संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने ‘सील’ करण्याची कारवाई सुरु! सात दिवसांत दोषी अधिकार्‍यांवर कारवाईचे अप्पर अधीक्षकांचे लेखी आश्वासन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यांच्या विरोधात आज सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनाला दहा तासानंतर यश आले आहे. प्रशासनाने शनिवारी छापे पडलेले पाचही कत्तलखाने तत्काळ ‘सील’ करण्याची कारवाई सुरु केली असून पोलीस आणि पालिकेचे संयुक्त पथक जमजम कॉलनीकडे रवाना झाले आहे. आंदोलनकर्त्यांच्या उर्वरीत चार मागण्याही मान्य करण्यात आल्या असून पुढील सात दिवसांत चौकशी करुन दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी दिले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून प्रांत कार्यालयासमोर सुरु असलेले ठिय्या आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.

शनिवारी (ता.2) संगमनेरातील जमजम कॉलनी परिसरात असलेल्या पाच साखळी कत्तलखान्यांवर श्रीरामपूरचे उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्त्वाखालील अहमदनगर, श्रीरामपूर व संगमनेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा घातला होता. या कारवाईत पोलिसांनी 31 हजार किलो गोवंशाचे मांस व 71 जिवंत जनावरे हस्तगत केली होती. या प्रकरणात पोलिसांनी एकूण सात जणांवर गुन्हे दाखल करुन दोघांना अटकही केली होती. गांधी जयंतीच्या दिवशीच झालेल्या या कारवाईने संगमनेरात मोठा संताप उसळला होता. सदर कारवाईच्या बातम्या माध्यमांतून राज्यभर गेल्याने त्याचे तीव्र पडसादही उमटले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि अवैध कत्तलखाने उध्वस्त करुन दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी आज सकाळी शहरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती.

त्यानुसार आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून मोर्चा काढण्यात आला. सदरचा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर पोहाचल्यानंतर त्याचे रुपांतर सभेत व नंतर ठिय्या आंदोलनात झाले. त्यानंतर दिवसभर आंदालकांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात चर्चेच्या फेर्‍या झडत होत्या, मात्र त्यातून तोडगा निघत नव्हता. प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व तहसीलदार अमोल निकम यांनी वारंवार आंदोलकांशी संवादही साधला. मात्र जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यासह मंगळवारी संगमनेर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर मात्र प्रशासनाचे धाबे दणाणले आणि सायंकाळपासून त्यांची धावपळ वाढली. या दरम्यान रजेवर असलेल्या मुख्याधिकारी राहुल वाघ यांनाही तत्काळ हजर होण्यास सांगण्यात आले.

सायंकाळी उशिराने तहसीलदार अमोल निकम यांनी मुख्याधिकार्‍यांना जमजम कॉलनीतील बेकायदेशीर कत्तलखाने 48 तासांच्या आंत जमीनदोस्त करण्याचे आदेश बजावले. त्यावर पालिकेने नगरपालिका अधिनियमातील कलम 271 च्या अधिकारांचा वापर करुन पोलिसांच्या मदतीने शनिवारी कारवाई झालेले पाचही कत्तलखाने तत्काळ ‘सील’ करण्याची प्रक्रीया सुरु केली. त्यासाठी पालिका आणि पोलिसांचे संयुक्त पथकही जमजम कॉलनीच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. कत्तलखान्यांच्या मालकांना नोटीसा बजावून 48 तासांत ते उध्वस्त करण्याची प्रक्रीयाही या दरम्यान सुरु करण्यात आली.

याशिवाय आंदोलनकर्त्यांनी मागील तीन वर्षात कत्तलखान्यांवर झालेल्या कारवायात वारंवार आढळलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्याचीही मागणी केली होती. येथील कत्तलखान्यांवर होणार्‍या कारवाया केवळ दिखावा असतो असा आरोप करीत वर्षभरातील कारवायांचे ऑडिट करुन जाणीवपूर्वक तपासात दुवे ठेवून आरोपींना निर्दोष सुटण्यास मदत करणार्‍या प्रकरणांची सखोल चौकशी करुन दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, गेल्या दहा वर्षात येथून बदलून गेलेल्या सर्व पोलीस निरीक्षकांच्या मालमत्तांची चौकशी करावी. पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक असे दोन्ही वरीष्ठ अधिकारी संगमनेरात वास्तव्यास असतांनाही शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत असल्याने हे प्रकार त्यांच्या संमतीशिवाय अशक्य असल्याने या दोन्ही अधिकार्‍यांचे निलंबन करावे व खात्यातंर्गत चौकशी करुन त्यांना सेवामुक्त करावे.

कत्तलखान्यांवर कारवाई झाल्यानंतर जप्त केलेले मांस हे गोमांसच असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याची डी.एन.ए चाचणी करावी लागते. त्यासाठी आवश्यक असलेले मांसाचे नमुने घेण्याची जबाबदारी पशु वैद्यकीय अधिकार्‍यांची असते. मात्र अनेक प्रकरणांमध्ये असे नमूनेच घेतले गेले नाहीत, काही प्रकरणात उशीराने नमूने घेतले गेल्याने त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. यातही आर्थिक हित असल्याने गेल्या दहा वर्षातील अशा प्रकरणांची चौकशी करुन दोषी असलेल्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचीही चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. या मागण्या पोलीस विभागाशी संबंधीत असल्याने व येथील दोन्ही वरीष्ठ अधिकार्‍यांवरच मोर्चेकर्‍यांचा रोष असल्याने या कारवाईबाबत अप्पर पोलीस अधीक्षकांच्या लेखी आश्वासना शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार करण्यात आला होता.

त्यावर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन देत वरील चारही मागण्यांवर येत्या सात दिवसांत कारवाई करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले. याबातची माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी आंदोलनकर्त्यांना देतांनाच त्याबाबतचे लेखीपत्रही सोपविले. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सात दिवसांत पोलिसांकडून तर पुढील दोन दिवसांत पालिकेकडून कारवाई होणार असल्याचे लेखी सांगण्यात आल्याने आंदोलनाचे नेतृत्त्व करणार्‍यांनी अधिकार्‍यांच्या आश्वासनानुसार सात दिवस आंदोलन स्थगीत करण्याचा निर्णय जाहीर केला. 

संगमनेरातील कत्तलखाने उध्वस्त करुन येथील गोहत्या थांबवण्यासाठी एकवटलेल्या संगमनेरकरांनी आपल्या एकीचे अनोखे दर्शन घडविले. या आंदोलनात व्यापार्‍यांनीही सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतांना मंगळवारी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवण्याची तयारी दर्शविली होती. मात्र याबाबत कारवाईचे ठोस आश्वासन मिळाल्याने उद्याचा बंद मागे घेण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले असून गोमातेच्या समर्थनार्थ व्यापार्‍यांनी सकाळी 10 वाजेपर्यंत आपापली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

आज सकाळपासूनच प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावरच ठाण मांडून बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी दुपारनंतर विविध पद्य, गीतं, भजनं आणि गाणी गात वातावरण निर्मिती केली. सायंकाळी येथील गर्दीमध्ये मोठी वाढ होऊ लागल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम आंदोलकांशी वारंवार वाटाघाटी करीत आंदोलन संपविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने चर्चासत्र ठप्प झाले होते. अखेर श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्याद्वारे आंदोलकांच्या चारही मागण्या मान्य करीत येत्या सात दिवसांंच्या आत कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने दहा तास चाललेले हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनातून तब्बल साडेतीन दशकांनंतर संगमनेरात सामाजिक आंदोलन उभे राहिल्याचे व ते यशस्वी ठरल्याचे दिसून आले.

Visits: 32 Today: 1 Total: 115770

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *