खैरी निमगावमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ; नागरिक भयभीत हल्ल्याच्या सहा घटना; ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचे वन विभागाला निवेदन

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील खैरी निमगाव येथील शेजूळवस्ती याठिकाणी महिलेस मोटारसायकलवरून ओढून बिबट्याने हल्ला केल्याने या भागातील नागरिक भयभीत व संतप्त झाले आहेत. ही सहावी घटना असल्याने वन विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली असून यासंदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने वन विभागाला निवेदन दिले आहे.

खैरी निमगाव येथील उद्धव साबळे हे पत्नी व मुलासह शेतीची कामे आटोपून घरी जात असताना काशिनाथ शेजूळ यांच्या गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या साबळे यांच्या पत्नीला मोटारसायकलवरून ओढले. मोटारसायकलवरील उद्धव साबळे आणि मुलाने गाडी थांबवली. मुलाने आईला वाचविण्यासाठी दगड फेकला असता बिबट्या गिन्नी गवतात घुसला थोड्या वेळात त्या गिन्नी गवतातून बाहेर आलेल्या दोन बिबट्यांनी त्या महिलेवर हल्ला केला. मुलाने आईला वाचविण्याकरिता पुढे होताच बिबट्यांनी त्याच्यावरही हल्ला केला.

मागील तीन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्याच्या सहा घटना घडल्या असून अनुक्रमे संकेत झुराळे, वदक बंधू, दुशिंग, डांगे, आदिवासी बंधू आणि ही सहावी घटना आहे. या घटनेने नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. यामुळे नागरिकांनी वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी भाऊसाहेब गाढे यांना लेखी निवेदन दिलेे. वन विभागाने ठोस पावले उचलून बिबट्यांचा बंदोबस्त करावा. अथवा कुठलीही पूर्वसूचना न देता रस्तारोको करण्यात येईल, असा इशारा वन विभागाला दिलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर शिवाजी साबळे, अनिल दौंड, वाल्मिक शेजूळ, विठ्ठल शेजूळ, नामदेव शेजूळ, जालिंदर शेजूळ, किशोर वदक, साईनाथ बनकर यांच्या सह्या आहेत.

Visits: 105 Today: 2 Total: 1109337

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *