आता स्थानिक स्वराज्य संस्थांची आचासंहिता? सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपणी; महायुतीकडूनही ‘लाभ’ घेण्याचा प्रयत्न..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून खोळंबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांसंदर्भात प्रलंबित असलेल्या याचिकांमधील कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय प्रत्येक राज्यातील कारणमीमांसा आणि परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे समाधानकारक कारणं नसतील तर, अशा ठिकाणच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले जावू शकतात अशी महत्वपूर्ण टिपणीही न्यायालयाने केली. बहुसदस्यीय प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षण या दोनप्रमुख कारणांसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका खोळंबल्या आहेत. याबाबत ‘ईशाद’ या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वरील निर्देश देत कारणं पाहून पुढील आदेश देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या आनंदात भर पडली असून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा पुरेपूर ‘लाभ’ घेण्यासाठी तिनही पक्षांचे नेते व्यस्त होवू लागले आहेत.
डिसेंबर 2021 मध्ये संगमनेरच्या पालिका पदाधिकार्यांची मुदत संपली, तेव्हापासून पालिकेवर प्रशासकांचे राज्य आहे. त्यानंतरच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राज्यातील अन्य महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मुदतीही संपुष्टात येवून आजच्या स्थितीत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत वगळता बहुतेक सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहेत. या दरम्यान पूर्वीच्या महायुती सरकारने घेतलेल्या बहुसदस्यीय प्रभागरचनेच्या विरोधासह ओबीसी आरक्षणावरुन प्रलंबित असलेल्या याचिकांमुळे महाराष्ट्रासह अन्य काही राज्यातील स्थानिक निवडणूका खोळंबल्या आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘ईशाद’ या सामाजिक संस्थेने याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने प्रलंबित याचिकांमधील कारणांची मीमांसा करण्याचे निर्देश दिल्याने नाहक दाखल असलेल्या याचिका निकाली निघण्याची शक्यता आहे.
या शिवाय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणल्याने त्यावरील सुनावणीही प्रदीर्घ काळापासून झालेली नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका घेणं कोणत्याही राजकीय पक्षाला फायद्याचे ठरणार नाही. त्यामुळे विद्यमान महायुती सरकार या विषयावर कोर्टात काय माहिती सादर करणार आहे यावरही राज्यातील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या अडिच वर्षाच्या काळात महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयातील या याचिकेबाबत कोणते अहवाल सादर केले अथवा सुनावणीदरम्यान करणार आहेत याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र सरकार ओबीसींचे आरक्षण राखण्यात यशस्वी ठरले तर मात्र आगामी दोन-तीन महिन्यातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
राज्यासह संगमनेरातही स्थानिक निवडणुकांचे वारे वाहत असून यावेळी तालुक्याने परिवर्तन घडवल्याने महायुतीच्या स्थानिक पुढार्यांसह कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. माजीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रयत्नातून संगमनेरात बदल घडल्याने महायुतीत प्रवेशासाठी अनेकांनी माध्यमांचा शोध सुरु केला आहे. यापूर्वी निवडणूका लढवलेले माजी नगरसेवक, आजी-माजी पक्ष पदाधिकारी यांच्याकडूनही चाचपणी सुरु असून काहीजण व्हाया लोणी तर, काही थेट मुंबईहून ‘लाईन’ शोधीत आहेत. याच पार्श्वभूमीवर अवघ्या पंधरवड्यापूर्वी समोर आलेल्या निवडणूक निकालात आपले मामा बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झालेला असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी समाज माध्यमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेले गुणगान, त्यांच्या समर्थकांच्या स्टेट्सवरही देवाभाऊंच्या अभिनंदनाचे पोस्टर आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जावून त्यांनी दिलेल्या शुभेच्छा खूप बोलक्या आहेत.
एकंदरीत गेल्या मोठ्या कालावधीपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा चर्चेत आल्या असून न्यायालयानेही वर्गीकरणासह त्याकडे आपले लक्ष वेधल्याने येणार्या काळात त्यावर सुनावणी होवून निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्य सरकार न्यायालयासमोर काय घेवून उपस्थित होणार यावरही बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचा लाभ घेण्यासाठी यासारखी दुसरी संधी मिळणार नसल्याची पूर्ण जाणीव असल्याने सरकार ताकदीने या याचिकांचा सामना करील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे येणार्या दोन-तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडू शकतो.
1985 पासून बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत होते. तर, 1991 पासून संगमनेर नगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. यावेळी थोरात यांचा पराभव करीत शिवसेनेचे अमोल खताळ विजयी झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला आहे. त्यामुळे भाजप-सेनेत प्रवेशासह उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून पेरणीही सुरु झाली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करुन पक्षाच्या वरीष्ठांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात कोणाकोणाला यश येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.