जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून ‘एलसीबी’ची सफाई! दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; अनेकांची वतने झाली खालसा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही वर्षात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अक्षरशः धिंगाणा घालीत तपासाला आलेले गुन्हेच ‘गायब’ करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील अंतरही संपुष्टात येवून पोलिसच गुन्हेगारांची भूमिका बजावत असल्याचे भयानक चित्रही जिल्ह्याला बघायला मिळाले. त्या विरोधात दक्षिणेच्या खासदारांनी मोठा गाजावाजा करुन गेल्यावर्षी उपोषणही केले. मात्र दोनच दिवसात ‘एलसीबी’ने त्यांनाही लिंबूपाणी पाजून आपल्या टोळीत सहभागी करुन घेतल्याने सर्वसामान्यांच्या मनात जिल्ह्यातील पोलिसांबाबत अविश्‍वासाचे वातावरण निर्माण होवून पोलिसांची प्रतिमाही मलिन झाली होती. सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकपदाची सूत्रे घेताच पहिला कटाक्ष एलसीबीतील अनागोंदीकडे टाकताना ‘विशेष पथक’ स्थापन केले होते, त्यावरुन त्यांचा हेतू स्पष्ट झाल्यानंतर दैनिक नायकने वेळोवेळी जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध व्यवसायांकडे त्यांचे लक्ष वेधताना गेल्या 29 जुलैच्या अंकातून निलंबित उपनिरीक्षक तुषार धाकराव याच्या दीडकोटीच्या लुटीचा धागा पकडून स्थानिक गुन्हेशाखेत गेली वर्षोनुवर्ष ठाण मांडलेल्या वतनदारांसह अन्य विभागात नियुक्ती असतानाही ‘एलसीबी’त सेवा बजावणार्‍यांच्या मुद्द्यावर झोत टाकला होता. मलिन झालेली पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असल्याचे त्या वृत्तातून विशद् करण्यात आले होते. त्याची दखल घेत पोलीस अधिक्षकांनी एलसीबीतील सगळ्याच वतनदारांची ‘सफाई’ केली असून ‘क्वॉलिटी’च्या जोरावर नव्या 39 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.


जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दित घडणार्‍या गुन्हेगारी घटना आणि अवैध व्यवसायांवर थेट नियंत्रण असावे यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेची रचना केलेली आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील राजकीय उलथापालथ आणि त्यातून राजकारण्यांचे दुर्लक्ष याचा नेमका फायदा घेत अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हेशाखेने सायबर सेलमध्ये नियुक्ति असूनही संपूर्ण ‘एलसीबी’चे संचालन करणार्‍या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या नेतृत्वाखाली गुन्ह्यांच्या तपासाचा नवा फंडा विकसित करुन जिल्ह्यात घडणार्‍या मोठ्या रकमेच्या चोर्‍या, दरोडे व सोनसाखळी चोरीसारख्या मोजक्या गुन्ह्यांना तपासावर घेत त्याचे मूळ शोधण्यास सुरुवात केली. त्यातून चोरट्यांकडून हस्तगत झालेला मुद्देमालही परस्पर गायब करण्यात आला.


तपासाची व्याप्ती वाढवून कोणत्याही कायदेशीर नोंदीशिवाय चोरीचे सोने घेणार्‍या सोनारांनाही खिंडीत धरुन त्यांच्याकडून कितीतरी पटीने सोने लुटून नेले गेले. संगमनेरातही अशा घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे यातील काही प्रकरणात चोरटे एलसीबीच्या हाती लागूनही मुद्देमालच गायब केला गेल्याने अशाप्रकरणातून संबंधित चोरटे कायमस्वरुपी ‘अज्ञात’ होवून पुन्हा आपल्या प्रपंचातही गुंतले. याशिवाय जिल्ह्यात चालणार्‍या अवैध व्यवसायांनाही मोठ्या प्रमाणात बळ दिले गेल्याने पूर्वी जिल्ह्यात अभावाने मिळणार्‍या अंमलीपदार्थांचाही सुळसुळाट झाला, त्यातून आजची तरुणपिढी ‘एमडी’ सारख्या भयानक नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाणही वाढले. गांजा, बेकायदा दारु यासह मटका, जुगार, बिंगो या गोष्टीतर सर्वत्र सर्रासपणे दिसत होत्या. ज्या गुन्ह्याच्या तपासात ‘नोटा’ त्याच प्रकरणांवर लक्ष केंद्रीत करुन गेल्या दोन वर्षात स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अक्षरशः धिंगाणा घातला होता.


त्यामुळे एलसीबीकडून नागवल्या गेलेल्या नागरिक, सोनार, व्यापारी, तक्रारदार आणि आरोपींच्या नातेवाईकांनी आक्रोश करण्यास सुरुवात केल्याने जनतेचा उमाळा फुटलेल्या दक्षिणेच्या खासदारांनी एलसीबीच्या वसुलीची 27 कोटी रुपयांची यादी प्रसारीत करुन पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयासमोरच ठिय्या दिला. दोन दिवसांच्या या नाट्यानंतर एलसीबीने त्यांनाही लिंबूपाणी पाजून त्यांनाही आपल्यातच सामील करुन घेतल्याची जोरदार चर्चाही त्यावेळी जिल्ह्यात झाली. त्यामुळे काहीतरी कारवाई होईल अशी अशा बाळगून ‘त्या’ उपोषणाकडे पाहणार्‍या पीडितांची घोर निराशा झाली. त्यातूनच एलसीबीला आणखी बळ मिळाले आणि अर्निबंध झालेल्या तुषार धाकराव सारख्या वतनदाराने आपली टोळी सोबत घेत कायद्याचा ‘धाक’ ढाब्यावर बसवून चक्क ‘ग्रो-मोअर’च्या संचालकाला दीडकोटीचा गंडा घातला.


जिल्ह्यातील भंगार व्यावसायिकांवरही या खात्याचे विशेष लक्ष असल्याने या व्यवसायाला गेल्या दोन वर्षात मोठी चालना मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. चोरीला गेलेल्या दुचाकी काही मिनिटांतच अदृष्य केल्या जाणार्‍या अशा ठिकाणांना अभय मिळाल्याने सामान्य माणसाच्या मनात गुन्हेगारांपेक्षा पोलिसांचीच भिती निर्माण झाल्याचे भयानक दृष्य या दोन वर्षाच्या काळात जिल्ह्याने अनुभवले. त्यातून पोलिसांची प्रतिमाही कधीनव्हे इतकी मलिन झाली. ते सुधारण्याचे आव्हान घेवून जिल्हा पोलीस अधिक्षपदाचा पदभार स्वीकारणार्‍या सोमनाथ घार्गे यांनी सुरुवातीपासूनच आपला हेतू स्पष्ट केला असून गेली वर्षोनुवर्ष स्थानिक गुन्हे शाखेत ठाण मांडून वतनदारी करणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधून ‘क्वॉलिटी’चा शोध घेवून 39 नवीन शिलेदारांना पुढील पाच वर्ष एलसीबीत नियुक्ति दिली आहे.


त्यांच्या या निर्णयाने गेल्या दोन वर्षात अतिशय खालावलेली पोलिसांची प्रतिमा उजळण्यास मोठी मदत होणार असून यापुढील कालावधीत या शाखेच्या प्रत्यक्ष कामातून त्याची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक्षकांच्या या निर्णयाने जिल्ह्यात समाधान निर्माण झाले असून महाराष्ट्र पोलिसांच्या पराक्रमी परंपरेचे जिल्हा पोलिसांकडून सक्तिने पालन केले जाईल अशी अपेक्षाही आता व्यक्त होत आहे.


जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी तब्बल चार वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेत मोठ्या प्रमाणात फेरबदल करुन वतनदारांप्रमाणे ठाण मांडून बसलेल्या 39 जणांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने एलसीबीकडूनच्या जिल्हावासियांच्या अपेक्षा पुन्हा जागृत झाल्या आहेत. चाळीसगावहून थेट एलसीबीच्या सेनापतीपदावर नियुक्त झालेल्या पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्त्वाखाली यापुढील काळात ही शाखा लोकाभिमुख काम करेल आणि गेल्या दोन वर्षात काळवंडलेली पोलीस दलाची प्रतिमाही पुन्हा स्वच्छ करुन जनमानसाच्या मनात आपले स्थान पुनःस्थापित करेल अशी अपेक्षा सामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Visits: 128 Today: 1 Total: 1415276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *