिकेवर मोर्चा काढायला सुद्धा तेच ठेकेदार पुढे होते. संगमनेर नगरपालिकेत काँग्रेसच्या कार्यकाळात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने या बाबतची माहिती माझ्या कार्यालयात द्या, त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू असेही आ. खताळ यावेळी म्हणाले.

दिल्ली नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्विस रस्ता होणे गरजेचे आहे, तसा आग्रह मी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धरला होता. त्यांनी तात्काळ नागरी दलित वस्ती सुधार योजनेतुन १ कोटी ५१ लाख ६९ हजार रुपये या कामासाठी मंजूर केले. या निधीतून कामाची सुरुवात करण्यात आली आहे. ठेकेदाराने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. ‘न खाऊंगा, ना खाने दूंगा’ ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली, तीच भूमिका आपण संगमनेर येथील विकास कामांबाबत घेत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदाराने हे काम वेळेत पूर्ण करावे, कामाचा दर्जा उत्तम राहील याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. मला माझ्या कुटुंबातील कोणाला राजकारणात आणायचे नाही. मला फक्त लोकांचे प्रेम आणि विश्वास हवा आहे, त्यामुळे विकास कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे असे त्यांनी ठेकेदारांना ठणकावून सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, माजी नगरसेवक शिरीष मुळे, मजहर शेख यांनी मनोगत व्यक्त केले.प्रस्ताविक मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले, सूत्रसंचालन अजित जाधव यांनी तर आभार नगर अभियंता प्रशांत जुन्नरे यांनी मानले.

शहरात एसटीपी प्लांट उभा करण्याचा काहींनी घाट घातला आहे, मात्र तो प्लांट इतरत्र हलविण्यासाठी मी तुमच्याबरोबर राहील. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे निधी आणण्यासाठी आणि विकासाचा वेग साधण्यासाठी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाभिमुख उमेदवार निवडून द्या असे आवाहनही आ.अमोल खताळ यांनी यावेळी केले.

Visits: 61 Today: 3 Total: 1103139
