शनिवारी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या ओसंडणार! जोर नाही पण संततधार सुरु; मुळा व निळवंडे धरणाचीही क्षमतेच्या दिशेने आगेकूच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आठवडाभरापासून धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला आहे. मात्र घाटमाथ्यावर सुरु असलेली आषाढसरींची संततधार कायम असल्याने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरुच असून धरणांची स्थिती समाधानकारक अवस्थेत पोहोचली आहे. निर्मितीपासून बहुतेकवेळा 15 ऑगस्टपर्यंत भरणारा भंडारदर्‍याचा जलाशयही आज सकाळी 88 टक्क्यांवर पोहोचल्याने सध्या सुरु असलेली पाण्याची आवक पाहता येत्या शनिवारपर्यंत धरण आपली 10 हजार 500 दशलक्ष घनफुटाची तांत्रिक पातळी गाठण्याची शक्यता असल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठाही आज सकाळी 65 टक्क्यांवर गेल्याने जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे.

दीर्घकाळ ओढ देणार्‍या पावसाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त धरुन जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात हजेरी लावली आणि बघता-बघता जिल्ह्यातील नागरिकांच्या चेहर्‍यावरील चिंतेचे मळभ दूर हटून समाधानाची लकेर उमटू लागली. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटात समाधानकारक पाऊस झाला असून मुळा खोर्‍यातील अपवाद वगळता सर्व छोटे-मोठे प्रकल्प ओसंडले आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही पावसाने दमदार हजेरी दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होवून आज सकाळी सहा वाजेपर्यंत पाणीसाठा 88 टक्क्यांवर गेला आहे. सद्यस्थितीत पावसाचा जोर पूर्णतः ओसरला असून अधुनमधून आषाढ सरींचा फेर रंगात येत असल्याने धरणातील पाण्याची आवक सुरुच आहे. धरणात दाखल होणार्‍या पाण्याची सरासरी बघता येत्या शनिवारी (ता.7) रात्रीपर्यंत भंडारदरा धरण आपल्या 10 हजार 500 दशलक्ष घनफूट (95 टक्के) पातळीपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

निळवंडे धरणाच्या पाणलोटातील स्थितीही भंडारदर्‍याप्रमाणेच असून कळसूबाईच्या शिखरांवर कोसळणार्‍या आषाढसरींचा वेग कमालीचा मंदावला आहे. त्याचा परिणाम कृष्णवंतीच्या प्रवाहावर झाला असून आज सकाळी सहा वाजता कृष्णवंतीवरील वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन 789 क्युसेक्स वेगाने निळवंडे धरणात पाणी जमा होत आहे. सध्याच्या सरासरीनुसार पावसाचे प्रमाण टिकून राहील्यास तांत्रिक पातळी गाठल्यानंतर भंडारदर्‍यातून आवक होणार्‍या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात होईल. त्यामुळे शनिवारनंतर निळवंड्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढून 15 ऑगस्टपूर्वीच भंडारदर्‍यासह निळवंडे जलाशय ओसंडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील चोवीस तासांत भंडारदर्‍यात 346 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. पातळी नियंत्रणासाठी धरणाच्या विद्युतगृहाद्वारे 830 क्युसेक्स तर अप्पर मोरीद्वारे 435 क्युसेक्स असा एकूण 1 हजार 265 क्युसेक्सचा प्रवाह प्रवरा पात्रात सोडण्यात आला असून त्यातून 108 दशलक्ष घनफूट पाणी निळवंडे धरणात जमा झाले आहे. वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन कोसळणार्‍या जलप्रपातांनी गेल्या चोवीस तासांत निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात 68 दशलक्ष घनफूटाची वाढ केली केली.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या मुळा खोर्‍यातील पावसाची स्थितीही प्रवरा खोर्‍याप्रमाणेच असून पावसाला जोर नसला तरीही अधुनमधून कोसळणार्‍या आषाढसरींमुळे मुळा नदीचा प्रवाह अद्यापही दुथडी वाहत आहे. आज सकाळी कोतुळनजीकच्या मुळा नदीपात्रातून 4 हजार 24 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह वाहत होता. गेल्या महिन्याभरापासून मुळा वाहती असल्याने कोतुळनजीक मोजल्या गेलेल्या प्रमाणातच राहुरीनजीकच्या मुळा धरणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत असून गेल्या चोवीस तासांत दाखल झालेल्या 467 दशलक्ष घनफूट पाण्याने धरणाचा एकूण पाणीसाठा 64.86 टक्क्यांवर पोहोचवला आहे. ऑगस्टमधील सरासरीनुसार आजच्या स्थितीत धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर असल्याने मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातूनही समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात जोर ओसरुनही संततधार असली तरी आढळा, भोजापूर जलाशयांसह लाभक्षेत्रात मात्र गेल्या मोठ्या कालावधीपासून पावसाने उघडीप दिल्याने या दोन्ही जलाशयाच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. या भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अपवाद वगळता दोन्ही धरणांना नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. मागील चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर येथे 70 मिलीमीटर, रतनवाडीत 59 मिलीमीटर, पांजरे येथे 56 मिलीमीटर, भंडारदर्‍यात 47 मिलीमीटर, वाकी येथे 36 मिलीमीटर व निळवंडे येथे तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नव्याने दाखल झालेल्या पाण्याने मुळा धरणाचा एकूण पाणीसाठा 16 हजार 864 दशलक्ष घनफूट, भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 9 हजार 714 दशलक्ष घनफूट, निळवंडे धरणाचा पाणीसाठा 4 हजार 638 दशलक्ष घनफूट, आढळा धरणाचा पाणीसाठा 517 दशलक्ष घनफूट व भोजापूर जलाशयाचा पाणीसाठा 55 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 116375

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *