अन् त्याने चक्क फोटोसाठी रुबाबात पोज दिली!
नायक वृत्तसेवा, आश्वी

वेळ संध्याकाळी सहाची, ट्रॅक्टर चालक शेत नांगरतोय,त्या नांगरटीत बगळे किडे शोधताय, तर शेजारच्या उसाच्या शेतातील सरीत बिबट्या बगळ्यांची शिकार करण्यासाठी दबा धरुन बसलेला, अचानक ट्रॅक्टर चालकाचे लक्ष सरित दबा धरून बसलेल्या बिबट्याकडे जाते. तो ट्रॅक्टर थांबवुन मोबाईल मध्ये फोटो घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी दबा धरून बसलेला बिबट्या चक्क रुबाबात उभे राहत पोज देतो, ही दुर्मिळ व चर्चेचा विषय ठरलेली घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरात घडली.

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ते दाढ खुर्द रस्त्यावर न्याय दुध संस्थेच्या लगत साहेबराव दातीर यांच्या शेतात अभिषेक भवर हा तरुण शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरत होता, तर नांगरलेल्या शेतात बगळे किटकांना टिपत होते. शेजारीच उसाचे शेत,ट्रॅक्टर व उसाच्या शेताचे अंतर केवळ पाच फुटाचे. त्या उसाच्या सरीतुन बिबट्याची नजर बगळ्यांवर, अशातच ट्रॅक्टर चालक भवर याचे सहज उसाकडे लक्ष्य गेले तर बिबट्या दबा धरून बसलेला. दोघांची नजरा नजर झाली. अभिषेक भवरने ट्रॅक्टर थांबवत आपला मोबाईल काढला आणि तो बिबट्याची शूटिंग घेवु लागला. त्यामुळे बसलेला बिबट्या रुबाबात उभा राहिला. बिबट्याच्या दिशेने कॅमेरा चालु होता मात्र बिबट्या किंचितही हलला नाही,शुटिंग साठी पोज देत राहीला एक मिनिटाची शुटींग झाल्यानंतरही बिबट्या मागे हटला नाही. सरीत बसुन घेत बिबट्याने अभिषेकला फोटो काढण्याचीही संधी दिली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Visits: 134 Today: 2 Total: 1114535
