पंचनामा करताना तलाठ्यास सर्पदंश!

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी गेलेले तलाठी आकाश काशिकेदार यांना गुरुवार दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी सर्पदंश झाला. ही घटना घडताच ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची रुग्णालयात जाऊन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी भेट घेत विचारपूस केली.

गेल्या पंधरवड्यापासून जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या सुचनेनुसार तलाठी आणि ग्रामसेवक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दसऱ्याचा सण असूनही सकाळी ८ वाजल्यापासून तलाठी आकाश काशिकेदार शेतांची पाहणी करत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतकरी सुहास काळे, संदिप काळे व प्रमोद काळे यांच्या शेताकडे जातांना गवतात दबा धरून बसलेल्या सापावर त्यांचा पाय पडला. सापाने दंश करताच काशिकेदार यांना चक्कर येऊ लागली. सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ त्यांना उचलून जवळील वस्तीवर आणले आणि तेथून चारचाकी वाहनाने जामखेड येथे दाखल केले.

तलाठी काशिकेदार यांना रुग्णालयात पोहोचवण्यात शेतकरी सुहास काळे, संदिप काळे, वैभव काळे, अनिल काळे, पवन काळे व मनोज काळे यांनी तातडीने मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळे तलाठी काशिकेदार यांचा जीव वाचविणे शक्य झाले. घटनेची माहिती समजताच सभापती प्रा. राम शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन काशिकेदार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी देखील हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रकृतीची चौकशी केली.

Visits: 93 Today: 3 Total: 1107488
