संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांच्या मुदतपूर्व बदलीचे संकेत! पोलीस अधिक्षकांकडून विनंती अर्जाचे फर्मान; निरीक्षकांनी घातले पालकमंत्र्यांना साकडे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवड्यात तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची उचलबांगडी होवून त्यांच्या जागी प्रवीण साळुंखे यांची वर्णी लागल्यानंतर आता संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा खांदेपालटही चर्चेत आला आहे. पदभार स्वीकारल्यापासून एकाही गुन्ह्याचा तपास लावण्यात अपयश, शहरातील गुन्हेगारी घटनांसह वारंवार निर्माण होणारा राजकीय तणाव, बोकाळलेले अवैध व्यवसाय आणि खूद्द पोलीस अधिक्षकांच्या आदेशानंतरही शहरातंर्गत वाहतुकीचा बोजवारा यामुळे विद्यमान पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या कामाविषयी संगमनेरकर असमाधानी आहेत. त्यातूनच त्यांच्या बदलीची व एखाद्या खमक्या अधिकार्याच्या नियुक्तिची चर्चा सुरु झाली असतानाच पोलीस अधिक्षकांनी त्यांना विनंतीवरुन बदलीचा अर्ज दाखल करण्याचा पर्याय दिल्याची माहिती आहे. मात्र त्या विरोधात त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची भेट घेवून तूर्त अंमलबजावणी रोखल्याचीही जोरदार चर्चा असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांना महिनाभर ‘अभय’ मिळण्याचीही शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी संगमनेर तालुका व नेवासा पोलीस ठाण्याच्या प्रभार्यांची बदली करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार येथील संपूर्ण कारकीर्द केवळ लाटण्यात घालवलेल्या निष्क्रिय पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांची शिर्डीच्या साईमंदिर सुरक्षा व्यवस्थेत बदली करण्यात आली. तर, त्यांच्या जागी नियंत्रण कक्षात दाखल झालेल्या प्रवीण साळुंखे यांना संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला. दीड दशकांपूर्वी साळुंखे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून आपल्या कार्यकारी कारकीर्दीस सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांची सहाय्यक निरीक्षकपदी बढती होवून नाशिक ग्रामीणमध्ये मनमाड पोलीस ठाण्यात बदली झाली.

या दरम्यान नाशिक जिल्हा बँकेतील पन्नास लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा तपास त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केल्याने त्यांना हर्सुल पोलीस ठाण्याचा स्वतंत्र पदभार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी नशिराबाद, इस्लामपूर, पलूस आदी पोलीस ठाण्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून स्वतंत्रपणे
जबाबदारी पूर्ण केल्यानंतर त्यांची पोलीस निरीक्षकपदी बढती झाली व त्यांची पुन्हा नाशिक आयुक्तालयाच्या कक्षेत नंदूरबारच्या गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली. तेथील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गेल्याच महिन्यात त्यांना अहिल्यानगरला धाडण्यात आले होते. या कालावधीत त्यांनी संगमनेर शहर अथवा तालुका पोलीस ठाणे मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यात त्यांना यश येवून गेल्याच आठवड्यात त्यांना तालुक्याचा पदभार देण्यात आला.

त्यांच्या नियुक्तिने तालुका पोलीस ठाण्यातील निष्क्रिय कारकीर्द संपुष्टात आल्याचे चित्र दिसत असताना शहर पोलीस ठाण्यातील प्रभार्यांच्या बदलीचेही वातावरण निर्माण झाले होते. शहर पोलीस ठाण्यात वरीष्ठ निरीक्षकांची नियुक्ति होत असल्याने पदाचा सन्मान ठेवताना पोलीस अधिक्षकांनी
थेट बदलीचा आदेश काढण्याऐवजी त्यांना बदलीसाठी विनंतीअर्ज देण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे तालुक्यापाठोपाठ शहराचेही भाग्य उजळण्याची स्थिती निर्माण होत असतानाच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेत त्यांना बदली रोखण्याचे साकडे घातले. त्यामुळे तूर्त त्यांना अभय मिळाले आहे. त्यातच गणेशोत्सवही तोंडावर येवून ठेपल्याने बहुतेक महिनाभरानंतर या विषयाला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.

पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी शहराचा पदभार स्वीकारल्यापासून शहरात चोर्या, घरफोड्या, महिलांचे दागिने लांबविण्याचे प्रकार, बसस्थानकावर आजही सुरु असलेल्या घटना वाढल्या असून यातील एकाही प्रकरणाचा तपास लावून चोरट्यांवर जरब निर्माण करण्यात ते सपशेल
अपयशी ठरले आहेत. शिवाय विधानसभा निवडणुकीत संगमनेरात राजकीय बदल झाल्याने गेल्या सहा महिन्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यातील राजकीय संघर्षही वाढला असून वारंवार शहरात राजकीय तणावाची स्थिती निर्माण होत आहे, त्यावरही नियंत्रण मिळवण्यात शहर पोलीस अपयशीच ठरले आहेत.

मध्यंतरी जिल्ह्यात आलेल्या पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी विशेष पथकाच्या माध्यमातून शहरात फोफावलेल्या मटक्याच्या वटवृक्षावर झडप घातल्यापासूनच पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे वातावरण निर्माण होवू लागले होते. त्यातच शहरातील गचाळ वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा
समोर आल्यानंतर खूद्द पोलीस अधिक्षकांनी सिग्नलद्वारे सक्तीने वाहतूक नियमनाची गरज व्यक्त करुन 15 जूनपासून संगमनेरात तीन ठिकाणी पोलिसांकडून सिग्नलचे संचालन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पालिकेने बंद असलेले सिग्नल त्वरीत दुरुस्ती करुन दिल्यानंतरही पोलिसांकडून त्याचा वापर होत नसल्याने शहरात मोठी नाराजी निर्माण झाली आहे, त्यातून बासनात गेलेला बदलीचा मुद्दा पुन्हा तापला असून तालुक्यापाठोपाठ शहर पोलीस निरीक्षकांचीही उचलबांगडी व्हावी अशी संगमनेरकरांना अपेक्षा आहे.

त्यानुसार पोलीस अधिक्षकांनी थेट बदलीचे आदेश काढण्याऐवजी पोलीस निरीक्षकांना विनंती अर्जाचा पर्याय दिला असतानाच आता त्यांनी पालकमंत्र्यांना भेटून कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी साकडे घातल्याने तूर्त पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना अभय मिळाले आहे, मात्र शहरातूनच त्यांना विरोध वाढत असल्याने पालकमंत्र्यांची तात्पूरती ‘स्थगिती’ लवकरच उठण्याचीही शक्यता आहे.

उलथापालथ झाल्यानंतर ‘हॉट’ झालेली संगमनेरची राजकीय स्थिती, प्रगत शहराच्या पंक्तित असतानाही बेसुमार पद्धतीने वाढत असलेले अवैध व्यवसाय, त्यातून वाढीस लागलेली गुन्हेगारी. चोर्या, घरफोड्या, सोनसाखळ्या लांबवण्याचे एकामागून एक प्रकार घडूनही एकाही प्रकरणाचा तपास लावण्यात अपयश, पुणे-नाशिक राष्ट्रीय आणि कोल्हार-घोटी राज्य मार्गावर वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत असताना
खूद्द पोलीस अधिक्षकांनी सूचवलेल्या पर्यायालाही केराची टोपली दाखवण्याचा प्रकार यातून शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची मुदतपूर्व बदली करुन त्यांच्या जागी एखाद्या खमक्या अधिकार्याची नियुक्ति व्हावी अशी संगमनेरकरांमधून वाढती मागणी आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे नाव त्यात आघाडीवर असल्याचीही चर्चा असल्याने गणपतीनंतर शहर पोलीस ठाण्यात बदलाचे संकेत मिळत आहेत.

