थोरात साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर! महाराष्ट्र सहकारी प्राधिकरणाची अधिसूचना; चाळीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आज जाहीर केलेल्या विडणूक कार्यक्रमानुसार 3 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 29 एप्रिलपर्यंत माघारीसाठी मुदत असेल. पुढील महिन्यात 11 मे रोजी मतदानाची प्रक्रिया होणार असून 12 मे रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत. आमदार अमोल खताळ यांनी यावेळच्या निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केल्याने यंदा कारखान्याची निवडणूक चांगलीच चर्चेत येण्याची शक्यता आहे.


राज्य सहकारी प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुरुवार 3 एप्रिलपासून ते बुधवार 9 एप्रिलपर्यंत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज उपलब्ध होतील व याच कालावधीत ते स्वीकारले जातील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता होईल. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी मंगळवार 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाईल.


दाखल नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी मंगळवार 15 ते 29 एप्रिल पर्यंतचा कालावधी निश्‍चित करण्यात आला असून माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप शुक्रवार 2 मे रोजी करण्यात येईल. सोमवार 11 मे रोजी मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार असून मंगळवार 12 मे रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित केला जाईल.


या निवडणुकीसाठी संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी 25 फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी 19 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.

Visits: 373 Today: 3 Total: 1113689

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *