पत्रकारांच्या पेन्शनची जबाबदारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चीच : संदीप काळे

नायक वृत्तसेवा, भुवनेश्वर
ओडिशामधील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य अधिवेशनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पत्रकारांच्या सशक्त आणि सुरक्षित भवितव्याच्या दृष्टीने आयोजित या ऐतिहासिक अधिवेशनात अनेक ठोस निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ओडिशामधील पत्रकारांच्या पेन्शनची जबाबदारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ घेणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी जाहीर केले.

ओडिशामध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे ५,५०० हून अधिक सदस्य असून, त्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरले. खुर्दा येथे पार पडलेल्या या अधिवेशनात संस्थेचे सर्व पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते. संदीप काळे म्हणाले, ओडिशातील पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढे सरसावली आहे. ही चळवळ फक्त हक्कांची नाही, तर जबाबदारीची आहे. आम्ही वचनबद्ध आहोत असे ते म्हणाले.या अधिवेशनात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांची पदोन्नती करून त्यांचा केंद्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.कार्यक्रमात प्रबीणा म्हचदेव, सुधीर मानसिंग, संजय अग्रवाल, सुरेंद्रनाथ पाढी, प्रभात मिश्रा, सुखांत परिदा, धनेश्वर बिदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनाचा दर्जा अधिकच उंचावला.अधिवेशनात राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. पत्रकारांच्या व्यावसायिक, सामाजिक, कौटुंबिक सुरक्षिततेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ उभ्या करीत असलेल्या या विश्वासाच्या व्यासपीठास एक नवी दिशा मिळाली आहे.पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे. जर समाजाने पत्रकाराच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली नाही, तर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ती पूर्ण करेल,असे सांगत संदीप काळे यांनी अधिवेशनात उपस्थित सर्वांना प्रेरणा दिली.

या अधिवेशनात प्रत्येक पत्रकारासाठी १० लाख रुपयांचा विमा,गरजू पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत,सेवानिवृत्त पत्रकारांसाठी पेन्शन योजना,पत्रकारांच्या घरकुल योजनांसाठी पुढाकार,स्किलिंग व रिस्किलिंगसाठी प्रशिक्षण उपक्रम या सर्व मुद्द्यांवर ठराव मंजूर करण्यात आले असून, त्या संदर्भातील अधिकृत मागण्या लवकरच शासनाकडे सादर केल्या जाणार आहेत.

Visits: 95 Today: 2 Total: 1105881
