‘अखेर’ अभियान व्यवस्थापकांविरोधात अदखलपात्र गुन्हा! पंचायत समितीमधील ‘गोंधळ’ प्रकरण; शरद थोरातांसह दोघे पोलीस कोठडीत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बचत गटाचे काम करणार्या तालुक्यातील शेडगाव येथील एका महिलेचे सहा महिन्यांचे मानधन खोळंबल्याच्या कारणावरुन रंगलेल्या राजकीय नाट्याचा शेवट अखेर केवळ अदखलपात्र गुन्ह्याने झाला. या प्रकरणात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आठ ते दहा समर्थकांनी सोमवारी पंचायत समितीच्या कार्यालयात घुसून अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांना बेदम मारहाण केली होती. त्यावरुन त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली, त्यानुसार पोलिसांनी आठ ते दहाजणांवर गुन्हा दाखल करीत प्रकरणातील सूत्रधार शरद थोरात व अक्षय भालेराव या दोघांना सोमवारी रात्रीच अटक केली, मंगळवारी न्यायालयाने त्यांना चार दिवसांच्या कोठडीत पाठवले. तर, सदरील अधिकार्याने आपला विनयभंग केल्याचा आरोप करीत ‘त्या’ महिलेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, त्यासाठी मंगळवारी दिवसभर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात मोठा गोंधळही घातला. मात्र त्याचा कोणताही प्रभाव पोलिसांवर पडला नाही आणि अखेर या प्रकरणाचा शेवट फौजदारी धाकदपटशा आणि शांततेचा भंग या कलमान्वये अदखलपात्र गुन्ह्याने झाला.

गेल्या सोमवाराी (ता.23) संगमनेर पंचायत समिती कार्यालयात घडलेल्या या घटनेत दुपारी सव्वादोनच्या सुमारास अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे आपल्या कार्यालयात असतानाच सदरील महिला आपले पती व शरद थोरात यांच्यासह त्यांच्या दालनात आले. यावेळी थोरात यांनी; ‘या महिलेचे मानधन का दिले नाही?’ अशी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्या महिलेविरोधातील तक्रारींचा पाढा वाचून त्यांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे सांगत मानधन रोखण्याची कारवाई गटविकास अधिकार्यांनी केल्याचे कोकाटे यांनी सांगितले. त्यावर थोरात यांनी; ‘आम्ही कोणताही खुलासा करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’ असे सांगत त्यांना धमकी दिली व त्यानंतर त्यांच्या डोक्यात चापटीने मारहाणही केली.

या प्रकाराने घाबरलेल्या नंदलाल कोकाटे यांनी तेथून थेट कार्यालयातील आपल्या वरीष्ठ अधिकार्यांकडे जावून घडल्या प्रकाराची माहिती दिली व ते दुसर्या खोलीत निघून गेले. त्यानंतर काहीवेळाने पुन्हा आठ ते दहाजण आले व त्यांनी सदरील अधिकार्याची ओळख पटवून त्यातील चार-पाचजणांनी ‘तु शरद नानाला ओळखत नाही का?’ असा सवाल करीत त्यांना लाथाबुक्क्यांनी पुन्हा मारहाण केली. या प्रकरणी नंदलाल कोकाटे यांच्या यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू शरद थोरात यांच्यासह अभिषेक थोरात, ऋषीकेश थोरात, शिवामृत भोकरे व अक्षय भालेराव व चार ते पाच अज्ञातांवर भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करुन शरद थोरात व अक्षय भालेराव या दोघांना सोमवारी (ता.23) रात्रीच अटक करुन कारागृहात टाकले.

त्याचवेळी सदरील महिलेने पंचायत समितीच्या अभियान व्यवस्थापकांनी त्यांच्या दालनात आपला विनयभंग केल्याचा आरोप करीत तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. मात्र सदरचा प्रकार घडला त्यावेळी पंचायत समितीमध्ये अन्य कर्मचार्यांसह नागरिकांचाही वावर असल्याने ‘त्या’ महिलेचे आरोप प्रथमदर्शनी न पटल्याने पोलिसांनी ‘विनयभंग’ दाखल करण्यास नकार दिला. त्यावरुन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी राजकीय नाट्य उभारुन सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ घातला. यावेळी महिलांसह जमावात शिरलेल्या काहींनी वरीष्ठ अधिकार्यांवर नाहक आरोप करीत त्यांच्याशी हुज्जत घालून वातावरण बिघडवण्याचाही प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी संयमित भूमिकेत राहून प्रकरण हाताळले. अखेर आपला डाव साधला जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर जमलेल्या महिलांसह जमावाने पोलिसांच्या सूचनेप्रमाणे तक्रार देण्याची तयारी दाखवली आणि अखेर विनयभंगाच्या आरोपापासून सुरु झालेले राजकीयनाट्य फौजदारी धाकदपटशा दाखवणे व सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या कलमान्वये अदखलपात्र (एनसी) गुन्ह्यात परावर्तीत झाले. या दरम्यान सोमवारी रात्रीच अटक झालेल्या शरद नारायण थोरात (वय 58) व अक्षय अशोक भालेराव (वय 35) या दोघांना मंगळवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही चार दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. या प्रकरणातील उर्वरीत आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

