संगमनेरच्या गचाळ वाहतुकीवर शिस्तीचा प्रयोग! मोठ्या वर्गाकडून नियमांचे पालन; काही बेशिस्तांना मात्र नियम मानवेनात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आधीचअरुंद आणि रहदारी असलेल्या रस्त्यांवर मनमानी पद्धतीने वाहनांचे संचालन आणि बेशिस्तपणे कोठेही वाहने उभी करुन वावरण्याच्या ‘जंगली’ प्रवृत्तींमुळे संगमनेरची वाहतूक व्यवस्था अतिशय गचाळ श्रेणीत पोहोचली आहे. त्यावर उपाय म्हणून दहा वर्षांपूर्वी पालिकेने लाखों रुपये खर्च करुन सिग्नल यंत्रणाही उभारली होती. मात्र पोलिसांशी समन्वयाच्या अभावाने ती धूळखात पडून होती. दिवसोंदिवस गंभीर होत चाललेल्या या समस्येबाबत काही पत्रकारांनी संगमनेर भेटीवर आलेल्या पोलीस अधिक्षकांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी बंद असलेले सिग्नल कार्यान्वीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील रहदारीच्या तीन ठिकाणी ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली असून त्याद्वारे वाहतुकीचे संचालन केले जात आहे. विशेष म्हणजे बसस्थानकाजवळील सिग्नलवर बहुतेक वाहनचालक स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करतांनाही दिसत आहे. तर, दुसरीकडे अकोलेनाका आणि तीनबत्ती चौकात मात्र सिग्नलची एैशीतैशी बघायला मिळत असून या रस्त्याचा वापर करणार्या काही बेशिस्तांना नियम मानवत नसल्याचेही विरोधाभाशी चित्र बघायला मिळत आहे. पोलीस कर्मचारी हजर असताना सिग्नल तोडून मनमानी करणार्या दोघांवर पोलिसांनी दंडात्मकचे हत्यारही उपसले आहे. खरेतर जिल्ह्यात आघाडीच्या मानल्या जाणार्या शहरातील वाहतूक व्यवस्थाही उत्तम असावी. त्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे. वाहनचालकांनीच स्वयंस्फूर्तीने केवळ 60 सेकंदाचा धीर धरला तरीही शहराच्या गचाळ वाहतुकीला शिस्त लागू शकते, मात्र काहींना जंगलराज कायम राहण्याचीच अपेक्षा असल्याने उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर भूमिका घेण्याचीही गरज आहे.

संगमनेर शहराच्या बाजारपेठेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. जिल्ह्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या संगमनेरातून पुणे-नाशिक हा राष्ट्रीय आणि कोल्हार-घोटी हा राज्यमार्ग गेल्याने दळणवळणही अतिशय प्रभावी आहे. पुणे, नाशिक आणि मुंबई या महानगरांच्या त्रिकोणीय श्रृंखलेत असल्याने या मार्गांवरुन होणारी वाहतुकही खूप मोठी आहे. गेल्याकाही वर्षात वाहनांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यातही या दोन्ही महामार्गाना शहरातंर्गत सर्व रस्ते जोडलेले असल्याने दिवसभर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसह पादचार्यांची मोठी वर्दळ असते. त्यात शहरातील अतिक्रमण ही देखील मोठी डोकेदुखी असल्याने वारंवार वाहतूक कोंडी आणि त्यातून घडणारे अपघात मोठी समस्या बनली होती. यावर उपाय म्हणून दहा वर्षांपूर्वी पालिकेने शहरात पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणाही बसवली. मात्र ती उभारतांना पोलिसांना विश्वासात घेतले नाही असा आरोप करीत तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी त्यावरुन नियमन करण्यास नकार दिल्याने तेव्हापासून संगमनेरचे सिग्नल धूळखात पडले होते.

मध्यंतरी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे संगमनेर भेटीवर आले होते. त्यावेळी काही पत्रकारांनी संगमनेरच्या बेशिस्त आणि अतिशय गचाळ वाहतूक व्यवस्थेकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यावर वाहनांच्या वाढत्या संख्येवर सिग्नल हाच उपाय असल्याचे मत अधोरेखीत करताना त्यांनी बंद असलेल्या सिग्नलची दुरुस्ती करुन देण्याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना निर्देशित केले. त्यांनीही सिग्नलची आवश्यकता लक्षात घेत त्यावर तत्काळ कारवाई केली. यावेळी मात्र मुख्याधिकार्यांनी पोलिसांशी समन्वय साधून कारवाई केल्याने अनावश्यक असलेले दोन ठिकाणचे सिग्नल तूर्त ‘बंद’ ठेवून तीनबत्ती चौक, बसस्थानक परिसर (हॉटेल काश्मीर) व अकोले नाका (जाजू पंप) या तीन ठिकाणी प्रायोगिक तत्वार सिग्नलद्वारा वाहतूकीचे संचालन करण्यात येत आहे. अर्थात अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले ‘कर्तव्य’ पूर्ण केले नसून पांढरे पट्टे आणि झेब्राक्रॉसिंगची आखणी झाली नसल्याने पोलिसांनाही त्याबाबत फार सक्तीने कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्याम मिसाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

गेल्या दोन दिवसांपासून सुरु झालेल्या सिग्नल यंत्रणेद्वारा या तिनही ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित राहून त्याचे संचालन करीत आहेत. कर्मचारी हजर असेपर्यंत सर्व ठिकाणी अपवाद वगळता त्याचे पालनही होत आहे. मात्र कर्मचार्यांनी पाठ दाखवताच काही बेशिस्त वाहनचालकांमधील जंगलवृत्ती जागृत होत असल्याचेही बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे बसस्थानकाजवळील सिग्नलजवळ वाहतूक पोलीस असताना सक्तिने पालन होत असल्याचे व त्यांच्या अनुपस्थितीतही बहुतेकांकडून नियम पाळले जात असल्याचे दिसत आहे. त्यावरुन संगमनेरची गचाळ वाहतूक सुधारण्यासाठी सुरु असलेल्या प्रशासनाच्या प्रयत्नांना संगमनेरकर प्रतिसाद देत असल्याचे सकारात्मक चित्रही बघायला मिळत आहे. मात्र त्याचवेळी काही टुकार आणि कोणताही सार्वजनिक नियम नसल्यागत जंगलीवृत्ती असलेल्या काहींकडून त्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन होत असल्याचेही समोर येत असल्याने अशांना चौकटीत बसवण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दंडात्मकचे हत्यार वापरले जाणेही आवश्यक आहे.

पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार शहरातील तीन ठिकाणच्या सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली आहे. सध्या या तीनही ठिकाणचे सिग्नल सुरु असून थांबा देण्याच्या वेळेबाबत पोलिसांशी चर्चा सुरु आहे. सिग्नलचे दिवे सुरु झाले असले तरीही अद्याप रस्त्यावर पांढरे पट्टे व झेब्राक्रॉसिंगची आखणी बाकी आहे. दोन्ही महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्याकडून हे काम होणं अपेक्षित आहे. त्यानंतरच पोलिसांकडून त्याचे सक्तीने संचालन होईल. यंत्रणा कार्यान्वीत झाल्याची माहिती पोलिसांना दिली असून आम्ही समन्वयातून पुढील कारवाई करीत आहोत.
रामदास कोकरे
मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद

पालिकेकडून सिग्नल सुरु करुन देण्यात आले असून सध्या त्याची चाचणी सुरु आहे. प्रायोगिक तत्वावर पोलीस कर्मचारी त्याचे नियमन करीत असून लोकांमध्ये सिग्नलच्या नियमांबाबत जागृती व्हावी असा त्यामागील हेतू आहे. शहरात दवंडी पिटाळून जनजागृती करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. तिनही ठिकाणच्या सिग्नलवर आवश्यक असलेले पांढरे पट्टे आणि झेब्राक्रॉसिंगची आखणी करुन देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवण्यात आले आहे. त्यांच्याकडून त्याची पूर्तता झाल्यानंतर या तिनही ठिकाणी सक्तीने त्याचे नियमन केले जाणार असून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
रवींद्र देशमुख
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

