स्वातंत्र्यदिनी ‘ओव्हरफ्लो’ होण्याचा मुहूर्त टळला! तिनही धरणांचे पाणीसाठे स्थिरावले; विसर्ग बंद झाल्याने पर्यटकांचाही हिरमूड..

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या 99 वर्षांच्या इतिहासात बहुतांशवेळा स्वातंत्र्य दिनापूर्वीच ओव्हरफ्लो होणार्या भंडारदर्याचा इतिहास यंदा मात्र खंडीत होणार आहे. मागील पंधरा दिवसांपासून पाणलोटातही पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील तिनही मोठ्या धरणांमधील पाण्याची आवक जवळजवळ थंडावली आहे. त्यातही यंदा मुसळधार पावसाचा कालावधी समजल्या जाणार्या जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीला पाणलोटात अपेक्षित पाऊसच झाला नाही. त्यामुळे धरणांमधून सुरु असलेला विसर्गही पूर्णतः थांबवण्यात आल्याने सुरुवातीच्या पावसाने महापूर वाहणार्या नद्यांची पात्र आता कोरडीठाक पडली आहेत. स्वातंत्र्यदिनी भंडारदर्यात पर्यटकांची तोबा गर्दी असते. यंदामात्र अर्धवट धरणसाठ्यासह गेल्या मोठ्या कालावधीपासून पावसाची उघडीप असल्याने पाणलोटातील बहुतेक धबधबेही संकुचित झाले आहेत, त्यामुळे यंदा निसर्ग पर्यटनाच्या लालसेने भंडारदर्यात दाखल होणार्या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

अकोले तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर होणारा तुफान पाऊस आणि त्यामुळे दीर्घकाळ वाहणार्या प्रवरानदीच्या पाण्याचा वापर करुन तत्कालीन बेलापूर (श्रीरामपूर) परिसरात ऊसमळे तयार करण्याची योजना आखून इंग्रजांनी भंडारदरा धरणाची निर्मिती केली. या भागात कसदार शासकीय जमिनींची उपलब्धता आणि पाऊसाचे योग्य प्रमाण असल्याने इंग्रजांनी काही जमिनदारांना त्यावेळची तांत्रिक आयुधं उपलब्ध करुन देत त्यांना ऊसमळे पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. 1886 पासून सुरु झालेल्या धरण निर्मितीच्या हालचालीत अगदी आजच्या निळवंडे धरणापासून ते भंडारदर्यापर्यंत अनेक ठिकाणांची चाचपणी केली गेली. घाटमाथ्यावरुन वाहत येणारा वेगवान पाण्याचा प्रवाह थोपवताना धरणाची सुरक्षितताही विचारात घेतली गेली. त्यातूनच आधी दिगंबरजवळ निश्चित झालेले ठिकाण नंतर भंडारदर्यापर्यंत पाठीमागे हलवण्यात आले.

विविध ठिकाणांचा अभ्यास केल्यानंतर तत्कालीन ब्रिटीश अभियंता सर आर्थर यांनी कात्राबाईच्या खिंडीत जावून संपूर्ण परिसराचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यातूनच आजच्या भंडारदरा धरणाच्या भिंतीची रचना झाली. दोन डोंगरांवर पाण्याचा संपूर्ण भार टाकणार्या या धरणाच्या भिंतीपाठीमागील 11 हजार 39 दशलक्ष घनफूट पाण्याचा संपूर्ण साठा खडकांमध्ये होतो हे या धरणाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच भंडारदर्याचे पाणी अन्य धरणांच्या तुलनेत बारामाही पिण्यासाठी गोडच लागते. 1910 साली प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झालेल्या या धरणात 1926 सालापासून पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यास सुरुवात झाली. संगमनेर तालुक्यातील ओझरजवळ नदीपात्राला बांध घालून दोन कालव्यांद्वारा आजच्या राहाता तालुक्यातून बेलापूर व नेवाशापर्यंत कालवे काढण्यात आले. ओझरजवळ बांध घालण्यामागे फादरवाडीच्या चर्चसह तेथील त्यावेळी खूप मोठ्या असलेल्या रुग्णालयाला पाणी उपलब्ध व्हावे असा इंग्रजांचा हेतू होता.

जून ते सप्टेंबर या कालावधीत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने हिरव्यागच्च झालेल्या डोंगरदर्यातून ओघळणारे असंख्य छोटे-मोठे जलप्रपात, नागमोडी घाटवळणाचे रस्ते, प्रचंड झाडी आणि पावसाळ्यात पाणलोटात बहुतेक ठिकाणी दाटणारे धुके, अधुनमधून कोसळणार्या जोरदार आषाढ, श्रावण सरी अभयारन्य आणि आदिवासींचा अधिवास यामुळे हा संपूर्ण परिसर पर्यटकांना नेहमीच साद घालणारा ठरतो. त्यातही पावसाळ्यातील चार महिने म्हणजे मुळा-प्रवरा खोर्यात पर्यटकांची अक्षरशः जत्रात भरत असते. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तुफान पाऊस होवून 15 ऑगस्टपूर्वीच धरण ओसंडते. या धरणाच्या गेल्या 99 वर्षांच्या इतिहासात अनेकवेळा असे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाला भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी मांदियाळी असते.

धरण व्यवस्थापनाकडूनही पर्यटकांसाठी भिंतीजवळील उद्यान खुले करण्यासह उच्चश्रेणीत असलेल्या मोरीतून विसर्ग सुरु करुन पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला ‘अंब्रेला फॉल’ प्रवाहीत केला जातो. यावेळी मात्र पर्यटकांना यासर्व गोष्टींना मुकावे लागण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण पाणलोटात पावसाने जवळजवळ विश्रांती घेतल्याने धरणांकडे धावणारे ओहोळ आता शांत झाले आहेत. पाऊसच नसल्याने अधुनमधून सूर्यनारायण डोकावत आहे, त्यामुळे अपवाद वगळता धुक्याचा अनुभवही विरळ झाला आहे. भंडारदर्याचा तडाखेबाज पाऊस अंगावर घेण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी पाणलोटात येतात. यावेळी स्वातंत्र्यदिनाला मात्र असा पाऊस अभावानेच अंगावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पर्यटकांचा हिरमोड होणार हे निश्चित आहे.

11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात सध्या 9 हजार 830 दशलक्ष घनफूट (89 टक्के) पाणी असून पाण्याची आवक जवळजवळ थांबली आहे. या धरणातून विद्युत निर्मितीसाठी सुरु असलेला विसर्गही थांबवण्यात आला आहे. निळवंडे धरणात सात हजार 290 दशलक्ष घनफूट (87.62 टक्के) पाणी असून कालव्यांद्वारा 675 क्यूसेकचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाचा पाणीसाठाही 22 हजार 752 दशलक्ष घनफूटावर (87.51 टक्के) स्थिरावला आहे. कोतुळच्या मुळानदीतून 667 क्यूसेकचा विसर्ग सुरु असला तरीही या धरणातील पाण्याची आवक पूर्णतः थांबली आहे. सध्या मुळा धरणाच्या कालव्यांमधून 1350 क्यूसेकचा विसर्ग मात्र कायम आहे. गेल्या 24 तासांत घाटघर येथे 27 मि.मी., रतनवाडीत 16 मि.मी., पांजरे येथे 04 मि.मी., कोतुळमध्ये 02 मि.मी., राहुरीत चार मि.मी., संगमनेर व श्रीरामपूर येथे प्रत्येकी तीन मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पर्यटकांची मोठी गर्दी होते. तुडूंब भरलेला धरणाचा जलसाठा, अधुनमधून होणारा पाऊस, त्यामुळे सर्वत्र धुकट वातावरणासह थंडगार वारा, हिरव्यागार झालेल्या सह्यादीच्या कुशीतून एकामागून एक कोसळणारे असंख्य जलप्रपात, अभयारन्यातून जाणारे नागमोडी वळणाचे रस्ते आणि शेवटी धरणाच्या भिंतीजवळील अंब्रेला फॉल यासर्व गोष्टींमुळे भंडारदरा पर्यटकांच्या पसंदीला उतरणारे प्रमुख ठिकाण आहे. 99 वर्षांपासून उत्तर नगरजिल्ह्याला समृद्ध करणार्या या धरणाच्या इतिहासात 1974 पासूनच्या 50 वर्षात हे धरण 1974, 1985, 1986, 1987, 1989, 1995, 1999, 2000 व 2015 अशा नऊवेळा पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. तर, 26 जुलै 2005 आणि 29 जुलै 2006 अशी सलग दोन वर्ष जुलैतच या धरणाच्या पाणीसाठ्याने सर्वोच्च पातळी गाठली होती. यावेळी सुरुवातीपासूनच झालेल्या चांगल्या पावसामुळे स्वातंत्र्यदिनापूर्वी भंडारदरा धरण सहज भरेल अशी अपेक्षा होती, मात्र सुरुवातीच्या पावसात सोडण्यात आलेला मोठा विसर्ग आणि त्यानंतर अचानक विश्रांती घेणारा पाऊस यामुळे यंदाचा मुहूर्त टळणार हे निश्चित आहे.

